५ मे १९९७ ही तारीख आमच्या संसारावर वीज बनून कोसळली. ह्यांना तोंडाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले. ह्यांनीच फोनवर गुरुवर्य भाऊंना सांगितले. ह्यांचा आता मात्र धीर खचला. औषधयोजना, लाईट घेणे वगैरे सुरु झाले. मी व माझा धाकटा मुलगा शशांक अक्षयतृतीयेला भाऊमहाराजांना जाऊन भेटलो. भाऊंनीही आम्हाला भविष्यकाळाची स्पष्ट कल्पना दिली व त्याचबरोबर मला दररोज देवापुढे बसून 'घोरात्कष्टोद्धारण' स्तोत्र म्हणावयास सांगितले. परंतु मन मानेना. एवढी औषधे निघाली आहेत. कुठला ना कुठला उपाय लागू पडेल व यातून आपण बाहेर पडू असे वाटायचे. हिमतीने सर्व घरातील माणसांनी कंबर कसली. 'लाईट घेणे' ह्यांना सहन होईना. तेव्हा भाऊमहाराजांच्याच मार्गदर्शनावरून ह्यांना आयुर्वेदिक औषधयोजना सुरु केली.
एकेक दिवस नवीनच समस्या घेऊन येत होता. उद्याची धास्ती वाटत होती. मला समजत होते की देव आपली कठोरातली कठोर परीक्षा घेत आहे. चोवीस तास डोळ्यात तेल घालून आपल्या माणसाला जपत होते. तेही या गोष्टींना साथ देत होते. दोन महिने भ्रमावस्थेतच गेले. १ ऑगस्टपासून हे शुद्धीवर आले व सगळ्यांना ओळखू लागले. डॉक्टरांनीही आशा दाखवली की, "गणपती, गौरी मांडा, काही धोका नाही." गणपती बुक करुन झाला.
२५ ऑगस्ट १९९७ ची रात्र काही वेगळीच होती. ह्यांना भरपूर रक्तप्रवाह झाला. सावरता मुश्किल झाले. तरीही डॉक्टर म्हाणालें, "काही हरकत नाही आता लवकरच बरे वाटेल." पण २८ ऑगस्टला दुपारी १ वाजता डॉक्टरांसह मी समोर उभी असताना, निःशब्द, कोणाचाही शेवटचा निरोप न घेता त्यांना शांतपणे झोप लागली ती कायमचीच. शेवटचा स्वामींच्या नावाचा अंगारा लावला, तोंडात घेतला व 'श्री दत्त' नाम घेत ते स्वामी चरणी लीन झाले. भाऊ त्यावेळी अमेरिकेत होते. त्यांना ही बातमी कळवली.
आज मागे वळून बघताना असे वाटते की २५ ऑगस्टलाच काळ आला होता. जन्म व मृत्यूची वेळ साधणे आपणा माणसांच्या हाती नाही. परंतु ह्यांच्या मृत्यूची वेळ दिवस ह्यांच्या श्रद्धेमुळे पुढे ढकलली गेली. श्रावण वद्य एकादशी, वार गुरुवार व आर्द्रा नक्षत्र हा महानिर्वाणाचा मुहूर्त जणूकाही कोणा परमशक्तीने निश्चित केला. जातेवेळी त्यांच्या सर्वांगाला विभूती लावण्याची बुद्धी मला कोणी दिली ? जायच्या दिवशीच सकाळी म्हणाले, "आज कसे तृप्त वाटते आहे !"
असह्य दुखणे सहन करण्याची शक्ती त्यांना कोणी दिली? शेवटच्या घटकेपर्यंत 'श्रीदत्त, श्री दत्त' म्हणण्याची शक्ती व प्रेरणा सद्गुरुंवाचून कोण बरे देऊ शकते ! मन इतकं निर्मोही व निःसंग झालं होतं की त्यांना शेवटच्या वेळी विचारले की, "मुलांना कामावरून बोलवू का ?" तर ते स्पष्टपणे "नाही" म्हणाले. ते कोणाच्यातही गुंतून राहिले नाहीत. त्यांचा पुढचा प्रवास नक्कीच निर्धोक झाला असेल कारण सद्गुरुंचे भक्ताप्रतीचे खरे कार्य त्या भक्ताच्या मृत्यूनंतरच तर सुरु होते ना ! पण मी ह्यांच्या आठवणींतून कशी बाहेर पडू? अर्धवट सोपवलेल्या संसाराचा भार कसा पेलू ?
