प्रत्येकालाच त्याच्या जीवनामध्ये एक चांगल्या जोडीदाराची आवश्यकता असते. मलाही स्थानावर गुरुवर्य भाऊमहाराजांकडे नियमितपणे येणारी एक मुलगी आवडलेली होती. तिच्या बरोबरच्या संसाराची मानस कल्पनाही करू लागलो होतो. तिच्याशी ओळख वाढवण्याचा प्रयत्न चालू असतानाच असे कळले की ती विवाहित आहे. मी खट्टू झालो आणि तिचा विचार सोडून देण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यानंतर थोड्या दिवसांनी गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक तरुण भक्तांनी सद्गुरुंचे सामुहिक स्नानादि उपचार व पाद्यपूजन केले. त्यावेळी सद्गुरु भाऊंना भगवान श्रीकृष्णाच्या रूपात सजवले होते.
या सर्व कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन माझ्याकडे असल्यामुळे भाऊमहाराजांना ओवाळण्यासाठी वगैरे सुवासिनींची जी नावे घेतली गेली होती त्यामध्ये मी त्या मुलीचे, सुषमाचेही नाव तिला विचारूनच घातले. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. त्यावेळी कोणाला सद्गुरु भाऊ खरंच श्रीकृष्ण वाटले तर कोणाला स्वामी समर्थांचे दर्शन झाले. या कार्यक्रमाची व्हिडीओ कॅसेट काढण्यात आली होती. आज विचार करताना जाणवते की तो कार्यक्रम आणि ती कॅसेट माझ्या जीवनाला कसे कलाटणी देणारे ठरले. कारण त्यानंतर काही दिवसांनी मी सद्गुरु भाऊ महाराजांची चरण सेवा करीत असताना भाऊंनी मला वरील कार्यक्रमाची ती व्हिडिओ कॅसेट लावण्यास सांगितले. त्यावेळी योगायोगाने त्यांच्या घरी फक्त आम्ही दोघेच होतॊ. ज्यावेळी त्या मुलीवर कॅमेरा आला त्यावेळी पटकन सद्गुरु भाऊ स्वतःशीच पण मोठ्याने म्हणाले "या मुलीची डायव्होर्सची केस चालू आहे. हिच्या बाबतीत काहीतरी केले पाहिजे." मी ते वाक्य ऐकले मात्र मला अतिशय वाईट वाटले. इतक्या चांगल्या मुलीच्या आयुष्यामध्ये अशी काय समस्या असू शकते ? मी लगेचच्या लगेच गुरुवारी तिच्याशी याविषयी बोललो. तिच्या एकंदर केसची माहिती विचारली व तिच्या या केसमध्ये व्यावहारिक दृष्ट्या आम्ही कोणी काही मदत करू शकतो का असेही विचारले. पण तिने नाही असे सांगितले.
त्या काळात मी ऑडिटसाठी बाहेरगावी असायचो. इथून लांब गेल्यावर मी खूप विचार केला व जेव्हा मी पुन्हा इथे आलो तेव्हा मी सुषमाला लग्नासाठी विचारले. तिने स्पष्ट नकार दिला. अशीच दोन वर्षे गेली. या दोन वर्षात मी तिला ३ ते ४ वेळा लग्नासाठी विचारले व प्रत्येक वेळी तिने नकारच दिला. त्याचप्रमाणे मी ही गोष्ट गुरुवर्य भाऊ महाराजांच्याही कानावर घातली. भाऊ म्हणाले, "थोडे दिवस थांब. पूर्ण विचार कर. कारण तिला एक ४ वर्षांची मुलगी आहे." मला माहीत होते. मी ठाम होतो. मी भाऊंना म्हणालो, "तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असतील तर मला कोणाचीही पर्वा नाही. " एक दिवस पुन्हा विचारले असता ती मुलगी, सुषमा मला म्हणाली की, "मी मला स्वतःला गुरुभाऊंवर सोपवले आहे. त्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. ते जर हो म्हणाले तर आणि तरच आपण पुढे जाऊ शकतो." ती तिच्या आईबरोबर भाऊंना भेटली तेव्हा भाऊंनी तिला या लग्नासाठी आशीर्वाद दिले. सर्वात मुख्य म्हणजे या सगळ्या प्रोसेस मध्ये ४ वर्षे निघून गेली होती. सुषमाची केसही संपली होती. त्यानंतर सद्गुरु भाऊमहाराजांनीच दिलेल्या सुमुहूर्तावर आमचे लग्न झाले. भाऊंनीच सुषमाचे नाव बदलून ते 'श्रद्धा' असे ठेवले.
