सुवर्णा विचारे , बोरिवली
मला स्थानावर सद्गुरु भाऊ महाराजांकडे आरतीला जायला सुरुवात करुन ६ वर्षे झाली होती. २७ डिसेंबर १९९७ या दिवशी माझी ICWA ची शेवटची म्हणजे Final Stage IV ही परीक्षा होती. खूपच टेन्शन आले होते. सद्गुरूंचा नामजप चालू होताच पण त्यांच्याशी मनातल्या मनात बोलणेही चालू होते, "महाराज मला खूप भीती वाटते आहे. तुम्ही प्लिज माझ्याबरोबर परीक्षेला चला." या पुढेही मी चुकून बोलून गेले की, "आणि प.प. वासुदेवानंद स्वामी महाराज, तुम्ही माझ्याबरोबर आहात हे मला दाखवून द्या." मलाच माझ्या परीक्षेसाठी महाराजांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे. मी कोण त्यांची परीक्षा घेणार ? या विचाराने नंतर मलाच खूप अपराधी वाटू लागले.
मी परीक्षेला निघाले. आमच्या घरी माझ्या भावाने नुकताच आणलेला श्रीदत्ताचा फोटो होता. त्याला मी नमस्कार केला व म्हटले 'चला.' दुपारची वेळ होती. दत्तपाडा फाटकाजवळ बस स्टॉप होता. तिथूनच बस पकडायची होती. बसची वाट पहात उभी होते. तितक्यात समोर बघते तर काय ! 'भाऊमहाराज' माझ्या डोळ्यासमोर उभे होते. एकटेच होते. ते रिक्शात बसले आणि मी जाणार होते त्याच मार्गाने त्यांनी रिक्शा नेली. मी बघतच राहिले. मनातच नमस्कार केला व आनंदात परीक्षा दिली.
त्यानंतर हा अनुभव सांगण्यासाठी म्हणून एका गुरुवारी स्थानावर जाऊन नंबर घेतला व गुरुवर्य भाऊमहाराजांना भेटले. त्यांना सर्व जसेच्या तसे सांगितले. भाऊ फक्त हसले. त्यांनी हा किस्सा त्यांच्या प्रवचनात सुद्धा सांगितला. ते म्हणाले, 'एक तर मी आधी एकटा कुठे जात नाहीं. आणि रिक्शातून जाण्याचा प्रश्नच येत नाहीं. आणि सर्वात गंमत म्हणजे त्या दिवशी मी मुंबईतच नव्हतो. मी गल्फमध्ये होतो.' हा काय चमत्कार ? मी तर गुरुभाऊंना माझ्या डोळ्यांनी पाहिले होते. पण मी स्वामी महाराजांना मारलेली हाक मला आठवली. आणि लक्षात आले की सद्गुरु भाऊ महाराजच तर टेंबे स्वामी महाराजांचे अवतारी स्वरुप आहे ज्यांनी मला ही अनुभूति दिली की, 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती."
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
नयना पंडीत, मीरा रोड
आनंदयोगेश्वर सद्गुरू भाऊमहाराजांचे अनुभव मला नेहमी वाहत्या गंगेप्रमाणे आले आहेत. गुरुवर्य भाऊंची कृपा म्हणजे जीवनप्रवाहात न बुडता तरंगण्यासाठी असलेले कवचच. हे एकदा परिधान केले की जीवन म्हणजे अनुभवांची मालिका होऊन बसते. मग रामदास स्वामींबद्दलच्या उक्तीची आठवण होते. 'गुरुभाऊंचिया भक्त वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे.' प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची कृपा अखंडपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांना कोटी कोटी प्रणाम.
१९९७ सालातील डिसेंबर महिन्यात मला ऑफिसच्या महत्वाच्या कामासाठी मद्रासला (चेन्नई) पाठवण्यात आले होते. दिवसभर प्रचंड काम करून अतिशय थकलेल्या अवस्थेत संध्याकाळी ऑफिसमधील सर्वांनी चांगल्या उपहारगृहात जेवणाचा बेत केला. मी ऑफिसमधील एका वरिष्ठाबरोबर स्कूटरने चालले होते. रात्रौ सुमारे ८ च्या सुमारास हायवे वर अमेरिकन एम्बसीसमोर सिग्नलसाठी आम्ही थांबलो होतो.
