सौ. शैलजा कोठारे, बोरिवली (पूर्व)
'स्वामी तिन्ही जगाचा आईवीना भिकारी' असे म्हणतात. या उक्तीप्रमाणेच मला 'मानव या जगाचा गुरुवीना भिकारी' असे म्हणावेसे वाटते. कारण आई ही या एका जन्मात काही काळच तारू शकते पण गुरु मात्र जन्मोजन्मी तारतात. असेच गुरु, आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांच्या रूपात मला लाभले ही माझी अनेक जन्मांची पूर्वपुण्याईच. ज्यावेळी मी पहिल्यांदा स्थानावर गेले तेव्हा गुरुवर्य भाऊंना पाहिल्यावर माझे वडीलच समोर बसल्याचा आभास मला झाला. कारण खरोखरच माझ्या वडिलांच्या आणि भाऊंच्या चेहऱ्यामध्ये विलक्षण साम्य होते. माझे स्थानावर जाणे सुरु होते. हळूहळु मला जाणवू लागले की सद्गुरु भाऊंकडे जायला लागल्यापासून माझे दैनंदिन जीवन अधिकाधिक आनंदमयी होत आहे. माझ्या आजुबाजुच्या भक्तांचेही असेच अनुभव होते. खरंच, सद्गुरु ज्याच्या पाठीशी असतात, तोच खरा श्रीमंत.
सद्गुरु भक्तांचे दुःखच दूर करतात असे नाही तर त्यांचे अपमृत्युही टाळू शकतात. याचा एक छोटासा अनुभव मीही घेतला. मी तेव्हा भाईंदर येथे रहात असे आणि माझे ऑफिस गोरेगावला होते. मुलगा लहान असल्यामुळे मी त्याला शेजारच्यांकडे ठेवून नोकरीला जात असे. त्यामुळे मला घरी जायची नेहमीच घाई असायची.
एकदा असेच एका घाईच्या वेळी खूप गर्दी असुनही मी गोरेगाव येथे लोकलमध्ये चढले. आत शिरायला जागा नसल्यामुळे मला त्या गर्दीत बाहेर दरवाज्यापाशीच उभे रहावे लागले. थोड्या वेळाने स्त्रियांचा एक लोंढा माझ्या अंगावर आला. सर्व भार माझ्या अंगावर आल्यामुळे माझा बॅलन्स गेला व माझा हात सटकला. मी खाली पडणार इतक्यात... कुणीतरी मला बाहेरुन आत ढकलले असे मला वाटले. त्या एका क्षणात होत्याचे नव्हते झाले असते. परंतु मला त्याच क्षणी जाणवले की मला वाचवणारी ती अदृष्यातील शक्ती दुसरी तिसरी कुणी नसून माझी भाऊमाऊलीच होती.
भाऊंच्याच कृपेने मला बोरिवली येथे चांगली जागा घेता आली. भाईंदरची जागा लहान असल्याने तसेच मुलाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने चांगल्या वसाहतीत जागा घेण्याचे मनात होते. आम्ही दोघेही नोकरी करत असल्याने भाईंदरची जागा विकून, स्थानावर जाण्याच्या सोयीने, बोरिवली येथे आम्ही जागा शोधण्यास सुरुवात केली. सद्गुरु कृपेने लवकरच एका गुरुवारीच आम्हाला जागेचा ताबा मिळाला. परंतु भाईंदरची जागा काही विकली जात नव्हती. तसेच मी गोरेगावला ज्या ठिकाणी कामाला होते तिथेही मला बराच त्रास होत होता. म्हणून गुरुवर्य भाऊमहाराजांना भेटून हे सर्व सांगितले. त्यावर भाऊ म्हणाले, "जागा विकली जाईल. काळजी करू नकोस. पण एक सांगतो ते ऐक. ही नोकरी तू सोडून दे." डोक्यावर घराचे कर्ज असूनसुद्धा केवळ गुरुंची आज्ञा म्हणून मी ती नोकरी लगेच सोडली आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर पाच सहा दिवसातच माझ्या पतींना प्रमोशन मिळाले. थोड्या दिवसानंतर मलाही घराच्या जवळपास लहानशी नोकरी मिळाली.
सद्गुरुंचे असे किती म्हणून अनुभव सांगू?
माझा नाशिक येथे राहणार लहान भाऊ एकदा आजारी होता. त्याचे पोट अतिशय दुखत होते. डॉक्टरांनी सांगितले की त्याच्या पोटातील लहान व मोठे आतडे एकमेकांना चिकटले आहे व ऑपरेशन करणे गरजेचे आहे. आम्ही सर्व घाबरलो. मी लगेचच गुरुवर्य भाऊंना हे सर्व सांगितले आणि माझा भाऊ जरी सद्गुरु भाऊंचा भक्त नसला तरी केवळ माझ्यासाठी म्हणून भाऊंनी मला स्थानावर नामजप करण्यास सांगितले.
गुरुवारी दिवसभर जप केल्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यानंतर नाशिकवरून फोन आला की भावाची तब्बेत आता चांगली आहे व काळजीचे काही कारण नाही. केवळ नामजपाच्या जोरावर भाऊंनी अशाप्रकारे अनेक लोकांचे आजार बरे केले आहेत. या विषयी बोलताना भाऊ म्हणत की, "हे स्थान काही रोग बरे करण्याचे क्लिनिक किंवा मी कोणी डॉक्टर नाही. परंतु जी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने व निष्ठेने गुरुचरणी लीन राहून त्यांच्या सांगण्यानुसार कर्म करते तिला त्याचा आनंद हा मिळणारच."
