गुरुचरित्र श्रवण करण्याचा पहिला योग मला १९९२ साली आला. भाऊ नेहमी सांगायचे की, "संकल्पपूर्वक सातही दिवस गुरुचरित्राचे श्रवण करा मग बघा तुम्हाला काय आनंद मिळतो ते !" पण असा काही संकल्प करण्याचे माझ्या लक्षातच आले नाही. सातही दिवस मी 'श्री गुरुचरित्र' श्रवणाचा लाभ व आनंद घेतला.
सातव्या म्हणजे गाणगापूर यात्रेच्या दिवशी आरती झाल्यावर नेहमीप्रमाणे गुरुवर्य भाऊमहाराजांना नमस्कार करण्यासाठी रांग लागली. भाऊ आपल्या खोलीत गादीवर बसले होते व काही स्वयंसेवक भक्त त्यांची चरणसेवा करीत होते. एकेक भक्त भाऊंना नमस्कार करुन पुढे जात होते. भाऊ मात्र त्या बाजूला बसलेल्या स्वयंसेवक भक्तांशी काहीतरी बोलण्यात गुंग झाले होते. त्यामुळे त्यांची नजर नमस्कार करून जाणाऱ्या भक्तांकडे नव्हती.
हे सर्व मी बघत होते. मी मनात भाऊमहाराजांना म्हटले, "भाऊ, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी काही संकल्प वगैरे करुन सात दिवस बसले नाही. पण जर का माझ्याकडून खरोखरंच गुरुचरित्र श्रवण मनापासून झाले असेल तर त्याची खूण म्हणून माझ्याकडे बघून एकदाच आशीर्वाद द्या." मी नमस्कार करायला खाली वाकले आणि नमस्कार करुन भाऊंकडे पाहिले तर जे भाऊमहाराज एवढा वेळ स्वयंसेवकांशी बोलत होते त्यांनी मान माझ्याकडे वळवली व एक हात वर करुन मला आशीर्वाद दिला. त्यावेळी प्रथमच मी भाऊंचे तेज अनुभवले. त्यांची ती सोवळ्यातील तेजोमय मूर्ती पाहून माझे भान हरपले. तेव्हा मी अनुभवलेली ती सद्गुरुंची स्पंदने माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडची होती. मी नमस्कार केल्यानंतर भाऊ महाराज पुन्हा स्वयंसेवकांशी बोलायला लागले.
खरं म्हणजे मला याची जाणीव आहे की सद्गुरुंचे सर्व भक्तांवर पूर्ण लक्ष असते; भले मग त्यांची नजर आणखी कुठेही असो. तरीही केवळ माझ्या मनातील भाव ओळखून भाऊमहाराजांनी हा जो प्रसाद मला दिला त्याचे माझ्यासाठी अनन्यसाधारण महत्व आहे. कारण तेव्हापासूनच मी हे शिकले की सद्गुरुंशी मनातसुद्धा आपण जे बोलतो, ती आपली मनातली भक्ती त्यांच्यापर्यंत पोचते.
माझ्या बहिणीचे लग्न ठरले होते, मुलाची चौकशी करुन आम्ही लग्नाची बोलणी पक्की केली होती. लग्नाची सर्व तयारी करण्यास सुरुवात करणार एवढ्यात आमच्या ओळखीचा शैलेश नावाचा मुलगा सहज आमच्या घरी आला. त्याला बहिणीच्या लग्नाचे कळताच त्याने सहज मुलाविषयी चौकशी केली. मुलाची सर्व माहिती त्याला सांगताच तो म्हणाला, "या मुलाला मी खूप चांगले ओळखतो. तो व्यसनी आहे. तुम्ही नीट चौकशी करा."
आम्ही हबकलोच. पुन्हा नीट चौकशी केली व मुलाच्या वडिलांनाही जाब विचारला. त्यांनीही शेवटी कबूल केले. आम्ही तात्काळ ते लग्न मोडले. लग्न मोडल्याचा त्रास खूप झाला कारण तोपर्यंत सर्व नातेवाईकांना लग्न जमल्याचे कळले होते. पण आजही आठवून अंगावर काटा येतो. शैलेशच्या माध्यमातून आमच्या गुरुंनी आम्हाला वेळीच सावध केले नसते तर ! आमचा भाऊंवर पूर्ण विश्वास होता. त्यानंतर बहिणीला चांगले स्थळ आले आणि आज ती आपल्या नवरा व मुलीसह सुखाने संसार करते आहे.
ज्या सद्गुरुंनी हजारो भक्तांना योग्य मार्गदर्शन देऊन त्यांना त्यांच्या जीवनामध्ये समाधान व आनंद प्राप्त करुन दिला त्या आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांचे प्रार्थनास्थळ निर्माण झाल्याचे जेव्हा मला कळले त्यावेळी मला खूप आनंद झाला. गेली ४ वर्षे मी दर रविवारी या ठिकाणी नियमितपणे आरतीसाठी जाते. सद्गुरुंच्या अस्तित्वाची साक्ष पटते. इथे आल्यापासून माझ्या जीवनाला एक नवीनच अर्थ प्राप्त झाला आहे, नवी दिशा मिळाली आहे असे मला वाटते.
सद्गुरु भाऊ महाराज आम्हाला आनंद देण्यासाठी बसलेले आहेत. फक्त आपली गुरुचरणी कळकळ तेवढी हवी. आतासुद्धा काही समस्या आली मी लगेच मनापासून माझ्या गुरुमाऊलीला हाक मारते व भाऊ माझ्या हाकेला धावून येतात. अजुन काय हवे जीवनात ? आनंदयोगेश्वर भाऊंसारखे गुरु लाभले हेच केवढे भाग्य ! हे भाग्य मला जन्मोजन्मी मिळो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. गुरुवर्य भाऊमहाराजांच्या एका आरतीत याच भावना नेमक्या शब्दात व्यक्त केल्या आहेत:
नको मोक्ष मुक्ती दासा करू दे सद्भक्ती |
चिरंतन ठेऊनी घ्या या दासाला चरणी ||
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|