|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज ....तो पूर्ण आनंद गुरू समर्थ

या समर्थ भक्तप्रभावळीमधील परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची दिव्य परंपरा पुढे चालू ठेवणारे व त्यांचेच अवतारी कार्य करून राहिलेले, या आधुनिक युगातील एक थोर लोकोद्धारी सत्पुरूष म्हणजे आनंदयोगेश्वर सद्गुरू निळकंठ महाराज हे होत.

रायगड जिल्हयातील, सुधागड तालुक्यामधील नाडसूर या गांवामध्ये ७५ वर्षापूर्वी हे सिध्दतेज, दिनांक ७ सप्टेंबर १९३१ श्रावण कृष्ण नवमी, या दिवशी करंदीकर घराण्यामध्ये जन्माला आले. सोमवारचा जन्म, म्हणून आई वडीलांनी नांव ठेवले 'निळकंठ' . त्यांच्या वडीलांचे नांव श्री. अनंत परशुराम करंदीकर व आईचे नांव सौ. पार्वती अनंत करंदीकर. त्यांचे लौकिक नांव जरी निळकंठ ठेवले गेले, तरी सर्वजण त्यांना 'राजा' या टोपणनावाने संबोधत असत.

'राजा' ते श्री. राजाभाऊ करंदीकर, राजाभाऊ करंदीकर ते परमपूज्य भाऊमहाराज करंदीकर व परमपूज्य भाऊमहाराज ते सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठमहाराज हा त्यांच्या जीवनकार्याचा प्रवास साधा नव्हता. सद्गुरू आनंदयोगेश्वरांचे बालपण व तरूणपण अतिशय कष्टप्रद गेले. असे असले तरी, त्या प्राप्य परिस्थितीकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन हा सामान्य माणसासारखा नव्हता. त्या वयात सुध्दा सदगुरू भाऊमहाराजांचे विचार हे वेगळ्या पातळीवरचे असत. 'या जगाचा नियंता कोण आहे, ही अखिल सृष्टी कोण चालवत आहे, आपल्या समोर घडणा-या घटनांच्या मागे असणारी प्रेरक शक्ती कोणती असावी' अशाप्रकारचे नाना विचार त्यांच्या मनामध्ये येत. तासनतास ते याच विचारांमध्ये असल्यामुळे सामान्यांना अपेक्षित असलेले वागणे त्यांच्याकडून होत नव्हते. त्यामुळे त्यांच्या या विपरित वागण्याला वेडाचार संबोधून त्यांची टिंगल-टवाळी, अवहेलना त्यांच्या आप्तस्वकीयांकडूनच सतत होत राहिली.

संत आणि सत्पुरूषांचा जन्म जरी सामान्य माणसासारखा भासत असला तरी त्यांच्यामध्ये असलेल्या दिव्यत्वाची प्रचिती वेळोवेळी येतच असते. पण मायेचा जबरदस्त पगडा समाजमनावर असल्यामुळे अशा घटनांकडे कानाडोळा केला जातो किंवा त्या व्यक्तीला वेडा म्हणुन हिणवले जाते. त्यांच्यामध्ये असलेल्या दिव्यत्वाची प्रचिती अधिक प्रमाणात येऊ लागेपर्यंत बराच काळ निघून गेलेला असतो. त्या देहाच्या माध्यमातून लाभ घेण्याची संधी अनेकांनी गमावलेली असते. सदगुरू भाऊमहाराज करंदीकर यांच्या जीवनामध्ये सुध्दा अशाच प्रकारच्या घटना घडल्या. गरीबी व अवहेलना यामुळे त्यांच्यामध्ये लहानपणापासून असलेले सुप्त अलौकिक तेज त्यांच्या सान्निध्यात असलेल्या कोणालाच कळले नाही........ एक त्यांची आई सोडून. त्याची हकीकत अशी :

