|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

भारती कुलकर्णी, गोराई, बोरिवली

जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य स्वतःचे जीवन सौख्याचे व आनंदमय व्हावे म्हणून धडपडत असतो. याकरिता कोणी अमृतयोगाची साधना करतात तर कोणी गुरुदर्शनासाठी तळमळत असतात. सुख व यशाची प्रत्येकाची कल्पना वेगवेगळी असते. पण अशा साऱ्या धडपडीत मानवी जीवनातील एखादा लहानसा क्षणदेखील त्याच्या जीवनामध्ये आमुलाग्र बदल घडवून आणतो. असाच सुवर्णक्षणाचा लाभ आनंदयोगेश्वर गुरुवर्य भाऊमहाराजांच्या दर्शनाने व मार्गदर्शनाने आम्हाला झाला.

त्यापूर्वी मी देवाची भक्ती कधीच केली नव्हती. लहानपणी काही स्तोत्रे म्हटली असतील तेवढीच. पण अचानक जीवनामध्ये अशी काही समस्या निर्माण झाली ज्यामुळे मी अंतर्बाह्य घाबरुन गेले. त्यावेळी माझ्या भावाने मला सतत एक मंत्र म्हणण्यास सांगितला व एक विभुतीची पुडी देऊन तो म्हणाला, 'ही विभुती सतत लावत जा. नंतर मी तुला सद्गुरु भाऊ महाराजांच्या दर्शनाला घेऊन जाईन."

त्यावेळी आम्ही वाशी येथे रहात असू. मी सुरुवात केली मात्र आणि काय चमत्कार! त्या विभुती लावण्याने व नामजप करण्याने माझी समस्या दूर झाली व मला आता परमपूज्य गुरुवर्य भाऊ महाराजांना पहाण्याची, त्यांना भेटण्याची ओढ निर्माण झाली. परंतु स्थानाचा बोरिवली स्टेशनपासूनचा पत्ता आम्हाला माहित नव्हता. पण बोरिवली स्टेशनला उतरल्यानंतर आमच्या गप्पा ऐकून एका बाईने आम्हाला आपणहूनच स्थानावरती जाण्याचा मार्ग दाखवला.

आम्ही आनंदयोगेश्वर भाऊ महाराजांचे दर्शन घेतले. कुठलीही भगवी कफनी न घातलेल्या तरीही सामन्यांमध्ये असामान्य दिसणाऱ्या, नजरेमध्ये प्रखर तेज असलेला व सर्व लहान थोर भक्तांशी सारख्याच आपुलकीने बोलणाऱ्या त्या योगी पुरुषाला पहाताच माझे मन शांत झाले. सद्गुरुदर्शन ते हेच याची खात्री पटली. त्या दिवसांपासून मी नियमाने स्थानावर जाऊ लागले. गुरुवर्य भाऊमहाराजांचे मार्गदर्शन घेऊ लागले व माझ्या जीवनातील बऱ्याचशा समस्यांची उकल होऊन माझे जीवन अधिकाधिक आनंदमय, समाधानी झाले.

दिनांक २० ऑक्टोबर, ९८ या दिवशी मला अचानक थंडी वाजून खूप ताप आला. डॉक्टरांच्या तपासणीमध्ये 'मलेरिया' सांगितला गेला. त्याप्रमाणे इलाज चालू झाले. पण मला त्या औषधांची रिऍक्शन झाली. आधीच ऍसिडिटी खूप वाढलेली होती. जेवणही जाईना. पोटात खूप दुखत होते. त्रास सहन होत नव्हता. मला सलाईनवर ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. ऍसिडिटी कमी होण्यासाठी रोज एक इंजेक्शन घ्यावे लागत होते.

२५ तारखेला आमच्या शेजारच्या घरी गुरुवर्य भाऊ येणार असे मला कळले आणि मला खूप आनंद झाला. मी धडपडत का होईना, कशीतरी त्यांच्या दर्शनाला गेले. माझी अवस्था पाहून त्यांनी दर्शनाच्या वेळी माझे मनगट घट्ट धरले आणि म्हणाले, "या गुरुवारपर्यंत तू संपूर्ण बरी होशील." त्यांनी मला काही आयुर्वेदिक औषधे लिहून दिली आणि सतत "घोरातकष्टात" हे स्वामी महाराजांनी रचलेले स्तोत्र म्हणण्यास सांगितले.

खरोखरच घोरातकष्टात या स्तोत्रात व सद्गुरुंच्या विभूतीमध्ये खूप शक्ती असते. मी अनुभवली आहे. गुरुवारपर्यंत मला बरं वाटले. डॉक्टर व इतर लोकांना नवल वाटले की औषध न घेता हिचा मलेरिया कसा काय बरा झाला ! ही सारी सद्गुरु भाऊ महाराजांचीच किमया, लीला होय.

गुरुवारी व शनिवारी नेमाने होणाऱ्या आनंदयोगेश्वरांचे प्रवचन मी चुकवत नसे. प्रवचनात अनेक लहान सहान वाक्यांमधून खूप सखोल अर्थ प्राप्त होई. असे वाटत असे की सद्गुरु भाऊंनी बोलत रहावे व त्यांची अमृतमय अशी वाणी आम्ही ऐकत रहावी.

आज सद्गुरु भाऊ महाराज जरी देहरुपात आमच्याबरोबर नसले तरी त्यांची अमृतवाणी आमच्या कानात व हृदयात सतत गुंजते आहे. त्यांची कृपादृष्टी आमच्यावर कायम रहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>