सौ. अनिता अनंत चव्हाण, दहिसर
१९८४ साली एका गुरुवारी माझ्या परिचयाच्या एका बाईंबरोबर मी सर्वप्रथम या स्थानावर आले. तेथील प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुका व तसबीर, नामस्मरणाचे पवित्र असे वातावरण, सामुदायिक पण एका सुरात होणारी आरती व त्यानंतर सद्गुरु भाऊमहाराजांचे रसाळ वाणीतील सुबोध प्रवचन तसेच भाऊंचे प्रसन्न व्यक्तिमत्व अशा अनेक गोष्टींनी माझ्या मनाला अतिशय बरे व शांत वाटले. त्यानंतर मी नित्यनियमाने स्थानावर येऊ लागले व नामस्मरण करू लागले. त्यावेळी मला फार धाप लागे परंतु आरतीला यायला सुरुवात केल्यापासून माझी व्याधी कमी झाली.
१९९२ साली माझे यजमान आजारी होते. डॉक्टरांनी औषध दिले परंतु घरी आल्यावर त्यांची प्रकृती जास्तच बिघडली. "माझ्या पोटात आग भडकली आहे. तू जे काही असेल ते मला जेवायला दे." असे ते म्हणाले. परंतु जेवल्यानंतर त्यांना शौचास होते असे वाटू लागले. पण शौचास मात्र होत नव्हते. मी त्यांना दुसऱ्या डॉक्टरकडे नेले. त्यांनी कार्डिओग्राफ काढला व ते म्हणाले, "यांना जोराचा अटॅक आहे; त्यामुळे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यावे लागेल." मी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मनामध्ये भाऊ महाराजांचा धावा चालूच होता.
त्याचवेळी गुरुवर्य भाऊ परदेश दौऱ्यावर गेले होते. डॉक्टरांनी यजमानांना तपासून कार्डिओग्राफ यंत्र सुरूच ठेवले व यजमानांसाठी ४,००० रुपये एक इंजेक्शन आणायला सांगितले. ते इंजेक्शन डॉक्टरांकडे उपलब्ध नव्हते. माझ्याजवळ तर पैसे नव्हते. महाराजांचा धावा करीतच मी घरी आले. आमच्या परिचयाच्या एका व्यक्तीस मी सर्व सांगितले. त्यांनी मला त्वरित १०,००० रुपये दिले. इंजेक्शन दिल्यानंतर यजमानांना बरे वाटले.
त्याचवेळी सद्गुरु भाऊ परदेश दौऱ्यावरून परत आले. मला हे कळल्यावर मी लगेच त्यांना भेटण्यास स्थानावर गेले व भाऊंना सर्व सांगितले. भाऊ म्हणाले, "तू लगेच स्थानावर बसून अखंड नामस्मरणाला सुरुवात कर." मी म्हटले, "माझे घरचे काम, हॉस्पिटलमध्ये जाणे यामध्ये माझी फारच धावपळ होते आहे. या धावपळीत मला अखंड नामजप कसे जमणार ?" भाऊ महाराज म्हणाले, "अगं, तू आसन तर मांड. स्थानाची मंडळी तुला सांभाळून घेतील." त्याप्रमाणे मी नामजपासाठी आसन मांडले व नामस्मरण सुरु केले. त्यानंतर गुरुभाऊ खोपोली येथील स्थानावर गेले.
माझे यजमान हॉस्पिटलमध्येच होते. नेहमीप्रमाणे मी हॉस्पिटलमध्ये गेले असता ते बेचैन झाल्याचे मला दिसले. डॉक्टरांनी लावलेले कार्डिओग्राफ यंत्र यजमानांनी काढून टाकले अन ते एकदम निपचित पडले. त्यांची काहीच हालचाल दिसेना. मी फारच घाबरले व "सिस्टर, सिस्टर" अशा हाका मारू लागले. डॉक्टरांनी येऊन कार्डिओग्राफ यंत्र सुरु करण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी खोपोली येथे गुरुवर्य भाऊमहाराजांचे दर्शन घेतेवेळी माझ्या मैत्रिणीने विचारले, "भाऊ, माझ्या मैत्रिणीचे यजमान हॉस्पिटलमध्ये आहेत. त्यांचे आता कसे आहे?" यावर "आता धोका टळला." असे भाऊंनी पटकन सांगितले. अन त्याचवेळी इकडे डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश येऊन कार्डिओग्राफ यंत्र सुरु झाले. आणि माझ्या यजमानांना त्यावेळी जीवदान मिळाले.
