|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

आपल्या गुरूंच्या प्रसार आणि प्रचाराकरिता त्यांनी सर्व संतांनी वेळोवेळी सांगितलेल्या आणि प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वतींनी अंगीकारलेल्या 'नामा'ची कास धरली. या नामाच्या माध्यमातून त्यांनी असंख्य पीडितांना जगण्याची उमेद' मिळवून दिली. भक्तांच्या व समाजाच्या कल्याणासाठी त्यांनी नामस्मरणाचे अनेक संकल्प केले व स्वतःच्या प्रत्यक्ष आदर्शातून आपल्या भक्तांच्या सहकार्याने हे संकल्प पूर्णत्वास नेले. भक्तांच्या घरोघरी जाऊन त्यांनी नामाची ही गंगा अनेकांच्या मनामध्ये प्रसवली. या नामसंकल्पांच्या माध्यमातून त्यांनी हजारो भक्तांना एकत्र आणले, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आणि सर्वापर्यंत 'नामचिंतनाने 'चिंतामुक्त व्हा' हा त्यांचा आशीर्वादपर संदेश पोचवला. आपल्या सर्व भक्तांपर्यंत सदगुरू भाऊमहाराजांनी प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची स्पंदने या नामाच्याच माध्यमातून पोचविली.

सदगुरू भाऊमहाराजांकडे एखादा भक्त कुठल्याही समस्येचे निराकरण करण्यासाठी आला तर ते आपल्या गुरूंकडे बोट दाखवत व "महाराज सर्व चांगलं करतील" असे म्हणून त्या भक्ताला दिलासा देत स्वतःकडे कुठल्याही गोष्टीचे कर्तेपण न घेणा-या सद्गुरू भाऊंनी श्रीटेंबेस्वामीमहाराजांची स्पंदने आपल्यापर्यंत आणताना, आपल्यासाठी काय केलं आहे याची फारच थोडया भक्तांना जाणीव होई. हजारो भक्तांना अनेक प्रकारचे अनुभव, पचिती देत गुरुवर्य भाऊंनी त्यांना श्रीस्वामी महाराजांच्या जवळ सेवाभावाने आणले. टेंबेस्वामी महाराज हे 'एक अतिशय कर्मठ व समाजापासून दूर रहाणारे संन्यासी ' म्हणुनच अनेकांना ज्ञात होते. परंतु श्रीटेंबेस्वामींनी सामान्य संसारी जनांसाठी काय कार्य केलले आहे; हे सदगुरू भाऊंनी अतिशय पोटतिडिकेने व चमत्कार वाटाव्या अशा अनुभवांमधून त्यांच्या भक्तापर्यंत पोचवले.

आपल्या गुरूंच्या कार्याची महती वर्णन करताना सद्गुरू भाऊमहाराजांनी सांगितले की - "निसर्गामध्ये जो वाईट गोष्टींचा प्रभाव आहे त्याला चांगले वळण देऊन उत्तम त-हेने प्रभावित करणे हे सत्पुरूषांच्या हातात आहे. म्हणूनच पुरूषार्थाला किंमत आहे, कर्माला प्राधान्य आहे. हे सर्व माझ्या गुरूंनी, परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवनंद सरस्वती स्वामी महाराजांनी, त्यांच्या ६० वर्षाच्या अवतारकार्यातून सिध्द केले आहे. अशाप्रकारे मानवी जीवनपध्दतीवर नियंत्रण ठेवणा-या वातावरणाचा जो प्रभाव आहे त्याचा अर्थ सांगणारी दोन अक्षरे म्हणजे 'गुरू'. गुरू म्हणजे विश्वामधील तेजाचा प्रभाव होय.

याच अर्थाशी पूर्णपणे ईमान राखत सदगुरू भाऊमहाराजांनी प.प. टेंबेस्वामीमहाराजांच्या जीवनकार्याचा प्रचार आणि प्रसार आजीवन केला. त्याकरिता 'नमो गुरवे वासुदेवाय' या तीन मंत्राक्षरांमध्ये असलेल्या 'कर्मयोग', 'भक्तीयोग' व 'ज्ञानयोग' यापैकी भक्तीमार्गाचा अवलंब करून नामस्मरणाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनांना जीवनातील वास्तवतेची जाणीव करून देत 'अध्यात्म आणि दैनंदिन जीवन' तसेच 'अध्यात्म आणि विज्ञान' हे वेगळे नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे त्यांनी प्रवचनांच्या माध्यमातून तसेच अनुभूतींतून सामान्य जनांना दाखवून दिले. सामान्य जनतेला मार्गदर्शन करण्याची त्यांची कळकळ ही त्यांनी पूर्णत्वास नेलेल्या नामजपाच्या व नामस्मरणांच्या अनेक संकल्पातून सिध्द झाली आहे. हे करीत असताना 'कर्मामध्ये कर्मठपणाचा लवलेशही असता कामा नये, चांगले चिंतन करावे, दुस-याचा हेवा करू नये, दुस-याविषयी कायम सद्भावना ठेवावी' हा संदेश त्यांनी सामान्य जनांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला.

