श्री. विकास खामकर
१९८६ सालापासून सामुहिक आरती आणि प्रवचन ह्यांच्या आवडीमुळे माझी आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांशी झालेली ओळख केवळ पुढील चार महिन्यात सद्गुरुंच्या प्रत्यक्ष चरणसेवेपर्यंत कधी पोचली हे मला कळलेच नाही. अनेक जन्म तपश्चर्या करुनही असे गुरु लाभणे कठिण. आता मागे वळून बघताना विचार येतो की हा योग होता, पूर्वजन्मीचे सुकृत होते की कालांतराने घडणाऱ्या कार्याची पायाभरणी होती. नामस्मरणाच्या अनेक संकल्पाच्या निमित्ताने त्यांनी माझ्यासारख्या अनेक तरुण भक्तांना नामाची गोडी लावली.
नामाच्या व प्रत्यक्ष सद्गुरु सेवेच्या आनंदामध्ये रममाण असतानाच मला ऑफिसमधून ऑडीटसाठी फिरतीवर जाण्याची संधी आली. माझ्या दृष्टीने ऑडीटला जाण्याचे दोन फायदे होत. एक म्हणजे बँकेचे व्यावहारिक ज्ञान प्राप्त होणे व दुसरे म्हणजे बँकेच्याच खर्चाने भारतभर भ्रमण. तरीही यापूर्वी मी इतक्या लांब कधी गेलो नसल्यामुळे मनामध्ये भीती होती. शेवटी गुरुवर्य भाऊमहाराजांनाच विचारले आणि त्यांनी आशीर्वाद दिला की, "काही काळजी करू नकोस. मी तुझ्याबरोबर आहे." त्यांचे हे शब्द ते आजही सिद्ध करत आहेत.
सुरुवातीलाच जेव्हा माझे रिपोर्र्टिंग जयपूरला होते तेव्हा त्यांच्याच एका भक्ताच्या घरी जयपूरला त्यांनी माझी रहाण्याची सोय केली. जाण्यापूर्वी आमच्याशी गप्पा मारताना त्यांनी त्यांच्या तरुणपणामध्ये राजस्थानसारख्या वाळवंटी प्रदेशामध्ये मैलोनमैल केलेली पायपीट, तेथील जेवण आणि त्यांच्या रहाण्याच्या सोयी याविषयी सांगितले होते.
प्रत्यक्षात जेव्हा जेव्हा मला संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्या त्या ठिकाणांना भेट देण्याचा मी प्रयत्न केला. त्या त्या वेळी माझे गुरु इथे येऊन गेले आहेत इथे राहिले आहेत या भावनेने मी पुलकीत होऊन जायचो. काही ठिकाणच्या धर्मशाळांमध्ये जेथे गुरुवर्य भाऊंनी काही काळासाठी वास्तव्य केले होते त्याठिकाणीही मुद्दामहून गेलॊ. त्याठिकाणची परिस्थिती पाहून माझ्या गुरूंनी सहन केलेल्या हालअपेष्टांची जाणीव होऊन माझ्या डोळ्यात अश्रू यायचे.
डासांचे थैमान, दुर्गंधी व एका विशिष्ट स्तरामधील लोक या सर्वांच्या मध्ये केवळ स्वावलंबन आणि कर्तव्यनिष्ठेच्या भावनेने त्यांनी हे जीवनाचे वास्तव किती सहजतेने स्वीकारले होते याची जाणीव होऊन जीव कासावीस व्हायचा. रणरणत्या उन्हामध्ये चारही बाजूला वाळूच वाळू, प्रवासाची तुटपुंजी साधने, तुरळक वस्त्या, परका प्रदेश, मूळ घरापासून लांब, जवळचे कोणीही नाही याचा नुसता विचार जरी केला तरी अंगावर शहारा येतॊ. मैलोनमैल वाळवंटातील वाळू तुडवताना काय त्रास होऊ शकतो याची कल्पनाही कोणी करू शकणार नाहीं. पण स्वतः तो अनुभव घेण्याचा जेव्हा मी प्रयत्न केला तेव्हा मला जाणवले की गुरुभाऊंच्या कष्टांना खरंच सीमा नव्हती. भाऊमहाराजांविषयीच्या प्रेमाने ऊर भरून आला. असे कर्मयोगी गुरु मला लाभले याचा सार्थ अभिमानही वाट्ला. राजस्थान हीच त्यांची तरुणपणातील कर्मभूमी होती.
