|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

श्री. विकास नागवेकर, बोरिवली

माझ्या आनंदयोगेश्वर सद्गुरुंनी माझ्या जीवनात लहान सहान गोष्टीतही इतक्या प्रकारे प्रचिती दिली आहे की सर्व लिहावे म्हटले तर हा जन्म अपुरा पडेल. सद्गुरु भाऊमहाराज जेव्हा दर गुरुवारी व शनिवारी स्थानावर आरतीनंतर प्रवचन करायचे तेव्हा ते जवळ जवळ आपल्यालाच उद्देशून बोलत आहेत असे प्रत्येकाला वाटायचे.

जुलै १९९६ महिन्यातील शेवटचा आठवडा होता. रविवार १८.७.१९९६ रोजी संध्याकाळी मला माझ्या भावाचा गावावरुन फोन आला की माझा भाऊ 'बाळा' खूप आजारी आहे. त्याला हॉस्पिटलमध्ये ठेवले आहे. हे ऐकून मी अस्वस्थ झालो व तडक भाऊ महाराजांना भेटण्यासाठी बोरिवली येथील स्थानावर आलो. तेव्हा कळले की भाऊ महाराज अजून खोपोलीहून आलेले नाहीत.

दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुरुवर्य भाऊ महाराज खोपोली येथील स्थानावर असायचे. म्हणून प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना भावाची प्रकृती ठीक व्हावी यासाठी प्रार्थना केली. मी स्थानावर बसून राहिलो आणि रात्री ९.३० वाजता भाऊ महाराज स्थानावर आल्यानंतर मी त्यांना भेटून सर्व हकीकत सांगितली. तेव्हा त्यांनी मला स्थानावर जपासाठी बसायला सांगितले. भाऊंनी सांगितल्याप्रमाणे मी, माझी पत्नी व दुसरा भाऊ आम्ही तिघांनी मिळून रविवार रात्री १० वाजल्यापासून ते सोमवार रात्री १२ वाजेपर्यंत जप केला. दुसऱ्याच दिवशी गुरुपौर्णिमा होती. सकाळी सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे पूजन केले आणि संध्याकाळी ६ वाजता गावाहून पुन्हा फोन आला की भावाची प्रकृती चिंताजनक आहे. तेव्हा लगेच गावाला निघून या.

मी व माझा दुसरा भाऊ आम्ही लगेच गावाला हॉस्पिटलमध्ये गेलो. डॉक्टर म्हणाले ही केस आता इथे वाचू शकत नाही. आम्ही आमचे सर्व प्रयत्न केले. याला ताबडतोब मुंबईला घेऊन जा. नाहीतर याच्या जीवाला धोका आहे.

तेव्हा आम्ही डॉक्टरांना सांगितले की, "अशा परिस्थितीत आम्ही याला कसे नेणार ? आम्ही २ दिवस वाट बघतो. तुमचे प्रयत्न चालूच ठेवा. नंतर निर्णय घेतो." डॉक्टर म्हणाले, "ठीक आहे, पण आम्हाला दोष देऊ नका" आणि ते निघून गेले. मी माझ्या खिशातील विभूतीची पुडी काढली, टेंबे स्वामी महाराज तसेच सद्गुरु भाऊ महाराज यांचे स्मरण केले व सद्गुरु भाऊंनीच दिलेली विभुती माझ्या भावाच्या कपाळाला लावली.

आणि काय आश्चर्य ! त्याच दिवशी संध्याकाळपासून कॉटवर पडून मृत्यूला घाबरुन रडणारा माझा भाऊ चक्क ताजातवाना होऊन हसायला लागला. त्याची तब्बेत सुधारू लागली. त्यावर डॉक्टर म्हणाले, "खरेच ही फक्त देवाची कृपा." पण माझ्या दृष्टीने ही आमच्या सद्गुरु भाऊ महाराजांचीच कृपा होती.

आठ दिवसांनी आम्ही गावाहून परतल्यानंतर सद्गुरु भाऊंना जाऊन भेटलो आणि सांगितले, "भाऊ, डॉक्टर म्हणाले होते ही तुमची केस जाणार आहे.

तेव्हा त्याला घरी तरी न्या किंवा मुंबईला हलवा. पण तुम्ही दिलेली आम्ही विभुती लावली आणि चमत्कारच घडला."

त्यावर भाऊमहाराज म्हणाले, "अरे, तुमची केस कशी जाईल. मी इथे कशाला बसलो आहे?" हाच माझ्या पाठीशी असलेला माझ्या सद्गुरु भाऊमहाराजांचा कृपाशिर्वाद.

म्हणून सांगतो 'सद्गुरु स्मरण करा. त्यांनी सांगितल्याप्रमाणे नमाजप व नामस्मरण केल्याने आपल्यावरील संकट, आपत्ती टळली म्हणून समजा किंवा त्यांना सामोरे जाण्यासाठी लागणारी सहनशक्ती, सहनशीलता मिळालीच म्हणून समजा.’ हा माझा स्वानुभव आहे.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>