|
४. सौ. ऋता निलेश कोठारे
वास्तविक पाहता पूर्वाश्रमीची मी पूर्णतः नास्तिक होते. देव किंवा पुजा अर्चा यांच्याशी माझा सुतराम संबंध नव्हता. दैवी शक्ती वगैरे सर्व थोतांड आहे व विज्ञान हेच एकमेव वास्तव आहे ही माझी पक्की धारणा होती. परंतु १९८७ साली लग्न होऊन मी ज्या घरची सून झाले ते घराणे अतिशय आस्तिक. नास्तिकता अंगी भिनल्याने आस्तिकतेच्या या वातावरणात सुरूवातीला कुचंबणा होत गेली. पण 'देखल्या देवा दंडवत' याप्रमाणे मी देवाला नमस्कार करू लागले. लग्नानंतर वर्षातच मला मातृत्वाचा लाभ झाला आणि आमच्या प्रपंचाची ख-या अर्थाने सुरूवात झाली. मात्र मुलगी वर्षाची झाली तोच तिच्या आजारपणाला सुरूवात झाली . लहान मुलांची आजारपणं काही नविन नाहीत. पण आमच्या मुलीच्या या आजारपणाने आम्हा उभयतांची त्रेधातिरपीट व्हायची. दोघेही चाकरमानी असल्याने रेल्वे प्रवास, कार्यालय, संसार आणि डॉक्टरी इलाज या प्रपंचाच्या रहाटगाडग्यात पूर्णपणे गुरफटलो. मैत्रिणींकडे मन हलके करण्याचा प्रयत्न केला तर साडेसाती महादशा प्रकोप इ. गोष्टींवर सुनावण्यात आले . माझ्या अशा गोष्टींवर विश्वासच नसल्यामुळे मला ते निरर्थक वाटत असे.
वैद्यकीय इलाज जेव्हा क्षणभंगूर असल्याचा मला प्रत्यय आला तेव्हा माझी मनस्थिती दोलायमान झाली व मनात द्वंद्व सुरू झाले - विज्ञान श्रेष्ठ की विज्ञानापलीकडील शक्ती !
नास्तिकता प्रथम बाजुला सारून मनाने निश्चय केला की विज्ञानेतर जी शक्ती आहे तिचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनुभव घेण्यास काय हरकत आहे? याचवेळी माझ्या आप्तेष्टांकरवी माझा प्रथम संबंध आला तो सद्गुरू भाऊमहाराजांशी . त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी ११ गुरूवार स्थानावरील आरतीस हजर राहिले . नकळत मानसिक संतुलन व स्थैर्य प्राप्त झाल्याची जाणीव होऊ लागली . सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या मुलीचा भेडसावणारा आजार लोप पावला .
त्या ११ गुरूवारनंतरही मी सदगुरू भाऊमहाराजांकडे येत राहिले . त्यामुळे नामस्मरण करण्याची सवय इतकी अंगवळणी पडली की जरा कुठे खट्ट झाले की माझे नामस्मरण चालू होते . कुणालाही हे सांगून खरं वाटणार नाही की माझ्यासारखी एक नास्तिक स्त्री आस्तिकतेचे अनुभव कथन करते आहे . पण केवळ विज्ञानापलीकडे नव्हे तर या विश्वाच्या पलीकडे एक स्वयंशक्ती अस्तित्वात आहे जी भक्तगणास निररािळया रूपात मार्गदर्शन करीत असते. याचा जिवंत आणि साक्षात्कारी अनुभव मी ११ जुलै २००६ या दिवशी घेतला. हा दिवस आणि सद्गुरूंकडून या दिवशी मिळालेली खूप मोठी प्रचिती मी जीवनामध्ये कधीच विसरू शकत नाही.