सत्पुरुषांनीसुद्धा कधीही कर्मापासून पाठ फिरवली नाही व आपल्या वागण्याने समाजाला आदर्श घालून दिले. कर्माचे महत्त्व पटवून दिले. नंतरच्या सुबत्तीच्या काळामध्ये जेव्हा भाऊ तारांकित हॉटेल्समध्ये रहायचे त्या ठिकाणीही मला रहाण्याचा योग आला. कारण मी जेव्हा जेव्हा मुंबईला येत असे तेव्हा ते माझी चौकशी करत व जाण्यापूर्वी तेच मला सांगायचे की मी या ठिकाणी इथे रहायचो इथे जेवायचो. तूसुद्धा जाऊन ये आणि त्यांच्याच कृपेने तशी संधी मला मिळायचीसुद्धा.
अर्थात हे सर्व होत असताना माझी वैयक्तिक साधना सुरूच होती व सद्गुरु भाऊंशीही पूर्ण अनुसंधान होते. त्यांचेही माझ्याकडे पूर्ण लक्ष आहे हेही मला जाणवायचे. याची प्रचितीही माझ्या भाऊमहाराजांनी मला अनेक वेळा दिली.
१९९१ साली आमचे ऑडिट ओरिसातील कटक या ठिकाणी चालू होते. ऑडिट चालू असतानाच्या मधल्या काळात स्थानावरच्या एका कार्यक्रमासाठी मी कटकवरून मुंबईला आलो होतो. पूर्वीच्याच नेमानुसार एक दिवस भाऊंची चरणसेवा करत असताना मनुष्यस्वभावानुसार माझ्या मनामध्ये विचारचक्र चालू झाले की 'इथे सर्व भक्त सद्गुरु भाऊंच्या जवळ आहेत आणि त्यांना भाऊंचा सहवास मिळतो आहे. मी मात्र इतक्या लांब आहे. खरोखरच भाऊ माझ्यासोबत आहेत का? माझ्या मनातील हा विचार संपतो न संपतो तोच गुरुवर्य भाऊमहाराजांनी माझ्या डोक्यावर अलगद हात ठेवला व म्हणाले, "काय रे, सध्या कटकला ज्या हॉटेलमध्ये तू रहात आहेस त्या तुझ्या खोलीतील एका टिपॉयचा एक कोपरा थोडासा तुटला आहे व हा टीपॉय इतर टिपॉयपेक्षा वेगळा आहे. काय बरोबर ना?" तो टीपॉय जरा वेगळाच होता हे अगदी बरोबर होते. मलाही ते जाणवले होते. मी भाऊंना म्हणालो, "हो भाऊ, बरोबर आहे." त्यावर भाऊ म्हणाले, "काय आहे ना मी तुझ्याबरोबर?" सहज कुतूहल म्हणून कटकला परत गेल्यानंतर त्या टिपॉयचे निरीक्षण केले तर खरंच त्या टिपॉयचा एक कोपरा थोडा तुटलेला होता. माझे भाऊ सतत माझ्याबरोबर आहेत या विचाराने मी भारावून गेलो.
त्यानंतर एकदा आमचे ऑडिट पटना या ठिकाणी होते. त्यावेळी बँकांच्या सेटलमेंटप्रमाणे पेन्शन पर्याय निवडण्याचे शेवटचे काही दिवस उरले होते. पेन्शन की प्रॉव्हिडन्ट फंड यापैकी एक पर्याय निवडायचा होता. मला कळेना की मी काय निवडू ? पुढील ४० वर्षानंतर कुठचा पर्याय लाभदायक ठरणार आहे हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नव्हते. याच विवंचनेत मी एका दुपारी बसलेला असताना माझ्या कानावर गुरुवर्य भाऊंचे स्पष्ट शब्द ऐकू आले की, 'पेन्शन घ्यायचे'. मी इकडे तिकडे पाहिले. संपूर्ण मजल्यावर कोणीही नव्हते.