दर गुरुवारी व शनिवारी स्थानावरती गुरुवर्य भाऊंना अनेक भक्त आपल्या समस्यांचे निवारण करण्यासाठी भेटायचे. अनेक भक्तांच्या समस्यांचे निराकरण व्हायचे. पण कालांतराने पुन्हा नवीन समस्या घेऊन ते भक्त भाऊंना नंबरमध्ये भेटण्यास जात. हे सर्व पाहून तसेच गुरुवर्य भाऊमहाराज जे त्यांच्या प्रवचनात सांगत ते ऐकून हळूहळू माझी विचारसरणी अशी होत गेली की 'गुरुंवर पूर्ण श्रद्धा पाहिजे. संकटे ही येतच रहाणार. तरीही आपली सद्गुरुंवरील श्रद्धा यत्किंचितही ढळता कामा नये.
केवळ गुरुंचे नाम घेतले तरी माझी समस्या दूर होणार आहे हा विश्वास असावा. तसेच वाईट शक्तीही या अध्यात्म मार्गात अडथळे आणतात. या वाईट शक्ती आपली शारीरिक, आर्थिक व मानसिक प्रगतीत बाधा आणतात मात्र सद्गुरु नाम घेतल्यामुळे आपण या वाईट शक्तींवर मात करु शकतो. गुरुंशी सतत अनुसंधान असेल तर ते आपल्याबरोबर आहेत याची जाणीव व प्रचिती आपल्याला पदोपदी मिळते. फक्त ते समजले पाहिजे.'
एकदा मी व माझा मुलगा स्थानावर जप करण्यास आलो होतो. २ तास जप करून झाल्यानंतर आम्ही जेव्हा घरी परतलो तेव्हा लक्षात आले की आमच्या घराचा दरवाजा आम्ही गेल्यापासून उघडाच होता. परिस्थितीची जाणीव होऊन मी थंडच पडले. या दोन तासांत काहीही होऊ शकले असते. परंतु केवळ माझ्या सद्गुरुंनी माझे घर राखले याची जाणीव मला आजही आहे.
गुरुवर्य भाऊ महाराज स्वतः बायपासच्या वेळी हॉस्पिटलमध्ये असताना माझा ४ वर्षाचा भाचा खूप आजारी होता. त्याला आय. सी.यू. मध्ये ठेवले होते. घरचे सर्व काळजीत होते. गुरुवर्य भाऊंना तर प्रत्यक्षात काही विचारु शकत नव्हतो. मनात श्रध्दा ठेवली व सद्गुरू भाऊंच्याच नेहमीच्या सांगण्यानुसार जास्तीत जास्त नामजप सुरु केला. मनोमन भाऊंना प्रार्थना केली. घरी आल्यावर कळले की तो बरा आहे. याचा अर्थ हाच की केवळ लांबून मनात जरी मी माझ्या भाऊ माऊलीची करुणा भाकली तरी तिची कृपा माझ्यापर्यंत पोचतेच. नेहमी आजारी असणारा व अभ्यासात मागे असणारा माझा मुलगा सिद्धेश यालासुद्धा सद्गुरू कृपेने चांगले आरोग्य लाभले व तो अभ्यासातही प्रगती करू लागला.
सद्गुरु भाऊ महाराज हे सगुण रुपात वावरत असताना एका ठिकाणी त्यांच्या निर्गुण पादुकांच्या प्रार्थना स्थळाची स्थापना झाली होती. भाऊमहाराज देहातीत रुपात गेल्यानंतर सुरुवातीला मी अतिशय अस्वस्थ झाले होते. २००५ सालातील मे महिन्यात एका रविवारी मी अशीच माझ्या समस्येविषयी विचार करत असताना सद्गुरु भाऊंशी मनात संवाद साधत होते. अचानक मला माझ्याच आतून आवाज ऐकू आला की 'आज संध्याकाळी माझ्या प्रार्थना स्थळावर माझी आरती आहे. तू तिथे जा. तुला नक्की आनंद मिळेल.' मी लगेच तयारी करुन श्री. विकास खामकर यांच्या घरी असलेल्या भाऊ महाराजांच्या प्रार्थना स्थळावर आरतीसाठी गेले. तिथल्या प्रसन्न व भाऊमय अशा वातावरणात मला खूप बरे वाटले.
भाऊ महाराजांचे नामस्मरण व आरती ऐकून मनात एक प्रकारचे चैतन्य प्राप्त झाले. तेव्हापासून माझा प्रत्येक दिवस हा अतिशय आनंदात जात आहे. ज्या एका आयुर्वेदिक डॉक्टरचे नाव व पत्ता गेले अनेक दिवस मी मिळवण्याचा प्रयत्न करत होते तो मला त्या पहिल्याच दिवशी आरती करून घरी गेल्या गेल्या समोरूनच मिळाला. एका महत्वाच्या कामासाठी एका माणसाचा फोन खूप दिवस लागत नव्हता. कुठल्याही प्रकारे संपर्क होत नव्हता. परंतु त्या आठवड्यात तो माणूस मला समोरून येऊन भेटला व माझे ते महत्वाचे कामही झाले.
अशाप्रकारे आनंदयोगेश्वर भाऊ महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव त्याठिकाणी मला होत आहे. असे म्हणतात की 'मृत्यूनंतरही जीवन असते.' इथल्या जीवनामध्ये आपल्याला अनेकांची साथ सोबत आहे असे वाटते. पण मृत्यूनंतरच्या जीवनात मात्र केवळ सद्गुरुच आपल्याबरोबर असतात. अशी माझ्या सद्गुरुंची साथ मला चिरंतन लाभो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करते.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|