सद्गुरू भाऊमहाराजांच्या संपर्कामध्ये अनेक सत्पुरूष आले. त्यापैकी परमपूज्य दादा महाराज निंबाळकर यांच्या आज्ञेने त्यांनी दर गुरूवारची सायंकाळची ७.२५ ची आरती 'तुकाराम बीज' या तीथिपासून सुरू केली. त्याचप्रमाणे १९८४ साली स्वामी महाराजांच्या पादुकांची स्थापना ज्यांच्या हस्ते केली गेली; त्या इंदोरच्या परमपूज्य नाना महाराज तराणेकारांनी त्यांना आपल्या बरोबर रथामध्ये बसवून घेऊन, एका विशिष्ट वेळी गुरूवर्य भाऊंना सांगितले की "राजाभाऊ, अनुग्रह झाला बरं का"

या दोन्ही सत्पुरूषांचा गुरूवर्य भाऊमहाराजांच्या अध्यात्मिक वाटचालीमध्ये प्रत्यक्ष सहभाग जरी असला तरी त्यांना जो अनुग्रह झाला होता; तो साक्षात् दत्तावतारी प.प. श्रीवासुदेवानंद स्वामी महाराज यांचाच होता व तोही कुठल्याही सत्पुरूषाच्या माध्यमातून न होता साक्षात्काराने झाला होता. त्यामुळेच सद्गुरू भाऊमहाराजांनी टेंबेस्वामी हेच माझे गुरू आहेत व मी त्यांचा एक सेवक आहे हेच कायम सर्वांना सांगितले. येथे एक गोष्ट प्रकर्षाने नमूद करावाशी वाटते की - पं. प. श्रीस्वामी महाराजांच्या जीवनातसुध्दा परमपूज्य मौनीस्वामी महाराज तसेच त्यांचे दंडगुरू परमहंस परिव्राजकाचार्य श्री नारायणानंद सरस्वती असे दोन सत्पुरूप आले. परंतु यापैकी कोणीही त्यांचे गुरू नव्हते; तर प्रत्यक्ष साक्षात् दत्तप्रभू म्हणजेच श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराज हेच त्यांचे गुरू होते; ज्यांच्याशी ते प्रत्यक्ष बोलत असत. म्हणुनच तर त्यांना दत्तावतारी म्हटले गेले.

भक्तांना सदगुरू भाऊंच्या माध्यमातून जरी अनेक अनुभव आले तरी त्यांनी शेवटपर्यंत असे कधीही म्हटले नाही की “मी महाराज आहे. " ते स्वतःला त्यांच्या गुरूंचा एक सेवक समजत. इतके ते आपल्यागुरूचरणी लीन होते. परंतु गुरू-शिष्य परंपरेचा विचार करताना जो मंत्र देतो तोच खरा गुरू होय व ज्याला हा गुरूमंत्र मिळतो तो त्या गुरूचा शिष्य होय. परंतु 'गुरू' या शब्दाचा अर्थच न कळल्यामुळे, गुरू आणि गुरूंचा अतिशय दुर्लभ असा मंत्र मिळून सुध्दा मनुष्यजीव मायेच्या पगडयामुळे किंवा अहंकारामुळे अध्यात्मिक जीवनातील शाश्वत आनंदाला मुकतो. सदगुरू भाऊमहाराजांनी जवळ जवळ साडेचारशेहून अधिक भक्तांना अनुग्रहाचा मंत्र दिला. तथापि, त्या प्रत्येक वेळी ते हेच सांगत की "तुम्ही प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे अनुग्रहित आहात. " परंतु जरी ते असं म्हणाले तरी, ज्यांना सद्गुरू भाऊमहाराजांच्या सगुण रूपातून अनुग्रह मिळाला त्यांचे गुरू सद्गुरू भाऊमहाराजच आहेत व श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे त्यांचे परात्पर गुरू आहेत.

<< Previous      Next >>