लग्नाच्या दिवशी आशीर्वाद देताना आनंदयोगेश्वर भाऊ म्हणाले, "हा तुमचा संसार तुम्ही तुमच्या गुरुंना केंद्रस्थानी ठेवून करा. मी कायम तुमच्या बरोबर आहे." व पुढे मला म्हणाले, "विकास, हे लग्न ही तुझी जबाबदारी आहे. काहीही झाले तरी या मुलीच्या डोळ्यात पाणी येता कामा नये. नाहीतर माझ्याशी गाठ आहे." या सांगण्यामागे त्यांना काय अभिप्रेत होते हे मला कळले. त्यानंतर आमच्या जीवनामध्ये घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट प्रत्येक गोष्टीमध्ये सद्गुरु भाऊ आमच्याबरोबरच राहिले. मग ते घराचा शोध असो, श्रद्धाचे बाळंतपण असो, मुलांची आजारपणे असोत किंवा घरातील कुठले धार्मिक कार्य असो, भाऊमहाराज सतत आमच्याबरोबर राहिले, या सर्वांमध्ये स्वतः सहभागी झाले.
या सर्व घटना घडत असताना सुषमाकडून भाऊंवर काही काव्येही लिहून झाली. तिच्या ठायी सद्गुरु भाऊंच्याप्रती असलेला समर्पण भाव, मला तिच्याविषयीचा आदर आणखी वाढण्यास कारणीभूत झाला. मी गुरुपौर्णिमेला स्वतःला सद्गुरुचरणी अर्पण केले होते; त्याला श्रद्धाच्या रुपाने सुयोग्य अशी साथ मला मिळाली व हा प्रसादच जणू मला माझ्या गुरुभाऊंकडून मिळाला. त्यामुळे आमचे जीवन, आमचा संसार हा आमचा उरलाच नाही; तो सद्गुरुमय होऊन गेला व आनंदयोगेश्वर भाऊंनी आम्हाला दोघांना एकत्र का आणले असावे याचे हळूहळू प्रत्यंतर येऊ लागले. एकदा तर भाऊ श्रद्धाला म्हणाले सुद्धा की, "Why are you married to Vikas only? Why not to anybody else? कारण तुझ्याकडून जे पुढे व्हायचे आहे ते विकासच्याच साथीने पूर्ण होऊ शकतं."
आमच्याही नकळत सद्गुरूंनी आम्हाला त्यांच्या सगुण स्वरुपाकडून निर्गुण स्वरूपाकडे कधी वळवले हे आम्हाला कळलेही नाही. आमच्या घरात सद्गुरु भाऊमहाराजांच्या निर्गुण पादुका आल्या, श्रद्धाकडून सद्गुरुंनी आरत्या व कवने लिहून घेतली. सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या प्रचार व प्रसाराच्या कार्याचे प्रतीक म्हणून त्यांचे प्रार्थना स्थळ निर्माण होण्यासाठी त्यांनी आम्हा दोघांना निमित्त करून घेतले यातच आमच्या जीवनाची कृतार्थता आहे.
एक गोष्ट जी एवढ्या वर्षात या मार्गामध्ये मी अनुभवली ती येथे आवर्जून नमूद करावीशी वाटते. एखाद्या समस्येच्या निमित्ताने जेव्हा कोणी एखाद्या सत्पुरुषाकडे येतो तेव्हा ती समस्या ही त्या व्यक्तीला या मार्गात आणण्याचे निमित्त असते. कारण सत्पुरुषाचे काम हे एखाद्या व्यक्तीला ऐहिक समस्येतून बाहेर काढणे एवढेच नसते तर त्याहीपुढे जाऊन त्या व्यक्तीची आत्मबुद्धी जागृत करून तिला आत्मशोधाच्या व आत्मबोधाच्या मार्गावर चालण्यासाठी प्रवृत्त करणे हीच त्या सत्पुरुषाची भूमिका असते. त्यासाठी तो सत्पुरुष जीवाचा आटापिटा करत असतो जे आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांनी आजीवन केले. परंतु खेदाची गोष्ट ही असते की किती लोक हे समजतात ? किती लोकांना याची जाणीव होते की मला या सद्गुरुतत्वाकडून नक्की काय घेऊन जायचे आहे ?
सद्गुरु भाऊमहाराजांकडे असे कित्येक लोक येऊन गेले की ज्यांना त्यांच्या समस्यांमध्ये भाऊंनी मार्ग दाखवला, अमूल्य असे मार्गदर्शन केले. परंतु आपले काम झाल्यानंतर मात्र त्यांनी दुसरी समस्या उद्भवेपर्यंत या मार्गाकडे पाठ फिरवली. अर्थात, यात त्या सत्पुरुषाचे काही बिघडत नसते तर त्या व्यक्तीचे, त्या जडदेहाचेच यात नुकसान असते. हे कळत असल्यामुळेच भाऊमहाराजांनाही अशा लोकांविषयी खूप वाईट वाटायचे. त्यांनी कायम अतिशय पोटतिडीकेने भक्तांपर्यंत हे पोचवण्याचा प्रयत्न केला की, "बाळांनो, डोळे उघडे ठेवून तावून सुलाखून गुरु करा. परंतु एकदा का ते गुरुचरण धरले की धरसोड वृत्ती ठेवू नका. त्यात तुमचेच नुकसान होते. त्या सद्गुरुंना तुम्हाला काय सांगायचे आहे, काय द्यायचे आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.”
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|