एका संध्याकाळी 'श्रीनिळकंठ' आपल्या आईबरोबर गप्पा मारत बसले असताना आईला म्हणाले “आई नोकरीच्या निमित्ताने मी खूप ठिकाणी फिरलो. पण पूर्वी माझ्याकडे फार पैसे नसल्याने मी तुला कुठेच घेऊन गेलो नाही. आता थोडे फार पैसे माझ्याजवळ आहेत; तेव्हा तुला तीर्थयात्रेला घेऊन जाण्याची माझी इच्छा आहे. आपल्या 'राजा'च्या या इच्छेवर क्षणाचाही विलंब न करता ती माऊली चट्कन बोलून गेली, “अरे राजा, मला कुठेही तीर्थक्षेत्री जाण्याची आवश्यकता नाही. सर्व तीर्थे तुझ्या चरणाशी आहेत.” त्यांच्या आईला जरी ही गोष्ट पटली होती; तरीसुध्दा इतर लोकांना त्याची यत्किंचितही जाणीव नव्हती.

लोकांनी जरी त्यांना वेडे ठरविले तरी त्यांच्या अंतर्मनाची पूर्ण खात्री होती की, जे काही माझ्या हातून घडते आहे ते मी करत नसून कुठली तरी अद्वितीय शक्ती माझ्याकडून हे करवून घेत आहे. अशाच ठाम श्रध्देमध्ये असताना एका ज्योतिषाच्या माध्यमातून त्यांना गायत्रीमंत्राची उपासना करण्यास सांगितले गेले. गायत्री मंत्राची उपासना जसजशी वाढत गेली तसतसा अनेक वर्षे मनामध्ये असलेल्या गुढ शक्तीचा प्रत्यय त्यांना अंतर्ज्ञानाने जाणवू लागला. देहाचे बंधन नकोसे वाटू लागले. कोणाचाही सहवास नकोसा वाटू लागला व मुंबईतील गिरगांव चौपाटीवर जाऊन तासनतास गायत्रीची उपासना करावी हा ध्यास त्यांना लागला आणि या ध्यासाचे रूपांतर आत्मस्वरूपाची ओळख व जाणीव होण्यात झाले.

हे होत असतानाच त्यांच्या हातून दैनंदिन कर्तव्य-कर्म हे घडतंच होते. मनामध्ये सततचा दैवी शक्तीचा विचार व देहाने वाट्याला आलेले कर्म याची योग्य सांगड घालत घालत अनेक वर्षे निघून गेली आणि योग्य वेळ येताच मदगुरू भाऊमहाराजांना १९७६ साली सद्गुरू परमपूज्य दादामहाराज निंबाळकर यांची भेट घडली. ती भेट सद्गुरू भाऊमहाराजांच्या पुढील अध्यात्मिक कार्याची नांदी ठरली. काही वर्षे ज्योतिषाच्या माध्यमातून लोकांना मार्गदर्शन करणारे राजाभाऊ करंदीकर ही एक सामान्य व्यक्ती नसून, त्यांच्या ठायी एक अद्वितीय शक्ती वास करून आहे याची जाणीव त्यांच्या संपर्कामध्ये येणा-या अनेकांना हळूहळू होऊ लागली. तरीसुध्दा स्वतः त्यांना मात्र समाधान लाभत नव्हते. अजून काहीतरी आपल्याला हवे' असे त्यांना प्रकर्षाने वाटायचे. खूप विचार केल्यानंतर त्यांना जाणवले की आपल्याला जी एक हुरहुर जाणवत आहे - ती म्हणजे 'आपले गुरु कोण' . त्यावेळी त्यांनी प. पू. दादामहाराजांना 'तुम्ही मला गुरूस्थानी आहात असे सांगितले. तेव्हा प. पू. दादामहाराजांनी त्यांना सांगितले की “राजाभाऊ, तुमचे गुरू मी नसून परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराज हे तुमचे गुरू आहेत." त्या क्षणापासून आपल्या सदगुरूंच्या कार्याची महती 'आसेतु हिमाचल' पोचवण्याचे अतिशय खडतर व्रत गुरूवर्य भाऊमहाराजांनी अंगीकारले; जे त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत कसोशीने पाळले.

<< Previous      Next >>