माझा नामजप नेहमीप्रमाणे चालूच होता. काही सेकंदातच त्या वरिष्ठाने प्रचंड गतीने स्कूटर चालवण्यास सुरुवात केली व काही समजण्यापूर्वीच मी रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले. डोक्यापासून पायापर्यंत लागले होते. कपडे रक्ताने भिजले होते. ते वरिष्ठ बेशुद्धावस्थेत दुसरीकडे तर स्कूटर तिसरीकडे पडली होती. हायवेवरील भरधाव वाहनांनी ब्रेक्स लावले नाहीतर अनर्थ घडला असता. अपघाताचे कारण समजू शकले नाही.
मदतीला आलेले तामिळ भाषिक असल्याने मला काही बोलताही येत नव्हते. एवढ्यात एक हिंदी भाषिक सुशिक्षित व्यक्ती हजर झाली व 'तुमच्या मदतीसाठीच आलो आहे' असे म्हणाली. त्याने आम्हा दोघांना हॉस्पिटलमध्ये नेऊन आमची काळजी घेतली. सर्व निदाने झाल्यानंतर सांगण्यात आले की मला एकही टाका घालण्याची गरज नाही किंवा हाडही मोडलेले नाही.
दुसऱ्याच दिवशी मी विमानाने मुंबईला आले व गुरुवर्य भाऊंना नमस्कार करून सर्व काही सांगितले. भाऊ म्हणाले, "मला माहितच होते. महाराजच तेथे होते. त्यांनी तुला अलगद उचलून धरले." त्या प्रसंगानंतर माझ्यासाठी नामजपाचे महत्व अधिकच वाढले.
एकदा अचानक माझ्या चेहऱ्यावर फार मोठी ऍलर्जी उठली. चेहरा विद्रुप दिसू लागला. ऑफिसला जाता येईना. घरी बसावे लागले. मी कसेबसे गुरुवारी स्थानावर गेले व सद्गुरु भाऊमहाराजांना घाबरून विचारले की, "काय करू? प्रकार सिरीयस दिसत आहे." भाऊ म्हणाले, "काळजी करु नको. परवा औषधासाठी ये." औषधच लिहून द्यायचे तर आजच का नाही दिले?
मला काही कळेना. गुरुभाऊंनी एक दिवसानंतर का बोलावले समजत नव्हते. आरतीनंतर घरी येऊन सद्गुरुंची प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठले व आरशात पहाते तर चेहऱ्यावर ऍलर्जीचा मागमूस नव्हता. तेव्हा सद्गुरु भाऊंच्या सांगण्याचा अर्थ लक्षात आला.
भाऊ भक्तांच्या गरजेनुसार विविध रूपे धारण करतात. आम्हाला आलेले डॉक्टररुपातील भाऊंचे अनुभव चकीत करणारे आहेत. काही वर्षांपूर्वी मी टायफॉईडने आजारी होते व त्यानंतर आतड्यांचा त्रास सुरु झाला होता. केवळ लिक्विड डाएटवरच काही महिने होते. माझा तोपर्यंत समज होता की भाऊमहाराज समस्या निवारणासाठी फक्त नामस्मरण करायला सांगतात. पण मला भाऊंनी चक्क काही आयुर्वेदिक औषधे लिहून दिली. आणि त्यांनी सांगितलेल्या दिवशी मी अंथरुणावरून उठून बसले.
त्यानंतर एकदा माझ्या वडिलांना मूळव्याधीचा त्रास सुरु झाला व डॉक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करण्यास सांगितलं. भाऊंच्या कानावर घातले मात्र.... भाऊ म्हणाले, "ऑपरेशनची अजिबात आवश्यकता नाही." केवळ भाऊमहाराजांनी दिलेल्या औषधाने एका महिन्यात जुना त्रास जादूप्रमाणे निघून गेला.
प्रत्येक व्यक्तीला सद्गुरुंची अनुभूती येते, फक्त जबरदस्त श्रद्धा मात्र ठेवावी लागते. आपला सर्व भार मी आनंदयोगेश्वरांवर सोपवला आणि किती मनःशांती लाभली जीवनात ! सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांनी एवढा आनंद निर्माण केला आहे की प्रत्येकाला भासू लागते.
आनंदाचे डोही आनंद तरंग । आनंदाची अंग आनंदाचे॥
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|