मी त्यांना विचारले, "कारे काय करताय ? आपल्याला लवकर निघायचे आहे ना?" तेव्हा आशिष मला म्हणाला, "अरे या गृहस्थांचा पाय दुखतो आहे म्हणून त्यांनी मला माझ्या मोटरसायकलवरून थोडं पुढे सोडायला सांगितले आहे." असे संभाषण चालू असतानाच मी त्यांच्या अगदी जवळ गेलो. परत त्यांनी माझ्याकडे बघितले व स्मितहास्य केले आणि आशिषने गाडी चालू केली. गाडी जवळ जवळ अर्धा किलोमीटर दूर जाईपर्यंत का कोणास ठाऊक त्या गाडीवरून माझी नजर हलली नाही. गाडी नजरेच्या टप्प्याच्या बाहेर गेली. मझ्या संपूर्ण शरीराला कंप सुटला आणि मी 'महाराज' असे जोरात ओरडलोच. माझा आवाज ऐकून एक भक्त कुमार उपासनी माझ्याजवळ आला आणि माझ्या मनाचा बांध फुटला. "महाराज येऊन गेले." एवढे सांगून मी ओकसा बोक्शी रडायला लागलो.
माझ्या रडण्याचे कारण सर्वांना कळताच प्रत्येकानेच एवढा वेळ अनुभवलेली पण मनातच ठेवून दिलेली भावना व्यक्त करण्यास सुरुवात केली. खरं म्हणजे प्रत्येकानेच त्या व्यक्तीला पाहिले होते व प्रत्येकजण भारावलेला होता. मी सांगायला सुरुवात केल्यावर त्यांनीही सांगण्यास सुरुवात केली - जसे मी स्वामी महाराजांचा संपूर्ण देह व विशेषकरून त्यांचे डोळे पाहिले होते; तसेच कोणी त्यांच्या कपाळावरचे गंध, तर कोणी कानातील भिकबाळी, कोणी त्यांचा पेहराव, तर कोणी त्यांचा दंडा आणि कमंडलू पाहिले होते. सर्वांच्या गोष्टी एकमेकांशी जुळत होत्या. ही चर्चा चालू असतानाच आम्ही हळूहळू भानावर आलो व सद्गुरुंनी आपल्याला काय प्रचिती दिली आहे याची सर्वांनाच जाणीव झाली नव्हे साक्षच पटली.
एवढ्यात आशिष नावाचा भक्त जो 'महाराजांना' त्याच्या बाईकवरून सोडून परत आला, त्याने जेव्हा आमची ही आनंदाची अवस्था पहिली तेव्हा तोही सद्गदित होऊन सांगू लागला की, 'मी त्यांना घेऊन काही अंतर पुढे गेल्यानंतर ते म्हणाले की 'थांब बाळा. मला इथेच वरती टेकडीवर कीर्तनाला जायचे आहे. ' मी त्या गृहस्थांना त्यांच्या सांगण्यावरून एका ठिकाणी बाईकवरून उतरवले व पुन्हा बाईक चालू करण्यासाठी चावी फिरवायला गेलो तेव्हा त्या ठिकाणी मला तीन शेवंतीची फुले दिसली. मला आश्चर्य वाटले. सकाळपासून अनेक वेळा मी चावी काढली, लावली पण ती फुले तिथे एकदाही दिसली नाहीत. त्याचा उलगडा मला आता होत आहे.' असे म्हणून त्याने ती फुले आम्हा सर्वांना दाखवली. ती फुले पाहिल्यावर गुरुंच्या प्रचितीची पुन्हा साक्ष पटली. त्यानंतर आशिष व संदीप हे दोन भक्त गुरुवर्य भाऊंना हे घडलेले सर्व प्रत्यक्ष कथन करण्यासाठी पुढे खोपोलीला गेले.
इथे मुंबईमध्ये थांबलेली माझी पत्नी सौ. श्रद्धा (ती तेव्हा दुसऱ्या मुलाच्या वेळेस सात महिन्यांची गरोदर होती) ही खरं म्हणजे दोन दिवसांनी स्थानावरून निघणाऱ्या बसमधून खोपोलीला येणार होती. पण अचानक तिला खूप बेचैन वाटू लागले. आताच उठून खोपोलीला जावे अशी तीव्र इच्छा निर्माण झाली. पण अशा अवस्थेत एकटी कशी जाणार? म्हणून ती स्थानावर कोणी सोबत म्हणून मिळते का ते बघायला स्थानावर गेली. तर स्थानावर दोन तीन बायका एस.टी. ने खोपोलीला जायला निघाल्या होत्या. माझ्या पत्नीने मीही तुमच्याबरोबर येते असे सांगताच त्या म्हणाल्या की, "अशा अवस्थेमध्ये एस. टी. चा प्रवास योग्य नाही." पण ती काही ऐकली नाही. त्या निघाल्या त्याचवेळी इथे आम्हाला स्वामी महाराजांनी साक्षात दर्शन दिले होते.
माझी पत्नी, सौ.श्रद्धा जेव्हा खोपोलीतील स्थानावर पोचली तेव्हा बाहेरच तिला इथून निघालेले आशिष व संदीप भेटले. त्यांनी तिला घडलेला प्रसंग सांगितला. ते दोघेही तेव्हा गहिवरले होते. हे सर्व ऐकून श्रद्धा हातातील बॅग खाली टाकून त्याही अवस्थेत पळत भाऊंच्या खोलीत गेली. सद्गुरु भाऊ शांतपणे आपल्या गादीवर बसले होते.
सौ. श्रद्धाने थोड्याशा अविश्वासानेच प्रश्न केला,"भाऊ, हे दोघे म्हणतात ते खरं का? खरंच स्वामी महाराजांनी पद यात्रेतील भक्तांना प्रत्यक्ष दर्शन दिले?' भाऊ प्रसन्न हसले व मोठयाने म्हणाले, "मग ! तुझ्या नवऱ्याला मी वचन दिलं होतं की नक्की प्रचिती मिळणार ! अगं, आणि सकाळचे ११ ही माझी संचाराची वेळ आहे." आणि त्यानंतर त्यांना कोणीतरी भेट म्हणून दिलेले छोटे भगवद्गीतेचे पुस्तक त्यांनी श्रद्धाला प्रसाद म्हणून दिले.
माझी संचाराची वेळ म्हणजे? विचार केला आणि अंगावर रोमांच उभे राहिले. याचा अर्थ भाऊमहाराजांनी स्वतः स्वामी महाराजांच्या रूपात भक्तांना दर्शन दिले. म्हणजेज प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराज हे वेगळे नाहीतच हेच त्यांनी आम्हाला दाखवून दिले.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|