|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

असे १२/१५ दिवस गेल्यानंतर मी वैतागून कुमार यांना म्हटले की, "कुमार, कृपा करून पुन्हा मला हे सर्व सांगू नका. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर का खरंच साईबाबांची इच्छा असेल की गुरुवर्य भाऊमहाराजांवर माझ्याकडून आरत्या लिहून व्हाव्यात ; तर मग त्यांनी तुम्हाला का याविषयी सांगितले? सरळ मला का नाही स्वप्नात येऊन सांगितले?"

यावेळी मात्र कुमारही चिडले. ते चिडूनच मला म्हणाले, "ठीक आहे. आजपासून मी तुझ्याशी या विषयावर बोलणार नाही जोपर्यंत तू स्वतः या विषयावर बोलत नाहीस. आणि माझी खात्री आहे की एक ना एक दिवस तू स्वतः मला या आरत्या म्हणून दाखवशील; कारण ही साईबाबांची प्रेरणा आहे. "

आपले सद्गुरु अदृष्यात कशा खेळ्या करत असतात याचेच हे उदाहरण ! आपल्याला त्यावेळी कळतही नाही. कालांतराने लक्षात येते की खरंच कुठल्या घटनेमध्ये काय अर्थ आहे. त्यानंतर एक दीड महिन्याने महाशिवरात्र (१९९६ साली) होती. आम्ही काही भक्तांनी स्थानावर रुद्र केला होता. त्यावेळेस मी ९ महिन्यांची गरोदर होते. भाऊमहाराजही स्थानावर आले.

सद्गुरुंचे पूजन वगैरे झाल्यावर अचानक भाऊ मला म्हणाले, "चला तुमच्या घरी जाऊया." आम्हा दोघांना आश्चर्य वाटले. भाऊमहाराज आणि नेहमीप्रमाणे त्यांच्या बरोबर काही भक्तांचा जत्था (भाऊंना नेहमी भक्तांमध्ये रहाणे आवडे.) असे सर्व आमच्या घरी आले. आम्ही १५ मिनिटे सद्गुरूंना अतिशय प्रिय असणारे नामस्मरण केले.

त्याच दिवशी योगायोगाने माझा वाढदिवस होता. भाऊ गप्पा मारत होते. इतक्यात त्यांचे लक्ष समोर ठेवलेल्या ग्रिटींग कार्डकडे गेले (जे विकासने मला सकाळीच दिले होते.) भाऊंनी विचारले "कोणाचा वाढदिवस?" विकास म्हणाला, "भाऊ, श्रद्धाचा." अरे मग आधी नाही का सांगायचंस !" असे म्हणत त्यांनी काही सेकंद विचार केला व लगेच आपल्या खिशातील एक सोन्याचा मुलामा असलेले पेन काढून माझ्या हातात दिले. त्याही वेळेस माझ्या हे लक्षात आले नाही की हा साक्षात सरस्वतीचा प्रसाद आहे.

आनंदयोगेश्वर सद्गुरू भाऊमहाराजांच्या कार्याचे महाशिवरात्रीचे व आमचे हे असे नाते जोडले गेले. महाशिवरात्रीनंतर चारच दिवसांनी मला मुलगा झाला. भाऊ स्वतः त्याला हॉस्पिटलमध्ये बघायला आले. म्हणाले याचे नाव योगेश्वर ठेव. त्यानंतर 2 महिन्यांनी भाऊमहाराजांनीच त्याचे 'चिन्मय' असे नामकरणही केले. (भाऊंनीच त्याच्या कानात हे नाव सांगितले.) या बाळंतपणात मी चार महिने घरी होते. एक दिवस सकाळी उठल्या उठल्या माझ्या झोपलेल्या तान्ह्या बाळाकडे पहात बसले होते. अचानक असे भासमान झाले की एका ठिकाणी मी व सद्गुरु भाऊमहाराज आहोत. भाऊ गाढ झोपले आहेत व मी त्यांना प्रेमाने उठवायचा प्रयत्न करत आहे. आणि मनाच्या त्या अवस्थेतून आपोआप शब्द उमटले.

उठि उठि श्री सद्गुरु भाऊनाथा | अनंत पार्वतीच्या सुता ||
निळकंठा दत्ता अवधूता | सत्वर उठि हो आता ||
उघडुनि पाही कमलनयना भक्त पातले तव सदना ||
तळमळ लागली आमुच्या मना | भावे दर्शन दे भक्ता ||

मी झर्रकन पेन घेतले व या चार ओळी लिहून काढल्या. त्यानंतर झरझर लिहीत गेले. अशावेळी कोणीतरी अज्ञात शक्तीच आपल्या शरीर, मन व बुद्धीचा ताबा घेत असते हे मी अनुभवले. संपूर्ण भूपाळी लिहून झाली. शेवटच्या ओळी लिहून घेतल्या होत्या.

अनंतकोटी ब्रह्मांडनायका | आनंदयोगी वरदायका ||
पावन करी तव साधका | श्रद्धेने तूज आळवितो ||

आणि कुमार उपासनींचे शब्द आठवले. मी लहानपणी मनोभावे केलेली साईभक्ती आठवली. भाऊमहाराजांनी दिलेले सरस्वतीचे द्योतक असलेले पेन आठवले. लगेच मी कुमारना ऑफिसमध्ये फोन केला. त्यांना संपूर्ण भूपाळी ऐकवून दाखवली. माझा आवाज थरथरत होता. कुमारही गहिवरले होते. त्यानंतर सद्गुरुंनी थांबू दिले नाही. भूपाळी, काकड आरती, 'जागले जागले' हे कवन, नैवेद्य आरती, भाऊमहाराजांची नियमित आरती, करुणा कवन, भाऊ महाराजांची प्रार्थना व शेजारती हे सर्व घरातील रोजची कामे करत असतांना स्फुरत गेले. त्या ४/५ महिन्यात माझ्या देहाची व मनाची अवस्था पूर्णपणे भाऊमय झाली होती. त्यामुळेच 'करुणा कवन' हे तर ऑफिसमध्ये काम करता करता सुचले गेले.

सोन्याला भट्टीतून काढल्याशिवाय दागिना घडत नाही

त्याचे असे झाले, त्या काळात आम्हाला खूप त्रासही होता. सर्व बाजुंनी समस्या. आर्थिक समस्या, आमची व मुलांची सततची आजारपणं, मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे अशा असंख्य समस्या एकामागून एक सुरूच असायच्या. अध्यात्मातील प्रगतीच्या वाटेवर सद्गुरु सुखासुखी काहीच देत नाहीत हं ! भाऊ महाराज म्हणायचे की ज्याप्रमाणे सोन्याचा दागिना घडवायचा असल्यास सोन्याला प्रथम भट्टीत घातले जाते; त्याचप्रमाणे सद्गुरुंना ज्या शिष्याला घडवायचे असते त्याला ते अक्षरशः कर्मभोगाच्या भट्टीतून काढतात. गुरु खूप परीक्षा बघतात. पण एकदा का तुम्ही या परीक्षेत पास झालात ना, की मग ते तुम्हाला या मार्गामध्ये मागे वळू देत नाहीत. हा आमचा स्वानुभव आहे.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>