मी व माझी मुलगी रोज सकाळी सहार एअर पोर्टवर जाऊन चौकशी करत होतो. असे जवळ जवळ ४ दिवस गेले. रोज आमचा नित्यक्रमच झाला होता. सकाळी ११ वाजता तिथे जायचे व पुन्हा दुपारी दोन वाजता घरी यायचे. शेवटी प्रयत्नांती परमेश्वर.
त्याप्रमाणे पाचव्या दिवशी तो टॅक्सीवाला स्वतःच आमच्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला व म्हणाला, "क्या मेमसाब, अपना हार्मोनियम मेरी टॅक्सीमे रखके गायी?" त्यानेआम्हाला ओळखले हेच मोठे आश्चर्य होते. हीच बाजाची पेटी त्याने नसती दिली तर आम्ही काय करु शकणार होतो? पण भाऊ महाराजांनीच त्याला बुद्धी दिली व माझ्या टॅक्सीत बाजाची पेटी राहिली अशी त्याने कबुली दिल्यावर मला खूप आनंद झाला. तो आपल्याच टॅक्सीतून आम्हाला आपल्या चांदिवली येथील घरी घेऊन गेला व आमची बाजाची पेटी आम्हाला जशीच्या तशी आणून दिली.
तीच टॅक्सी घेऊन आम्ही मोठ्या आनंदाने आमच्या घरी परतलो. हीच बाजाची पेटी त्याने परत केली नसती तर? याच मध्यंतरीच्या काळात मी सद्गुरु भाऊ महाराजांना रोज हरवलेल्या हार्मोनियमविषयी विचारायचे. भाऊ म्हणायचे, "मिळेल गं." त्यावर मीच म्हणायचे, "भाऊ, एवढ्या मोठ्या मुंबईत हरवलेली पेटी कशी काय मिळणार?" त्यावर भाऊ फक्त हसायचे. पेटी मिळाल्यावर मी भाऊंना फोन केला तेव्हा भाऊ महाराज म्हणाले, "काय, महाराज आहेत की नाही?"
सद्गुरु भाऊ महाराज नेहमी म्हणायचे की, "सद्गुरुंविषयी कळकळ तळमळ असेल तर प्रत्येक लहान-सहान गोष्टीतही यश मिळू शकते."
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
श्रीमती पद्मजा गंगातीरकर, बोरिवली
मला भावलेले आनंदयोगेश्वर भाऊ
मी व माझे मिस्टर श्री. सुधाकर गंगातीरकर दोघेही १९८५ पासून स्थानाशी व पर्यायाने आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांशी संलग्न आहोत. संत संगतीने वाटेवरच्या दगडालाही देवपण येते. आम्ही तर भावभावनेत अडकलेले जीव. प्रभाव झाल्याशिवाय कसा रहाणार?
असह्य दुःखातून, कठीण प्रसंगातून पार पडण्यास समर्थ हातांची गरज असते व असा समर्थ हात लाभणे हा सुद्धा परमेश्वरी योगच. कदाचित पहाडासारखे दुःख भोगायचे होते म्हणूनच पूर्वसंकेतानुसार सद्गुरु भाऊमहाराजांची ओळख झाली. ओळख हळूहळू वृद्धिंगत झाली व योग्य त्या मार्गदर्शनाने अधिकाधिक पटत गेली.
आमचा भाऊमहाराजांशी परिचय माझ्या 'पोटदुखीमुळे' झाला. माझी असह्य अशी पोटदुखी मी बारा वर्षे भोगली. मैत्रिणीच्या सांगण्यावरून मी "बोरिवलीमध्येच दत्तसंप्रदायातील सद्गुरु भाऊ महाराज करंदीकरांचे स्थान आहे. का विचारून बघत नाही?" ह्यांनी मनावर घेतले. डॉक्टर करून झाले. आता हाही उपाय करुन बघू. तसे ते नास्तिकच. केवळ बायकोला बरे वाटावे म्हणून स्थानावर जाऊ म्हणाले. त्यामुळे माझे मन काही तयार नव्हते. त्यातून मी तोडगा काढला.
त्यावेळेस मी श्रीअक्कलकोट स्वामी समर्थांच्या पोथीचे पारायण करीत होते. मी म्हटले मला स्वामी जेव्हा संकेत देतील किंवा दृष्टांत देतील तेव्हाच मी जाईन. आपले भोग नाहीतरी चुटकीसरशी संपणारे नाहीत. दर गुरुवारी मैत्रिणी स्थानावर भाऊंना भेटण्यासाठी नंबर घेऊन ठेवायच्या व मी घरीच. चौथ्या गुरुवारी मात्र मला मिळालेल्या संकेतानुसार आम्ही स्थानावर गेलो. सद्गुरु भाऊमहाराजांना भेटलो. ते गादीवर बसले होते. "काळजी करु नका. सर्व व्यवस्थित होईल." बस. एवढेच.
धीर वाटण्याऐवजी मनाची अस्वस्थता अधिकच वाढली. अनेक शंका कुशंका मनात घेऊन बाहेर आलो. "नेहमीप्रमाणे ११ गुरुवार आरतीला या." मला तर काही आशा वाटेना. पोटदुखी सुरु होऊन ५ वर्षे झाल्यावर आम्ही भाऊ महाराजांकडे गेलो होतो. ऍलोपॅथीला कंटाळून होमियोपॅथी, नंतर आयुर्वेदिक असे उपचार चालू होते.
