|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

मी आणि माझे आनंदयोगेश्वर…. (निर्गुणात्मक)
सद्गुरुंच्या निर्गुण कार्याला त्या सगुण गुरूकडूनच सुरुवात

माझे यजमान श्री विकास खामकर १९८६ पासून सद्गुरु भाऊ महाराजांकडे जायला लागले. ते व त्यांचे गुरुबंधू भाऊमहाराजांच्या घरी रोज रात्री सेवा करायला जात असत. गुरुंची सेवा करायला मिळणे ही तर एक पर्वणीच होती; मात्र त्याचबरोबर भाऊंचा सहवास मिळायचा व त्यांच्या मुखातून आलेले शब्द कानात साठवता यायचे. विकासची तळमळ हीच असायची की ही चरण सेवा आपल्याकडून कायम होत रहावी. त्यांना पूर्ण जाणीव होती की ते साक्षात दत्तस्वरूप अशा विभुतीची सेवा करीत आहेत. म्हणूनच ते अतिशय एकाग्रतेने ही चरण-सेवा करायचे.

१९९५ साली आमचे लग्न झाल्यावर ७/८ महिन्यांनी, असेच माझे पती एकदा भाऊंच्या घरी सेवा करण्यास गेले होते त्यावेळी एका भक्ताने भाऊमहाराजांसाठी पायात घालायला नवीन चपला आणल्या. तिथे ४/५ भक्त असतानाही गुरुवर्य भाऊंनी आपल्या जुन्या वापरलेल्या चपला विकासला दिल्या. त्यांच्या गुरुचरणांविषयीच्या कळकळीतूनच हे घडले होते.

विकासने गुरूंच्या वापरलेल्या त्या चपला अतिशय भक्तिभावाने घरी आणल्या. मलाही फार आनंद झाला. आमची दोघांचीही अशी धारणा होती की या चपला नसून सद्गुरुंच्या पादुकाच आहेत. आम्ही त्याच श्रद्धेने त्या तशाच देव्हाऱ्यात ठेवल्या. काही दिवसांनी त्यांच्यावर सोनेरी वेलवेटचा कपडा व जांभळ्या रंगाची कलाबूत लावून घेतली.

रोजच्या पूजेत ठेवल्यामुळे आम्हाला त्यापासून खूप चांगली स्पंदने मिळत. भाऊंना काही आम्ही हे बोललो नाही. पण त्या पादुकांमुळे आम्हाला गुरु-चरण-सेवा निर्गुण रुपात, पादुकांच्या स्वरुपात करायची गोडी लागली. आणि आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांनी खऱ्या अर्थाने आमचा अध्यात्मिक प्रवास आमच्याही नकळत सुरु केला. कारण त्यांच्या या सर्व अदृष्यातल्या योजना कळण्यासही आम्हाला बराच काळ जावा लागला.

आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांच्या कार्याचे विचार बीज
आमची दोघांचीही विचारसरणी अशी होती की, "आपल्या सद्गुरू भाऊ महाराजांनी त्यांच्या गुरुंच्या म्हणजेच परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रचार-प्रसाराचे कार्य फार उत्तम प्रकारे केले. त्यांच्या नामजपाच्या व नामस्मरणाच्या माध्यमातून अनेकांना जाज्वल्य अनुभव दिले.

भाऊ मात्र सांगत असत कि "हे मी करत नाही. भक्तांना जे अनुभव येतात ती सर्व माझ्या गुरूंची कृपा आहे." पण त्यांच्या गुरूंची, म्हणजेच आमचे परात्पर गुरु प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची कृपा, त्यांची स्पंदनं आमच्यापर्यंत खेचून कोण आणतं? टेंबे स्वामी महाराजांपर्यंत पोचण्याची आपली कुवत आहे का? मग ज्या सगुण देहाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही स्पंदनं येतात; त्या सगुण देहाप्रती व त्या सगुणात्मकाच्या मागे असलेले निराकार निर्गुणत्व या प्रति आपले काहीच कर्तव्य नाही का? ते समोर दिसत असताना त्यांच्या सगुण देहाची सेवा करणे किँवा त्यांच्या सगुण चरणांचे पूजन करणे एवढाच गुरुभक्तीचा अर्थ आहे का? आपल्याला देहरुपात जे गुरु म्हणून लाभले ज्यांच्या सगुण रुपाच्या माध्यमातून आपण अनुग्रह घेतला, ज्यांच्या अथक परिश्रमांमुळे आपणा भक्तांसाठी व समाजासाठी हे स्वामी महाराजांचे स्थान निर्माण झाले व ज्यांनी आपल्यासारख्या सामान्य भक्तांच्या दैनंदिन तसेच अध्यात्मिक जीवनातील आनंदासाठी खऱ्या अर्थाने आपला देह झिजवला त्या सद्गुरु भाऊमहाराजांचेही निर्गुण कार्य ते सगुणात्मकामध्ये असतानांच सुरु व्हायला पाहिजे." हे आमचे दोघांचे ठाम विचार होते. या विचारांनी आम्ही दोघे अक्षरशः झपाटलो होतो. पण 'आपण तर सामान्य भक्त आहोत. आपण काय करू शकतो?' या विचारांपाशी आलो कि स्तब्ध होऊन जायचो. मनात हळूहळू काही संकल्पना आकारास येत होत्या. परंतु त्यांना मूर्त स्वरुप प्राप्त होत नव्हते.

आनंदयोगेश्वरांवरील आरत्या - साईबाबांची प्रेरणा
त्याच सुमारास आम्ही दोघे व आमचे एक गुरुबंधू श्री. कुमार उपासनी सद्गुरु भाऊमहाराजांनी केलेल्या प्रवचनांवर, त्यांच्या स्वामी महाराजांप्रतीच्या भक्तीबद्दल व कार्याबद्दल चर्चा करीत असू. कधी स्थानावर, कधी घरी, तर कधी फोनवर. कुमार उपासनींकडूनही स्वामी महाराजांनी सद्गुरु भाऊमहाराजांवर गुरुस्तोत्र रचून घेतले होते. एकदा त्यांनी मला फोन केला व म्हणाले, "श्रद्धा, कालच आम्ही (ते स्वतः व श्रीराम करंदीकर) शिर्डीहून साईबाबांचे दर्शन घेऊन आलो. तिथे आम्हाला जे जाणवले, जे साईबाबांकडून आमच्यापर्यंत आले ते तुला सांगतो आहे. तू आपल्या गुरुवर्यांवर काव्य लिहिली आहेस. आता तुला त्यांच्यावर आरत्या लिहायच्या आहेत."

मी चक्रावूनच गेले. ते पुढे म्हणाले, "गुरुवर्यांच्या काकड आरतीपासून ते शेज आरतीपर्यंत सर्व सेवांच्या आरत्या तुला लिहायच्या आहेत." आरत्या? आरत्या मी कशा काय लिहू शकणार ? मला वाटले की ते असंच काहीतरी त्यांच्या मनचं सांगत आहेत. मी सर्व हसण्यावारी नेले. त्यांनी मला एक पेन व आरत्यांची कल्पना यायला साईबाबांच्या आरतीची कॅसेटही भेट केली व नंतर कुमार उपासनी मला जवळजवळ रोज फोन करून आरत्या लिहिण्याविषयी सांगत राहिले व मी त्यांना कधीही गांभीर्याने घेतले नाही.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>