बस. त्या गुरुवाणीवर दृढ विश्वास ठेवून मी पेन्शनचा पर्याय निवडला आणि त्यानंतरच्या काही काळामध्ये ज्यांनी प्रॉव्हिडंट फंड हा पर्याय निवडला होता त्यांना बराच मोठा धक्का बसला कारण बँकांचे व्याजांचे दर बऱ्याच प्रमाणात घसरले. त्यानंतरच्या बँक सेटलमेंट मध्ये पेन्शनचा पर्याय पुन्हा दिला जावा यावर भर दिला गेला. पण दुर्दैवाने आजपर्यंत त्यांना पेन्शनचा पर्याय मिळालेला नाही. भक्ताने गुरुंचे स्मरण केल्यानंतर 'स्मर्तृगामी समावतु' या उक्तीनुसार सद्गुरु त्याला लगेच त्याची अनुभूती देतात हे अशाप्रकारे मी अनुभवले.
गाणगापूर यात्रेच्या निमित्ताने सद्गुरु भाऊमहाराजांच्या अमृतवाणीतील गुरुचरित्र श्रवण करीत असताना त्यातील नामधारकाच्या भूमिकेशी तसेच उपमन्यू, संदीपक इत्यादींच्या भूमिकेशी समरस व्हायचा प्रयत्न मी करीत असे. त्यावेळी माझ्या मनामध्ये असे विचार असायचे की 'हे चरित्र म्हणजे माझ्या गुरुंचे, माझ्या भाऊमहाराजांचेच चरित्र आहे. आणि मीही त्या गुरुचरित्रात त्या त्या भूमिकेतील एक अविभाज्य भाग आहे.' याचा अनुभव मला तेव्हा आला जेव्हा माझ्या जीवनामध्ये मला सद्गुरु भाऊंच्या प्रत्यक्ष सहवासात अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे परमभाग्य लाभले.
ज्याप्रमाणे गुरुचरित्रामध्ये सद्गुरुंनी त्यांच्या शिष्यांना स्वतःबरोबर सर्व तीर्थांची यात्रा घडवली त्याप्रमाणेच काशी, प्रयाग, रामेश्वर, गोकर्ण, महाबळेश्वर, भीमा शंकर, कन्याकुमारी, ब्रम्हावर्त, गरुडेश्वर, माणगाव, आळंदी अशा अनेक तीर्थक्षेत्री भाऊंनी यात्रा काढल्या व आम्हालाही ते स्वतःबरोबर घेऊन गेले. या सर्व यात्रांमध्ये मला सद्गुरु भाऊमहाराजांच्या प्रत्यक्ष सेवेचे भाग्य लाभले.
गुरुचरित्रामध्ये ज्या प्रमाणे सद्गुरु त्यांच्या शिष्यांकडे भिक्षा करण्यास जात असत तोच आनंद व अनुभव सद्गुरु भाऊमहाराज गाणगापूर यात्रेच्या वेळी होणाऱ्या महाप्रसादाच्या निमित्ताने जेव्हा आमच्या घरी भिक्षेसाठी येत त्यावेळी मला मिळाला.
त्याचप्रमाणे नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ज्याप्रमाणे त्यांच्या भक्तांना वस्त्रे भेट दिली, भक्तांच्या संसारात आनंद निर्माण केला, दिवाळीच्या दिवशी आपल्या भक्तांकडे भोजन ग्रहण केले; त्याच सर्व गोष्टींचा आनंद मला व माझ्या कुटुंबियांना आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांकडून आमच्या जीवनामध्ये वेळोवेळी मिळाला.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|