पहिल्या तडाख्यातच वैद्यांनी पोटात कॅन्सरची लागण झाल्याबद्दल सांगितले. ह्यांचे धाबे दणाणले. ते पुन्हा भाऊ महाराजांकडे गेले. ह्यावेळेस मात्र भाऊंनी स्पष्टपणे सांगितले की, "कॅन्सर वगैरे काही नाही. उगाच घाबरु नको. पोटाच्या आतड्याला पीळ पडतो आहे. येथे येत रहा. सर्व नीट होईल."
काळ पुढे पुढे जात होता. हळूहळू ह्यांना स्थानाची, तिथल्या वातावरणाची, सामुदायिक आरतीची गोडी वाटू लागली. माझी पोटदुखी त्याचबरोबर पायदुखी चालूच होती. कधी जास्त कधी कमी. अशातच साधारण १९८६ साली गौरी जेवणाच्या दिवशी गौरी गणपतीच्या दर्शनाला म्हणून भाऊ महाराजांना आमच्या घरी बोलावले व तेही आले.
त्यावेळेस घरात ह्यांचे दोघे भाऊ, मेव्हणे व इतर बरीच मंडळी गोळा झाली होती. सर्वांवर नजर फिरवून मग ह्यांच्याकडे बोट दाखवत भाऊमहाराज म्हणाले, "तुला यावर्षी दत्तजयंतीला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे." हे अवाकच झाले. तरी धीर करुन हे म्हणाले, "वर्तमानपत्रातील हेडिंग्सशिवाय मी काहीच वाचत नाही. मला सवय नाही. कसे करणार ? तुम्ही माझ्या भावाला सांगा." तेव्हा गुरुवर्य भाऊ ठामपणे म्हणाले, "नाही. हे पारायण तुलाच शास्त्रशुद्ध पद्धतीने करायचे आहे." सवय होण्यासाठी म्हणून दुसऱ्या दिवसापासून एक एक अध्याय वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळचे पारायण तर त्यांनी केलेच परंतु नंतरही ते वर्षातून दोनदा पारायण करायचे. आमिष काय तर सद्गुरु भाऊ महाराज त्यानिमित्ताने घरी येतात. त्यांची पाद्यपूजा करता येते. घरात आनंदी वातावरण रहाते.
मीसुद्धा त्यांच्या या बदललेल्या वृत्तीकडे आश्चर्याने पहात होते. मनापासून त्यांना साथ देत होते. या सर्वांमुळे माझे पती कधीतरी जे सामिष आहार घ्यायचे ते बंद झाले. सिगरेट बंद झाली. पण तंबाखू खाणे मात्र चालू राहिले ते शेवटपर्यंत. माझे दुखणे हळूहळू उतारावर होते. माझीही जमतील तशी श्रीअक्कलकोट स्वामींच्या पोथीची पारायणे चालूच होती.
ह्यांच्या आयुष्यातील तो सोन्याचा दिवस उगवला. उठल्या उठल्या ह्यांनी सकाळी झालेला दृष्टांत सांगितला. जसाच्या तसा गुरुवर्य भाऊ महाराजांना सांगितला. त्यांनाही अतिशय आनंद झाला व आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांचा अनुग्रह घेणाऱ्या पहिल्या ११ भक्तांमध्ये ह्यांचा नंबर लागला. मी ह्यांना म्हटले, "अहो फार फार पुण्याईने गुरु लाभतो. तोही साक्षात सगुण रुपातील !" मंत्रविधी पार पडला. मी हाताला हात लावण्यापुरते होते.
काटेकोरपणे त्याचे पालन करणे सुरु झाले. हे कृपावर्षावात चिंब भिजत होते व मी काठावरच उभी राहून बघ्याची भूमिका निभावत होते. प्रभाव माझ्यावरही होता पण अत्यल्प.
अशीच वर्षामागून वर्षे जात होती. माझे पती गुरुवर्य भाऊमहाराजांपुढे बारीक सारीक चिंता मांडत असत. प्रत्येक वेळी मी ह्यांना म्हणायचे, "अहो, प्रत्येक गोष्टीत गुरूंना का त्रास देता? हे आपलं आपणच नको का निस्तरायला ? त्यांच्या मागे काय कमी लोकांच्या विवंचना आहेत?" या विषयावरून मात्र माझे व ह्यांचे मतभेद होत. ते म्हणत, "भाऊमहाराज आपली गुरुमाऊली आहे. मी माझे सुख-दुःख माझ्या आईला नाही तर कोणाला सांगणार?" स्थानावरची गर्दी वाढत होती. त्यामुळे हे गुरुवारऐवजी शनिवारीच आरतीसाठी जाऊ लागले. ह्यांच्या मधुमेह,हृदयरोग, क्षयरोग, डोळ्यांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया या सर्व व्याधीतून आम्ही पार पडत होतो. हे दिवसंदिवस थकत चालले होते. मानसिक शक्ती मात्र विलक्षण वाढली होती. पण...
|