|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

श्री गोविंद खताळ, बोरिवली

मी व माझी पत्नी गेली ९ वर्षे दर गुरुवारी आरतीला येतो. एकदा १५ मे १९९८ या दिवशी सायंकाळी ठीक ५.१५ वाजता मी व माझी पत्नी किचनमध्ये चहा पीत बसलो होतो. आमच्या घराच्या माळ्यावर (जो जवळ जवळ ९ फूट उंच आहे) माझा मुलगा प्रशांत व मुलगी विनिता ही दोघे कॅरम खेळत होती. इतक्यात दोघांमध्ये खेळता खेळता भांडण झाले व विनिता रागाने भावाला म्हणाली, "प्रशांत, तू फार चिडतोस. मी तुझ्याबरोबर खेळणार नाही." ती उभी राहिली व खाली येण्यास निघाली, तेव्हा माझ्या मुलाने, प्रशांतने तिला रागाने धक्का मारला व ती खाली पडली.

तिने जोरात मारलेल्या "आई" या हाकेने एक क्षण आम्हाला काही कळले नाही. परंतु खाली पडण्याचा इतका मोठा आवाज आला की आम्ही दोघे धावत बाहेर आलो. पहातो तर काय ! अंगावर एकदम काटा आला. माझी पत्नी जोरात रडायला लागली कारण माझी मुलगी विनिता ही १२ फूट लांब दरवाजाजवळ पडली होती. तिची एक मांडी घडी घातलेल्या अवस्थेत तर एक पाय लांब सोडलेला होता व दोन्ही हात खाली टेकलेले होते. मी तिला उचलले तेव्हा तिने एकदम डोळे उघडले व रडायला लागली.

इतक्या उंचावरून खाली पडूनही तिला साधे खरचटलेही नव्हते याचे आम्हाला आश्चर्य वाटले. जीव भांड्यात पडला. तिला "काय झाले?" असे विचारले असता ती रडत रडत म्हणाली, "मला जेव्हा प्रशांतने खाली ढकलले तेव्हा मी एकदम 'आई' म्हणून ओरडले व डोळे बंद केले. समोर फक्त अंधार दिसत होता. तेव्हा मला आपले भाऊआजोबा दिसले. त्यांनी मला आपल्या हातावर उचलले व खाली ठेवले. नंतर कुठे गेले माहित नाही." ती अत्यंत निरागसपणे सांगत होती व आमच्या डोळ्यातून मात्र अश्रू वहात होते. क्षणात आम्ही सद्गुरु भाऊमहाराजांचे स्मरण केले व त्यांच्या चरणी नमस्कार केला.

ज्यांची पंचमहाभूततत्वांवर सत्ता चालते अशी थोर विभूतीच असे चमत्कार घडवू शकते. आपल्या भक्तांना तारण्यासाठी, भक्ताला या भक्तिमार्गाची गोडी लावण्यासाठी व त्याने संपूर्ण जीवन योग्य मार्गाने मार्गक्रमणा करावी यासाठीच तर भाऊंसारखे वास्तववादी सत्पुरुषही केव्हातरी असे साक्षात्कारी अनुभव देऊन भक्ताला कृतकृत्य करतात.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

कु. रश्मी नारकर, गोरेगाव

मी स्थानावर १९९१ साली आले. हळूहळू नामस्मरणाची, आरतीची गोडी लागत होती. मी व माझ्या आईने जेव्हा पहिल्यांदा सद्गुरु भाऊंमहाराजांना नंबरमध्ये जाऊन आमची समस्या सांगितली तेव्हा भाऊमहाराज म्हणाले, "चिंता करू नका. ११ गुरुवार आरतीला या. सर्व काही चांगलं होईल." त्यावेळी १११ भक्तांच्या घरी नामस्मरणाचा संकल्प चालू होता. असेच एकदा मी व आई दहिसर येथील एका नामस्मरणावरुन घरी आलो तर वडिलांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याचे समजले. आम्ही सर्वजण घाबरलो होतो कारण डॉक्टरांना वडिलांच्या बाबतीत पॅरालीसिसचा संशय येत होता.

इतक्यात मला गुरुभाऊंचे शब्द आठवले. मी भाऊंमहाराजांना हाक मारली, "भाऊ, तुम्हीच म्हणाला होतात ना की सर्व काही चांगलं होईल. मग हे काय? माझ्या वडिलांना लवकर बरं वाटू दे."आणि मी नामजप करण्यास बसले. दुसऱ्या दिवशी वडिलांच्या सर्व टेस्ट्स झाल्या आणि काय आश्चर्य ! सर्व रिपोर्ट्स नॉर्मल होते. डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले कारण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वडिलांना खरंच पॅरॅलिसिसचा धोका होता. पण माझ्या आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊ महाराजांनी आपला शब्द खरा केला होता. आणि माझी भाऊचरणी श्रद्धा अधिकच दृढ झाली.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>