|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

श्री. रामचंद्र तोंडे, दहिसर

प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचे कृपाशिर्वाद व आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराज यांचे बहुमोल असे मार्गदर्शन जेथे असे तेथे सुख वसे. श्रद्धा व सबुरी यांचे फळ किती गोड असते याचा प्रत्यय आम्हाला अशाप्रकारे आला.

आम्ही १९८४ सालापासून टेंबे स्वामी महाराज व त्यांचे आशीर्वाद आमच्यापर्यंत पोचवणारे आमचे सगुण रुपातील सद्गुरु भाऊमहाराज यांच्याकडे येत आहोत. नित्य नियमाने स्थानावरील सर्व कार्यक्रम व आरती यात भाग घेत आहोत. आज सद्गुरु भाऊ निर्गुण रुपात वावरत असतानाही आम्हाला ते आमच्याबरोबरच आहेत याची प्रचिती वेळोवेळी येत आहे.

१९८४ साली स्थानावर आल्यानंतर आम्ही गुरुवर्य भाऊंना आमची संततीविषयीची समस्या सांगताच ते म्हणाले, "तुमचे काम होणार. निश्चिन्त रहा. फक्त नामस्मरण व नामजप करत रहा."

सद्गुरु भाऊंनी १९८७ साली १११ भक्तांच्या घरी सतत १२ तास नामस्मरणाचा संकल्प केला होता. त्यापैकी जवळ जवळ १०० नामस्मरणांमध्ये आम्ही सहभागी झालो होतो. त्याच नामस्मरणातील ११ ठिकाणी सतत १२ तास बसण्याचा संकल्प माझ्या पत्नीने केला होता. त्यावेळी भाऊमहाराज सर्वांना हे सांगत की, "तुम्ही संकल्पपूर्वक १२ तास बसा. महाराज तुमचे काम हमखास करणार." त्या सर्व १११ नामस्मरणांची सांगता होताच १९८८ साली सद्गुरु भाऊमहाराजांच्या शब्दांची प्रचिती आम्हाला आली.

आम्हाला कन्यारत्नाचा लाभ झाला. आम्हाला झालेला हर्ष नेहमी द्विगुणित व्हावा म्हणून सद्गुरु भाऊ महाराजांनीच मुलीचे नाव 'हर्षदा' ठेवले. आजपर्यंत आमच्यापेक्षा भाऊंनीच तिची काळजी प्रत्येक वेळी घेतली. आयुष्यभर पुरेल असा प्रसाद आनंदयोगेश्वरांनी आमच्या झोळीत दिला.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

कविता अनंत शेट्ये, भाईंदर

माझ्या वडिलांमुळे मला अतिशय लहान वयात, जीवनाच्या अतिशय नाजूक टप्प्यावर असताना सद्गुरु भेटले. आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊ महाराज प.प. वासुदेवानंद सरस्वतींचेच सगुण रुप. मनातील नकारात्मक विचारांना, तसेच पुढे घडू शकणाऱ्या नकारात्मक गोष्टींना सकारात्मक वळण देणारे माझे भाऊ म्हणूनच तर माझ्यासारख्या तरुण मुलीलादेखील आपले वाटू लागले.

"चिंता करू नका. आनंद करा." या भाऊ महाराजांच्या शब्दांमुळे माझ्यासारख्या असंख्य भक्तांना जीवनाप्रती आत्मविश्वास निर्माण झाला आहे व कुठल्याही कठीण परिस्थितीला न डगमगता सामोरं जाण्याचं बळ लाभलं आहे. अडचणींवर मात करण्यासाठी माझ्यात जी ताकद येते, जे मनोधैर्य, जी सहनशीलता येते ती मी शब्दात वर्णन करू शकत नाही.

माझी मम्मी एक डायबेटीस पेशंट आहे. अगदी मागच्या अनेक वर्षांपासून ती खूप आजारपण सोसत आली आहे. तिला दर दोन ते तीन महिन्यांनी आठ आठ दिवस हॉस्पिटलमध्ये घालवावे लागत. भयानक आजारपण. डायबेटीस असल्यामुळे अगदी मृत्यूच्या दारात नाही एवढेच. नकोच ते शब्द. त्या आठवणींनीसुद्धा अंगावर शहारे येतात.

घरातील गृहिणीला, सर्वांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीलाच जर असा त्रास होत असेल; तर इतर कुटुंबियांच्या मनात उठणारे वादळ हे शब्दांच्या पलीकडचेच. घरात आम्ही भावंडे व आमचे बाबा काहीही न बोलता डोळ्यांतील आसवे रोखून मम्मीसमोर हसतमुख असायचो. हे सर्व आम्हाला शक्य व्हायचे कारण आमच्या बाबांची स्वामी महाराजांवर व सद्गुरु भाऊ महाराजांवर पूर्ण श्रद्धा.

बाबांच्या तोंडात फक्त एकच वाक्य "आपले सद्गुरु आहेत ना! ते सर्व बघताहेत व ते नेहमी सगळ्यांचे चांगलेच घडवून आणतात." बाबांचे हे शब्द व श्रद्धा बघून मग आम्हालाही धीर यायचा. अजूनही येतो. मग नामजपाशिवाय आमच्या मनात दुसरे काहीच नसते. अशा परिस्थितीत आमची मम्मी लवकरात लवकर बरी होऊन घरी येते व या आनंदाच्या क्षणी आम्ही फक्त 'मम्मीला भरपूर आयुष्य मिळो" याशिवाय दुसरी कुठलीच प्रार्थना करीत नाही.

माझ्या शैक्षणिक जीवनातसुद्धा मला केवळ भाऊमहाराजांच्या कृपेमुळे नेहमी उत्तम यश मिळाले आहे हा माझा विश्वास आहे. घरातील सर्व कामे आटपून मन अस्वस्थ असतानाही मी फर्स्ट क्लासने पास होत गेले ही माझ्यासाठी व घरच्यांसाठी कौतुकाची गोष्ट असायची. खरं तर माझ्या बरोबरीच्या मैत्रिणींच्या मानाने माझा अभ्यास मागे असायचा. शिवाय अकाउंट्सचा सरावही वेळेअभावी पुरेसा नसायचा. पण महाराजांवर माझा विश्वास अगदी ठाम होता. मेहनतही कुठे कमी पडू दिली नाही. परीक्षेचा पेपर लिहिण्यास सुरुवात करण्यापूर्वी स्वामी महाराजांचे व सद्गुरु भाऊ महाराजांचे स्मरण करत असे व आता मला १००% यश मिळणार हा विश्वास मला यायचा. माझ्या याच विश्वासामुळे व श्रद्धेमुळे भाऊमहाराजांनी नेहमीच माझ्या मेहनतीला चांगले फळ दिले. बी.कॉम ही मी फर्स्ट क्लासने पास झाले.

एम. कॉम करतानासुद्धा मला मानसिक बळ देणारे, अतिशय टेंशनमध्ये असताना माझी स्मरणशक्ती वाढवणारे आणि सर्वांगाने माझे भविष्य सांभाळणारे व घडवणारे असे फक्त माझ्या सद्गुरु भाऊमहाराजांचे आशीर्वाद आहेत. असे सद्गुरुंचे आशीर्वाद सर्व भक्तांना मिळोत अशीच मी नेहमी त्यांच्याकडे प्रार्थना करते.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>