भाऊमहाराज बोरिवलीत आले. त्यांना भेटण्याची ओढ लागली. स्थानावर जाऊन त्यांच्या पाया पडले. तो ब्रम्हांड आठवले. अश्रूंनी मला काहीच दिसत नव्हते. फक्त पाठीवर त्यांच्या हाताचा स्पर्श जाणवला. शब्दांची गरजच नव्हती. माझे कितीतरी जणांनी सांत्वन केले होते परंतु हा हात सामान्य नव्हता. तो आमच्या सद्गुरुंचा स्पर्श होता. ती एक शक्ती होती, एक दिलासा होता. आधाराचा हात होता. काय नव्हतं त्यात ! त्यादिवसानंतर भाऊमहाराजांनी मला आश्वस्त केले 'त्याने माझ्यावर विश्वासाने तुझी व तुझ्या मुलांची जबाबदारी टाकली आहे व ती मी पूर्ण करीन' त्याप्रमाणे मोठ्या मुलाच्या लग्नकार्याची जबाबदारी त्यांनीच उचलली.
या सर्व प्रसंगात मला जाणवलेली अनुभूती म्हणजे गुरु सदैव आपल्या शिष्याचे रक्षण करतात, सर्वांनाच मदत करण्याची प्रेरणा कशी देतात हे बघण्यासारखे आहे. डॉक्टर डोंबिवलीचे होते. परंतु एकदाही असा प्रसंग आला नाही की डोंबिवलीला फोन लागला नाही. प्रत्येक वेळेस स्वतः डॉक्टर किंवा त्यांचा मदतनीस डॉक्टर फोनवरून योग्य तो सल्ला देत, औषधयोजना सांगत व ती ताबडतोब लागू पडून ह्यांना अराम वाटत असे.
यामागे एक अदृष्य सूत्र जाणवते. नाहीतर साधा बोरिवलीतील बोरिवलीत फोन लागत नाहीत, लागला तर योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटत नाही व भेटली तरी काम होतेच असे नाही. यात माझा मानसिक ताण कितीतरी वाचला व ह्यांना व्यवस्थितरितीने सांभाळता आले. एक अदृष्य शक्तीच आपल्याला बळ देते आहे ही जाणीव सतत असायची. स्थानावर सद्गुरु भाऊमहाराजांकडे जाणारी माझ्या मुलाची मित्रमंडळी ही सर्व आमच्या सद्गुरुंनी हस्तक म्हणून पाठवलेली. आयुष्यात कोणाचाही शेवट न पाहिलेली ही मित्रमंडळी अतिशय धीराने वागली. ह्यांनी गुरुवर्य भाऊंशी साधलेले अनुसंधान, तळमळीने मारलेली हाक हीच उपयोगी आली. किती किती जणांची नावे घेऊ. नातेवाईकांनी तर मदत केलीच परंतु जे परके होते, आम्हाला ओळखतही नव्हते ते सख्खे झाले. हा मदतीचा हात आमच्यापर्यंत अनेक मार्गांनी पोचत होता. जातांना मनुष्य जे काही आपल्याबरोबर घेऊन जातो ते हेच. ह्यांनी आपल्या सुस्वभावी वागण्याने अनेक माणसे जोडली होती, व हा सर्व आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊ महाराजांच्या सहवासाचा, कृपाशिर्वादाचा परिणाम होता.
शेवटचा क्षण ह्यांना केवळ भाऊंमुळे साधता आला. मलाही तो साधायचा आहे. तो क्षण जिंकायचा आहे. ह्यांनी जिंकलेला मी बघितला आहे. अशी जन्माची साथ मला मिळाली की मी या मार्गावर पाऊल टाकायला सिद्ध झाले आहे. पुढे सर्व भाऊ महाराजच बघून घेतील. सद्गुरुंचे हे आपल्या भक्तांबरोबर कायम अदृष्यरुपात असणं, त्यांच्या मृत्यूच्या वेळीही असणं हेच तर जीवनाचे सार्थक आहे. आमच्या भाऊंमुळे आमच्या ह्यांचे सार्थक झालेले जीवन, मृत्यू व मृत्युनंतरचे जीवनही सर्वांपर्यंत पोचावे म्हणूनच हे मनोगत व्यक्त करीत आहे.
सद्गुरुकृपा प्राप्त होणे हे महदभाग्यच. आम्हाला तर केवळ सद्गुरुंच्याच कृपेने भाऊंचा प्रसन्न सहवास लाभला, त्यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले ही आमची जन्मोजन्मीची पुण्याई. आनंदयोगेश्वरांच्या मुखातून, फोनवरुन जरी आशीर्वादरुपी "हं बाळं माझे लक्ष आहे" हे शब्द कानावर पडले तरी सगळी दुःखे, सर्व ताप दूर पळत असत, संसारातील आजारपणे व संकटे ही माणसाला भाऊंसारख्या ईश्वरीय शक्तीकडे घेऊन जातात. त्यानंतर मात्र आपण ते चरण आपल्यापासून कधीही दूर होऊ देऊ नयेत. मी, माझी मुले, माझा संसार हा सर्व भार मी त्यांच्यावर टाकला व तणावरहित जीवन जगणे मला शक्य झाले. माझ्या संसाराची नौका पार लावणाऱ्या माझ्या आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांना माझे शतशः वंदन !
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|