त्यानंतर एका गुरुवारी रात्री दिड वाजता त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. मी त्यांना पेज करून दिली. काहीच गुण येईना. मी अडीच वाजता स्नान करून जपाला बसले. महाराजांना साकडे घातले की 'माझ्या हातात आता काही नाही. सर्व काही आपल्याच हातात आहे." त्यावेळी गुरुवर्य भाऊ गुरुवारी रात्री स्थानावर रहात असत. मी पावणे चार वाजता यजमानांना घेऊन स्थानावर जाण्यास निघाले. बाहेर रस्त्यावर कोणीच दिसेना. माझा नामजप चालूच होता.
काही अंतर चालून पुढे गेल्यानंतर थकवा आला आणि आता मी यजमानांना घेऊन पुढे किंवा मागे कुठेच जाऊ शकत नव्हते. इतक्यात अचानक एक रिक्शा जराही आवाज न करता आमच्याजवळ येऊन थांबली. "कुठे जायचे आहे ?" यावर "दौलत नगर येथे स्थानावर जायचे आहे" असे सांगून मी यजमानांना घेऊन रिक्शात बसले. "स्थानावर जायचे आहे? डॉक्टरांकडे का नाही?" असे रिक्शा चालवणाऱ्या सदगृहस्थाने विचारले. मी काही बोलले नाही.
आम्ही स्थानावर आलो. भाऊ महाराजांनी मला बसण्यास सांगितले. माझा धावा सुरुच होता. "मी यजमानांना तुमच्या पायाशी आणले आहे. आता तुम्हीच वाचवा." काकड आरती झाल्यावर मी भाऊंना खोलीत जाऊन भेटले. भाऊ महाराज गादीवर बसले होते. त्यांनी माझ्या यजमानांकडे काही वेळ पाहिले व मला त्यांना डॉक्टरकडे घेऊन जाण्यास सांगितले. आम्ही भाऊ महाराजांच्या खोलीतून बाहेर आलो. इतक्यात स्थानावरील एका भक्ताने मला तुम्हाला पादुकांवरची फुले देऊ का ? असे विचारले. मी फुले घेतली व घरी येण्यास निघाले. वाटेत यजमानांची तब्येत अधिकच बिघडल्यासारखे वाटले. घरी आल्यावर त्या फुलांचा वास घेऊन ती निर्माल्यात ठेवण्यास मुलाला सांगितले. तो निर्माल्यात ठेवणार इतक्यात त्याला त्यात एक पुडी सापडली.
ती पुडी मी सोडून पाहिली तर त्यात लालभडक कुंकू होते. ते कुंकू घेऊन मी घरातील महाराजांच्या तसबिरीपुढे उभे राहिले व ते माझ्या कपाळी लावले. त्याबरोबर आता माझ्या यजमानांना काही धोका नाही असा दृढविश्वास मला वाटू लागला. मी यजमानांना घेऊन डॉक्टरकडे गेले तेव्हा ते म्हणाले आता आलेला अटॅक सौम्य होता. विशेष म्हणजे त्यांनी काहीच फी न घेता औषधोपचार केले. त्यानंतरही आम्ही २ ते ३ वेळा त्या डॉक्टरांकडे गेलो. त्या प्रत्येक वेळी त्यांनी मोफत औषधोपचार केले.
आता आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊ महाराजांच्या कृपेने माझ्या यजमानांची प्रकृती बरी असते. खरोखरच माझ्या यजमानांचा पुनर्जन्म झाला. इतकेच नव्हे तर आमची आर्थिक परिस्थितीसुद्धा समाधानकारक आहे. ही सर्व प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व गुरुवर्य भाऊ यांचीच कृपा आहे. गुरुवर्य भाऊमहाराजांचे आम्ही शतशः ऋणी आहोत.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|