खरं म्हटलं तर ११ जुलै २००६ हा दिवस त्यादिवशी झालेल्या बॉम्ब स्फोट मालिकेमुळे मुंबईतील एकही व्यक्ती विसरू शकणार नाही. योगायोगाने त्यादिवशी सर्व भक्तांच्या जीवनातील महत्वपूर्ण असा गुरूपौर्णिमेचा दिवस होता. मी सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या पादुका स्थानावरील कार्यक्रमाला गेले होते. संध्याकाळचे नामस्मरण संपले आणि सदगुरूंच्या पाद्यपूजेला सुरूवात होणार इतक्यात ही भयानक बातमी कोणीतरी घेऊन आले. या बातमीतील काही डिटेल्स ऐकले आणि माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण त्यात चर्चगेट स्टेशनवरून सुटणा-या ज्या गाडीचा उल्लेख केला होता त्याच गाडीने माझे यजमान दररोज ऑफीसमधून येतात.
आता माझे मन पाद्यपूजनामध्ये लागेना. माझ्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. त्यावेळी श्री. विकास व सौ. श्रध्दा मला म्हणाले की "अशा अवस्थेत तुमचे पाद्यपूजनामध्ये लक्ष लागणे शक्य नाही. शिवाय तुमच्या यजमानांनी जर का त्यांची खुशाली कळवण्यासाठी बाहेरून कुठून फोन केला तर त्यावेळी तुम्ही तुमच्या घरी असणे आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही आता लगेच तुमच्या घरी जा.' त्याचप्रमाणे त्यांनी मला धीर देताना सांगितले की "तुम्ही गेला एक तास सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये त्यांच्या चरणांशी आहात. सद्गुरू नक्की तुमच्या यजमानांची काळजी घेतील. जेव्हा ते घरी येतील तेव्हा त्यांना एकदा इथे घेऊन यायला विसरू नका.
मी मघाशी म्हटल्याप्रमाणे विश्वातील सद्गुरूरूपी स्वयंशक्तीचा प्रत्यय मी यावेळी घेतला. आता मला हे लिहिणे व वाचकांना वाचणे जरी सोपे वाटत असले तरी ज्या स्त्रीचा पती त्याच ट्रेनने त्याच डब्यात बसून रोज प्रवास करतो तिच्या मनस्थितीची कल्पना करा. पण श्री. खामकरांनी सांगितल्याप्रमाणे 'सदगुरू तारी `त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय मी त्यादिवशी घेतला. रात्री १२ वाजल्यानंतर घरी आलेल्या माझ्या यजमानांनी सांगितलेली कथा अशी :
कशामुळे तरी त्यांना त्यादिवशी बँकेतून निघण्यास दोन तीन मिनिटे उशीर झाला. ते जेव्हा प्लॅटफॉर्मवर पोचले तेव्हा त्यांची ती नेहमीची ट्रेन आधीच लागलेली होती. त्यांच्या नेहमीच्या फर्स्ट क्लासच्या डब्यापर्यंत जाईस्तोवर ती गाडी सुटणार म्हणुन कधी नव्हे ते त्यांनी, त्याच ट्रेनचा, सुरूवातीचा फर्स्ट क्लासचा डबा पकडला. आणि त्याच ट्रेनला खारच्या जवळ तो जीवघेणा बॉम्बस्फोट झाला. एवढा मोठा आवाज आल्याने त्यांनी बाहेर पाहिले तर ते दृष्य बघून त्यांच्या अंगावर काटा आला. त्यांना जबरदस्त धक्का बसला होता. घरी आल्यावरही ते जास्त काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. हे सर्व ऐकल्यानंतर माझ्याही अंगावर काटा आला व त्याचबरोबर खामकरांचे शब्द आठवले की “तुम्ही गेला एक तास सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये त्यांच्या चरणांशी आहात . सदगुरू नक्की तुमच्या यजमानांची काळजी घेतील .” सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांविषयीच्या कृतज्ञेतेने माझा ऊर भरून आला व खामकरांनी सांगितल्याप्रमाणे मी लगेच दुस-या दिवशी माझ्या यजमानांना घेऊन सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या पादुका स्थानावर गेले. सद्गुरूंचे मनःपूर्वक आभार मानले.
या जिवंत अशा अनुभूतीतूनच मी हे म्हणू शकते की जिथे श्रध्दा तिथे नामस्मरण साधना जिथे साधना तिथे नित्य उपासना.... तिथेच वसती गुरूराया . . !
|