|
५. सौ. सरिता सुरेश धारगळकर
मी खरं तर परमपूज्य श्रीकलावती आईची भक्त. आमच्या घरी श्रीकलावती आईची नित्यनियमाने सेवा घडत आहे. श्रीआईच्या कृपेने माझ्याकडून त्यांच्या 'ॐ नमः शिवाय' या जपाचे अनेक नामस्मरण सप्ताह झाले त्याचा आनंद त्याच्यामध्ये सहभागी झालेल्या sarvanna सर्वाना मिळाला. श्रीकलावती आईची भक्त असल्यामुळे मला 'गुरू' या तत्वाविषयी सश्रध्द आदर आहे आणि गुरूंची रूपे जरी निरनिराळी असली तरी गुरूतत्व एकच असते या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे.
त्यामुळेच जेव्हा माझे मानलेले बंधू श्री. दिपक साखळकर हे जेव्हा मला म्हणाले की सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या ७५व्या जयंतीवर्षा प्रित्यर्थ नामस्मरण संकल्प केला आहे, तेव्हा आमच्याकडे यातील एक नामस्मरण करण्याची इच्छा मी त्यांच्याकडे व्यक्त केली. श्रीकलावती आईच्या कृपेमुळेच मला ही इच्छा झाली होती. त्याप्रमाणे या नामस्मरण संकल्पातील २९वे नामस्मरण डिसेंबर २००५ मध्ये आमच्याकडे संपन्न झाले. जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गावर असतो तेव्हा आपल्या जीवनात घडणारी कुठलीही गोष्ट ही उगीचच घडत नसते हा माझा स्वानुभव आहे. हे नामस्मरण माझी गुरूमाऊली श्रीकलावती आई यांनी आमच्या घरी का केले असावे याचा बोध मला त्यानंतर दोनच दिवसांत आला.
माझी मुलगी चैताली एका फोटो स्टुडिओत कॅशियर म्हणून काम करायची. या इथे रोज दोन अडीच लाखाची उलाढाल असायची. आमच्याकडे नामस्मरण झाल्याच्यानंतर दोनच दिवसांनी माझ्या मुलीच्या स्टुडियोच्या मालकाने माझ्या मुलीला बोलावून स्टुडीओच्या कॅशमध्ये दोन ते अडीच लाखाची अफरातफर झाली असल्याचे सांगितले. यामध्ये काही कारण नसताना माझ्या मुलीवरही आळ येऊ शकत होता. मी थक्क झाले.
मी लगेच माझ्या गुरू आईना व सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांना या संकटातून सोडवण्याविषयी विनंती केली. या कॅश काऊंटरला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळया व्यक्ती असल्यामुळे ही अफरातफर कोणी केली हे कळण्यास मार्ग नव्हता. परंतु सदगुरूकृपेने मालकांनी आणि त्यांच्या पत्नीने माझ्या मुलीला सांगितले की “तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे." तरीदेखील यापुढे सावध रहावं म्हणून माझी मुलगी तिथे काम करण्यास तयार नव्हती व अखेर तिने हे काम सोडले. त्यावेळी आश्चर्याची गोष्ट म्हणजे मालकाने व त्यांच्या पत्नीने माझ्या मुलीला आशीर्वाद दिला की “जिथे असशील तिथे सुखी रहा. काही गरज लागल्यास आम्ही आहोत. "
प्रतिकूल घटनेचे अनुकूलतेमध्ये रूपांतर माझ्या या दोन सदगुरू माऊलींनीच तर केले होते. त्यासाठीच संरक्षण कवच म्हणून आमच्याकडून ही अधिकची नामस्मरण सेवा करून घेतली होती हे माझ्या लक्षात यायला वेळ लागला नाही. त्यानंतर सद्गुरू आनंदयोगेश्वरांशी आणि त्यांचे कार्य करणा-या खामकर दांपत्याशी माझे एक वेगळेच नाते जोडले गेले. अशा आत्मिक पातळीवरच्या नात्यांना कुठलेच नांव न देणे योग्य. पण यामुळे दोनदा असे झाले की ज्यावेळी माझ्या घरी श्रीकलावती आईचा सप्ताह किंवा तत्सम कार्यक्रम असायचा त्याचवेळी बरोब्बर हे खामकर दांपत्य आमच्याकडे हजर व्हायचे आणि त्यांच्या माध्यमातून मला सदगुरू आनंदयोगेश्वरांचे आशीर्वाद मिळायचे, ही माझी श्रध्दा आहे. एका गुरुवारी श्रीकलावतीआईचे गुरू परमपूज्य श्रीसिध्दारूढ स्वामी यांची पुण्यतीथि होती आणि त्याच वेळी मला कळले की खामकर दांपत्य कुठल्या तरी कामासाठी गिरगांवमध्ये येणार आहे. मला अत्यानंद झाला. मी सकाळपासून त्यांची वाट पहात होते. पण दुपार होऊन गेली तरी ते आले नाहीत. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ते आले. तोपर्यंत त्यांना हे माहित नव्हते की आज श्रीसिध्दारूढ स्वामींची पुण्यतीथि आहे. मी त्यांना प्रसाद वगैरे दिला. त्यानंतर सहज बोलताना सौ. श्रध्दाताई म्हणाल्या की “खरं तर आम्ही परवा गिरगांवमध्ये येणार होतो; पण माझी तब्बेत अचानक बिघडल्यामुळे आम्हाला आज यावे लागले.”
हे कोणी घडवले? त्यानंतर मी श्री. ख़ामकर यांना नारळ दिला तर तो त्यांनी मला ओटीत परत दिला व सांगितले की “आज संध्याकाळी या नारळाच्या खोब-यामध्ये गूळ घालून तो प्रसाद तुम्ही इथे येणाया भक्तांना श्रीसिध्दारूढ स्वामींचा प्रसाद म्हणून वाटा.” असे सांगून ते निघून गेले.
संध्याकाळी जेव्हा मी नारळ खवला तेव्हा साधारणपणे एका नारळाचे जेवढे खोबरे निघते त्याच्या तीन पटीने खोबरे निघाले. माझा स्वतःवर विश्वासच वसेना. पण हे माझ्यासमोर घडले होते. खरोखरंच सदगुरू आनंदयोगेश्वरांनी श्री. खामकरांना पाठवून, मला माझ्या परात्पर गुरूंचा, श्रीसिध्दारूढ स्वामींचा प्रसाद आज त्यांच्या पुण्यतीथिच्या दिवशी पोचवला. माझ्या साध्या भोळया भक्तीचा खूप मोठा प्रसाद मला सद्गुरूंनी दिला. धन्य ते सद्गुरू!
|