श्री. अरुण गायकवाड, दहिसर
साक्षात महाराजांनीच निखिलला वाचवले
१९९२ सालापासून मी, माझी पत्नी अनघा व मुले निखिल आणि मयुर. आम्ही नियमितपणे स्थानावर आरतीला व सद्गुरु भाऊ महाराजांचे मार्गदर्शन घेण्यासाठी यायचो. काही अडचणींमुळे जर का स्थानावर जाऊ शकलो नाही, गुरुवर्य भाऊंचे दर्शन घेऊ शकलो नाही तर मन खरोखरच बेचैन व्हायचे. स्थानावरील अध्यात्मिक वातावरण कोणालाही भुरळ घालणार असेच असायचे.
सद्गुरु भाऊमहाराजांचा आपल्या भक्तांप्रतीचा जिव्हाळा, आपुलकी याने आम्ही सर्व भक्त सुखावून जायचो. त्या सर्व भावना केवळ शब्दातीत आहेत. भाऊमहाराजांना पाहिल्यानंतरच मनातील चिंतांची सर्व जळमटे निघून जात. मनाला नवी उभारी मिळे. गुरुवर्य भाऊमहाराजांच्या कृपाशिर्वादानेच आम्हा भक्तांना जीवनामध्ये आनंद प्राप्त होई त्याचप्रमाणे संकटामधूनही सुटका होई. असाच एक अनुभव आम्ही घेतला.
१९९५ साली आमच्यावर एक अतिशय दुर्धर प्रसंग आला होता. केवळ प.प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व आनंदयोगेश्वर भाऊ यांच्या कृपेने आम्ही यातून निभावलो. त्यादिवशी सौ. अनघा व मयुर दुपारी १२ वाजता शाळेत गेले तर निखिल साडेबारा वाजता शाळेत जाण्यासाठी निघाला. घरापासून तीन ते चार मिनिटाच्या अंतरावर असताना एक फियाट गाडी मागून येऊन त्याच्याजवळ थांबली. गाडीत एकूण चार जण होते. त्यातील एकाने बाहेर येऊन निखिलला म्हटले, "अरे गोरेगाव में तुम्हारा कोई रिश्तेदार रहते है ना, उनकी मौत हो गयी है. तो तेरे पिताजी को बुलाने के लिये तू हमारे साथ चल."
निखिलने प्रसंग ओळखला. तो त्यांना म्हणाला, "मै तो तुम्हे पहचानता नही. इसीलिये मै तुम्हारे साथ नही आऊंगा." इतक्यात त्या इसमाने निखिलच्या तोंडावर रुमाल टाकण्याचा प्रयत्न केला. पण तो निखिलने चुकवला.
त्याचवेळी गाडीत मागील सीटवर बसलेल्या इसमाने निखिलचा उजवा हात धरून त्याला गाडीत खेचले व बाहेरील दाढीवाल्या माणसाने त्याला गाडीत ढकलले. निखिलला आपल्या मध्ये बसवून दोन्ही गुंडांनी आपले खांदे त्याच्या अंगावर ठेवले होते. त्यानेही प्रसंगावधान राखून काहीच प्रतिकार केला नाही. तो घाबरुन ओरडलाही नाही. विशेष म्हणजे ड्रायव्हर वगळता इतर तीन गुंडांनी आपले चेहरे निखिलला दिसणार नाही याची सतत दक्षता घेतली होती.
जेव्हा आमच्यावर काही समस्या येत तेव्हा तेव्हा सद्गुरु भाऊमहाराजांना हाक मारताना निखिलने आम्हाला वेळोवेळी पाहिले होते. त्याच सवयीने त्याने गुरुभाऊंचे स्मरण केले, त्यांना मनोमन वंदन केले व नामजप सुरु केला. गाडी पुढे जात होती. थोड्याच वेळात सुटका करुन घेण्यासाठी आवश्यक युक्त्या व बळ त्याला प्राप्त होऊ लागले. चष्मा खिशात ठेवण्याच्या निमित्ताने पुढे सरकत त्याने हळूच आपले खांदे सोडवून घेतले. नामजप सुरुच होता आणि खरंच सद्गुरु भाऊ निखिलची सुटका करण्यासाठी धावून आले. तशी परिस्थिती त्यांनी निर्माण केली.
अचानकपणे गाडीत काहीतरी बिघाड झाल्यासारखी गाडी अधिक वेग घेईना. निखिलने पाहिले त्याच्या उजव्या हाताला बसलेला गुंड बाहेर बघत होता, तर डाव्या बाजुस बसलेल्या दाढीवाल्या गुंडाला सिगारेट ओढण्याची हुक्की आली. त्याने सिगारेट तोंडात धरून आपले लायटर पेटविले. इतक्यात ती वेळ बरोब्बर साधून निखिलने जोराने आपल्या हाताने त्या लायटरला फटका मारला. तो दाढीवाला झटकन मागे सरकला. निखिलने त्याचवेळी गाडीच्या दरवाजाचा हॅन्डल धरून दरवाजा उघडला. बस्स.
जणू काही साक्षात महाराजांनीच त्याला बाहेर ओढून घेतले. तो अलगदपणे जमिनीवर पडला. त्याला जरादेखील खरचटले नाही. त्याने दरवाजाकडे झेप घेताना पुढील सीटवर बसलेल्या गुंडाने मध्ये धरलेल्या चाकूने त्याच्या तीन बोटांना फक्त छोटीशी इजा झाली. त्याने खाली पडल्यावर लोळण घेतली. गाडीतील गुंडांनी पुंगळीसारखी काहीतरी वस्तू त्याच्या दिशेने फेकली. पण प्रत्यक्ष भाऊ महाराजच त्याच्या मदतीला असताना काय होणार ?
निखिल उठला. तो सर्व भाग त्याच्यासाठी अपरिचित होता. रस्ता दिसेल तसा तो धावू लागला. पुन्हा ते गुंड मोटारीने त्याचा पाठलाग करु लागले. आजुबाजुला सगळी घनदाट झाडे, झुडपे व झोपडपट्टी. परंतु निखिलने लपत छपत, धावत त्यांना चकवले अन एक तासाच्या या थरार नाट्यानंतर निखिल सुखरूप शाळेत पोचला.
खरोखरच केवळ प.प. वासुदेवानंद स्वामी महाराज व परमपूज्य सद्गुरु भाऊ यांच्या कृपाशिर्वादामुळेच एवढे मानसिक आणि शारीरिक बळ त्या लहान मुलाला प्राप्त झाले. सद्गुरु भाऊंचे कृपाछत्र आपल्यावर आहे आपल्याला घाबरण्याची आवश्यकता नाही या विश्वासानेच तर निखिलचा स्वतःविषयीचा आत्मविश्वास वाढला.
अशा या 'अनंत कोटी ब्रह्मांडनायक' अशा गुरुवर्य भाऊमहाराजांचे आम्ही कायम ऋणी आहोत.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|