एकदा सेवेच्या निमित्ताने गुरुवर्य भाऊंजवळ बसलो असताना 'दर्शन व नमस्कार' या विषयाच्या अनुषंगाने बोलताना भाऊ म्हणाले, "जेव्हा भक्त नमस्कार करण्यासाठी समोर उभा असतो तेव्हा त्याचे लक्ष माझ्या उजव्या हाताकडे असते; ज्या हाताने माझ्याकडून नारळ, पेढे, फुल प्रसादरूपाने दिले जाते. मात्र माझ्या डाव्या हाताकडे कोणाचे लक्ष नसते जिथून स्वामी महाराजांचे तेज व ओज त्या भक्तापर्यंत पोचवण्याची माझी इच्छा असते."
पुढे भाऊ म्हणाले की, "भक्ताने ऐहिक व अशाश्वत जडवस्तूमध्ये जास्त अडकून न पडत जे शाश्वत आहे त्याच्यावर दृष्टी ठेवून ते मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या शाश्वत कल्याणाच्या मार्गावरुन समाजाला घेऊन जाण्यासाठीच सद्गुरुंचा जन्म असतो." भाऊ महाराजांच्या या शब्दांचे प्रतिध्वनी अजुनही माझ्या कानात घुमत आहेत.
जेव्हा एखादा सामान्य माणूस सद्गुरुंकडे येतो तेव्हा तो अनेक गोष्टी मागत असतो. आणि सद्गुरु त्याला त्याच्या आवश्यकतेनुसार योग्य ते देण्यासाठी आशीर्वाद देतच असतात, परंतु हे आशीर्वाद फलद्रुप होणे हे त्या व्यक्तीचे १००% प्रयत्न, सद्गुरुंच्या शब्दावर दृढ विश्वास व पूर्ण श्रद्धा यावर अवलंबून असते. याचे एक उदाहरण येथे द्यावेसे वाटते.
सद्गुरु भाऊमहाराजांची प्रवचने म्हणजे भक्तांसाठी ज्ञानपोईच असे. लोकं ही आशयघन व सुबोध प्रवचने ऐकण्यासाठी लांब-लांबून येत. माझ्या मनात नेहमी विचार येई की ही प्रवचने, जी रेकॉर्ड केली जात आहेत, ती लिखित स्वरूपात भक्तांना वाचन, मनन व चिंतन करण्यासाठी उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हा अमूल्य ठेवा लिखित स्वरूपात पुढील अनेक पिढ्यांपर्यंत जतन करणेही किती आवश्यक आहे याची जाणीव मला दिवसेंदिवस अस्वस्थ करत होती.
माझे विचार मी गुरुवर्य भाऊंसमोर मांडले. त्यावर भाऊ म्हणाले, "अरे अनेकांनी हा प्रयत्न केला. अगदी मराठी स्टेनोग्राफरनेसुद्धा भाऊंची प्रवचने लिहिण्याचा प्रयत्न केला. पण अजुन काही कोणाला ते जमलेले नाही. त्यातील काही प्रवचनांच्या कॅसेट्स सिनियर भक्तांकडे आहेत." त्यावर मी सद्गुरु भाऊंकडे प्रार्थना केली की, "भाऊ, आम्ही हा प्रयत्न करू का? तुमचे आशीर्वाद असतील तर माझी खात्री आहे की याला नक्की यश मिळेल. माझे हे स्वप्न नक्की पूर्ण होईल." त्यावर भाऊंनी "पूर्ण आशीर्वाद बाळा. कळकळ तळमळ असेल तर नक्की यश मिळणार." असे म्हटले.
त्यानंतर लगेचच मी, माझा मित्र व गुरुबंधू श्री. सुहास ठाकूर याच्याशी विचारविनिमय करून आम्ही ह्या कामाला सुरुवात केली. दोन तीन सिनियर भक्त यावर 'हे काम अशक्य आहे' असे म्हणून आमच्यावर हसले. परंतु माझी खात्री होती की सद्गुरुंचे आशीर्वाद पाठीशी असतील तर काहीच अशक्य नाही. त्याप्रमाणे मी व माझी होणारी पत्नी सुषमा आम्ही एक - दोन प्रवचने जशीच्या तशी लिहून काढली व भाऊंना दाखवली. त्यावर प्रसन्नपणे "Go ahead" असे सांगत सर्व प्रवचनांच्या कॅसेट्स भाऊंनी आमच्या ताब्यात देण्यास सांगितले.
त्यानंतर आम्ही काही तरुण भक्तांना एकत्र केले व हा प्रकल्प आपण नक्की पूर्ण करू शकतो हे पटवून दिले. अनेक तरुण भक्त या प्रकल्पामध्ये सहभागी झाले. भाऊंचे ओघवते प्रवचन जसेच्या तसे लिहून काढणे खरोखरच सोपे काम नव्ह्ते. कॅसेट्स रिव्हाईन्ड करायची, पुन्हा ऐकायचे, लिहून काढायचे , एखादा शब्द निसटून जाऊ नये म्हणून ती कॅसेट पुन्हा रिव्हाईन्ड करायची असे करता करता गेल्या अनेक वर्षांपासूनची सर्व प्रवचने कधी लिहून झाली हे कळलेच नाहीं. प्रवचने उतरवून काढणे व लिहिलेली प्रवचने झेरॉक्स काढून नीट तारखांप्रमाणे तसेच विषयांप्रमाणे फाईल करून ठेवणे यामध्ये सौ. श्रद्धा खामकर, सौ. अश्विनी बागलकर व श्री. बंधु सालदूरकर यांचा विशेष सहभाग होता.
ही प्रवचने उतरवून काढल्यामुळे सद्गुरु भाऊंच्या रसाळ प्रवचनांवर आधारित 'आत्मशोध' हा पुस्तकरूपी ग्रंथ प्रत्यक्षात समाजासमोर आला. अशाप्रकारे सद्गुरुंच्या आशिर्वादावर दृढ विश्वास व अथक प्रयत्न याने 'असाध्य ते साध्य झाले' व माझे स्वप्न आकारास आले.
आजही केवळ त्यांच्याच कृपेने आमचे व गुरुवर्य भाऊमहाराजांच्या अनेक भक्तांचे अनुभव, प्रचिती या पुस्तकरुपाने समाजासमोर येत आहे. या पुस्तकाप्रती व या कार्याप्रती इतर अनेक सत्पुरुषांचे आशीर्वाद हे आनंदयोगेश्वरांच्या आत्यंतिक भक्तीतून आमच्यापर्यंत पोचले आहेत.
प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, श्रीसाईबाबा, शेगावचे गजानन महाराज, श्री अक्कलकोट स्वामी महाराज, परमपूज्य दादामहाराज निंबाळकर, परमपूज्य नानामहाराज तराणेकर, परमपूज्य श्रीशंकर महाराज या सर्वांनी दृष्टांतरूपाने आम्हाला हेच सांगितले की आम्ही सर्व सत्पुरुष आनंदयोगेश्वर भाऊंमध्ये आहोत.
आता तर सद्गुरुंच्या या कार्याला छोटीशी सुरुवात झाली आहे. अध्यात्म्याच्या तसेच भाऊमहाराजांनी आखून दिलेल्या मार्गावर अजून खूप मोठी वाटचाल करायची आहे. त्यासाठी वरील सर्व विभुतींचे व माझ्या आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांचे शुभाशीर्वाद आम्हाला लाभोत व आमच्या श्वासाश्वासात 'नमो गुरवे निळकंठाय' हे आमच्या सद्गुरुंचे नाम राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|