सर्व हकीकत भाऊंच्या कानावर घातली. भाऊमहाराज म्हणाले, "काही होणार नाही. त्याला नामस्मरण करायला सांग व एक्साईज ऑफिसमध्ये जाऊन जे काही खरे असेल ते सांगून टाकायला सांग. त्याचे कोणी काही बिघडवणार नाही. महाराज आहेत ना ! ते बघून घेतील."
मी भाऊंनी सांगितल्याप्रमाणे सतत नामस्मरण करीत होतो आणि म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी'! त्याप्रमाणे साक्षात सद्गुरुच पाठीशी उभे असतील तर घाबरण्याचे कारणच काय ?
सेन्ट्रल एक्साईजच्या कमिशनरची माझ्या काकांशी ओळख निघाली. इतका मोठा माणूस हा आपल्या ओळखीचा निघू शकतो यावर विश्वासच बसत नव्हता. पण ज्यांनी सद्गुरुंना ओळखलं असेल त्यांची सद्गुरु कोणाशीही ओळख घालून देतात.
कमिशनरने आम्हाला विश्वासात घेतले. कोर्टात चालणाऱ्या केसमध्ये सुरुवातीला मॅजिस्ट्रेटने त्यांना फैलावर घेतले होते की, "त्यांनी मला अटक का केली नाही." नंतर मी त्या कंपनीचा फक्त एक एम्प्लॉयी आहे असं म्हणत एक्साईजच्या माणसांनी या मुद्याला गौण वळण दिले. पुढे मी भाऊंच्या सांगण्याप्रमाणे खरी स्टेटमेंट देऊन टाकली व सतत आठ दिवस चाललेला त्या एक्साईजच्या सेसेमिऱ्याचा शेवट झाला.
आजही आनंदयोगेश्वर गुरुवर्य भाऊंची स्पंदने जाणवतात. आजही अनुभूती मिळते की माझे गुरुभाऊ माझ्याबरोबर आहेत. सद्गुरु भाऊमहाराजांकडे आपल्याला देण्यासारखे पुष्कळ आहे. आपल्यासारख्या सामान्य माणसांचे हातच ते घेण्यासाठी तोकडे पडतात. त्यांना माहीत असते कोणाला केव्हा आणि काय द्यायचे आहे. म्हणूनच आपण सामान्य माणसांनी फार विचार न करता सद्गुरुंनी दाखवलेल्या मार्गावरून चालत रहावे व मुखामध्ये सतत त्यांचे नाम ठेवावे - 'नमो गुरवे निळकंठाय'.
श्री. अवधूत कुलकर्णी
सद्गुरु भाऊ महाराजांकडे मी १९७८ पासून जात होतो. तेव्हा भाऊंच्या घरी आम्ही फक्त १५-१६ भक्त आरती करत असू. मी कॉलेजमध्ये इंटरला असताना एका विषयात (Secretarial Practice) नापास झालो. मी जेव्हा भाऊ महाराराजांना सांगितले तेव्हा भाऊ म्हणाले, "तू पास झाला आहेस. तू verification साठी अर्ज कर." त्याप्रमाणे मी अर्ज केला. तीन महिने झाले तरी विद्यापीठाकडून काही उत्तर आले नाही. भाऊ महाराज मात्र पुन्हा पुन्हा सांगत होते की, "तू पास झाला आहेस."
शेवटी मी ऑक्टोबरच्या परीक्षेला बसण्यासाठी पैसे भरले. काही दिवसांत मला विद्यापीठाचे पत्र आले की पास झालो आहे. त्यांनी चुकून पेपरचा एकच सेक्शन चेक केला होता व दुसरा सेक्शन न तपासता त्यांनी मला नापास केले होते. गुरुवर्य भाऊंचे शब्द शेवटी खरे ठरले आणि माझे वर्ष फुकट गेले नाही.
मी जेव्हा बी. कॉमच्या शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा गुरुवर्य भाऊंनी मला सांगितले की तू कितीही प्रयत्न केलेस तरी १९८३ सालाशिवाय बीकॉम पास होणार नाही. तेव्हा तू ही तीन वर्षे फुकट न घालवता नोकरी कर. भाऊंनी माझ्या मागे नोकरीचा सपाटा लावला होता. मला एकदाची नोकरी मिळाली व कोहिनूर टेक्निकलमध्ये क्लार्क म्हणून मी नोकरीला लागलो.
नोकरीची वेळ सकाळी ११.१५ ते रा.९.१५ अशी होती. १० तास नोकरी. माझी आई संधिवाताने आजारी असायची. त्यामुळे ती नेहमी मला ओरडत असे की, "ही नोकरी सोड व दुसरी बघ." माझी अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी झाली होती. इकडे आई नोकरी सोड म्हणून मागे लागायची व गुरुवारी भाऊ महाराजांकडे गेलो की काही बोलायच्या आतच भाऊ सांगायचे ही नोकरी सोडायची नाही. एक दिवस आई एवढी बोलली की घरी पूजा करताना दत्तमहाराजांच्या फोटोसमोर उभा राहून भरपूर रडलो व सांगितले, "आता तुम्हीच तारा". सकाळी भाऊंच्या घरी गेलो.
भाऊ बाहेर आले. त्यांनी माझ्या हातावर पेढा ठेवला व म्हणाले, "रडतोस काय? ही नोकरी सोडायची नाहीस. नोकरी सोडून परत माझ्याकडे नोकरीचा प्रॉब्लेम घेऊन आलास तर तुला लाथ मारून हाकलून देईन."
नंतर माझ्या पाठीवर हात फिरवीत त्यांनी या नोकरीत मला पुढे काय अडचणी येणार आहेत व माझ्यावर काय आळ येणार आहे ते सर्व सांगितले. पण तरीही ही नोकरी तू सोडायची नाही हे त्यांचे म्हणणे कायम होते. गुरुंची आज्ञा म्हणून त्यांनी सांगितल्याप्रमाणे नोकरी सोडलीं नाही. त्याचप्रमाणे खरोखरच त्या नोकरीत मला भरपूर अडचणींना तोंड द्यावे लागले. म्हणता म्हणता तीन वर्षे पूर्ण झाली व ऑगस्ट १९८३ ला भाऊ महाराज मला म्हणाले, "आता तू परीक्षेला बस. आता तू पास होणार. आता तू नोकरीही सोड."
मी दुसऱ्या दिवशी नोकरीचा राजीनामा दिला. मला संस्थेने सांगितले, "तू नोकरी सोडू नकोस तुझा पगार वाढवतो. तू भरपगारी रजा घे." पण सद्गुरु भाऊंवरील अढळ श्रद्धेमुळे मी नोकरी सोडून दिली. मला परीक्षेचा अभ्यास करण्यास फक्त २५ दिवस मिळाले. मी रात्रंदिवस अभ्यास केला. मित्राकडून नोट्स घेतल्या. सद्गुरूंची कृपा काय असू शकते ! Accounts या विषयात Paper I व Paper II मध्ये सरावासाठी जे problems सोडलवले होते ते तसेच्या तसे (with name, fullstop and commas) आल्यामुळे मी उत्तम रीतीने बी.कॉम झालो.
माझे हित कशात आहे हे सद्गुरु भाऊंना माहित होते. त्याचबरोबर तीन वर्षाची सबुरी ही गुरूंनी माझी घेतलेली परीक्षाच होती. या श्रध्दा आणि सबुरीमुळेच माझ्या गुरुवर्य भाऊमहाराजांनीच मला या दोन्ही परीक्षांमध्ये पास केले.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|