|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

अजुनही सद्गुरु परीक्षा बघतात. तर त्यावेळी आमच्यावर येत असलेल्या समस्यांच्या शृंखलेमुळे माझ्या घरची मंडळी मला नेहमी म्हणत, "तू देवाचं, तुझ्या गुरुंचं एवढं करतेस मग तुझे गुरु तुझा त्रास कमी का करत नाहीत ? उगाचच तू म्हणतेस की माझे गुरु माझ्याबरोबर आहेत." माझ्या समस्यांपेक्षाही, माझ्या गुरुंना बोल लावला गेला की मला अतिशय वाईट वाटे. मी भाऊ महाराजांना मनात प्रार्थना केली. त्यांची करुणा भाकली की, "हे सद्गुरु भाऊ, तू साक्षात दत्तस्वरूप आहेस. आणि तूच अर्जुनाला रणांगणामध्ये विराटरूप दाखवणारा माझा केशव आहेस." हे सर्व विचार ऑफिसमध्ये असतांना येत होते, 'भाऊ, जसं तुम्ही नरसिंहाचे रुप घेऊन खांबातून प्रकट झालात व सर्वांना दाखवून दिलंत की मी माझ्या भक्ताबरोबर आहे; तसाच अनुभव आम्हालाही येऊ द्या. आम्ही तुमची करुणा भाकतो." त्यातूनच मूर्त स्वरुपात हे करुणाकवन आकारास आले.

भाऊ तारी तारी सकला आम्ही नमितो तव पदकमला ||
आम्ही पामरे दीन पतित जन बुडतो भावसागरी या
भाऊ तारी तारी सकला आम्ही नमितो तव पदकमला ||
नारसिंहरूपे प्रगटोनि तारिले तू प्रल्हादा
भाऊ तारी तारी सकला आम्ही नमितो तव पदकमला ||
रघुनंदन तू, विराटरूपी केशव गीतेमधला
भाऊ तारी तारी सकला आम्ही नमितो तव पदकमला ||
पूजा भक्ती ना ठावी आम्हा स्मरतो तव नामाला
भाऊ तारी तारी सकला आम्ही नमितो तव पदकमला ||
आम्ही सर्व तव शिशु बालक तू जननी जनक परिपाता
भाऊ तारी तारी सकला आम्ही नमितो तव पदकमला ||
अघटित घटना सांडोनि करिशी सुखशांतीचा मेळा
भाऊ तारी तारी सकला आम्ही नमितो तव पदकमला ||
ब्रम्हा विष्णु महेश तत्व तू दत्तगुरु भगवंता
भाऊ तारी तारी सकला आम्ही नमितो तव पदकमला ||

सद्गुरु कृपा काय असू शकते
भक्तांना आलेल्या सद्गुरु भाऊंच्या अनुभवांवर काहीतरी पद्यामध्ये लिहावे असा विचार माझ्या मनात यायला लागला. पण भाऊंचे अनुभव तर अगणित आहेत आणि ते पद्यात गुंफायचे कसे? स्वामी महाराजांना व माझ्या सद्गुरु निळकंठ महाराजांना मनापासून प्रार्थना केली. आणि चटकन माझ्या ओठावर रंगावधूत स्वामींनी सद्गुरुंवर रचलेल्या 'दत्तबावनी' ची धून तरळून गेली. हातात पेन घेतले. कागदावर दत्तबावनीच्या चालीमध्ये शब्द उतरत गेले. एका दिवसात ५० ओव्यांची 'श्रीभाऊलीला' केव्हा लिहून झाली मला कळले देखील नाही. नंतर फक्त काही शब्द वर खाली करावे लागले. पण माझ्या मनात ५२ ओव्या लिहून व्हाव्यात असे होते.

दुसऱ्या दिवशी सकाळी स्थानाचा फोन बंद असल्याने भाऊंनी आमच्याकडे स्थानावर निरोप देण्यासाठी फोन केला. गुरुभक्तीच्या मार्गामध्ये ही सगळी केवळ निमित्ते असतात. मी भाऊमहाराजांना म्हटले, "भाऊ, तुमच्यावर व भक्तांना आलेल्या तुमच्या अनुभवांवर थोडे काव्यात लिहिले आहे." मी पुढे काही बोलायच्या आतच भाऊ मला म्हणाले, "अगं मग मला वाचून दाखव." मी वाचायला सुरुवात केली तर ते म्हणाले, "अगं पद्यात लिहिले आहेस ना, मग गाऊन दाखव." मी संपूर्ण 'श्रीभाऊलीला' फोनवर गाऊन दाखवली. गाताना 'हे सर्व माझ्या गुरुंनी माझ्याकडून कसे करुन घेतले व त्यांनाच आज मी हे म्हणून दाखवते आहे' या जाणिवेने माझ्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. भाऊ असेही स्वभावाने फार मऊ. ते सर्व ऐकून तेही हळवे झाले. म्हणजे खरं तर रडायलाच लागले. कारण गुरुवर्य भाऊ हे खरोखरच 'भक्तवत्सल भक्ताभिमानि' होते. सर्व भक्तांवर त्यांनी निरतिशय प्रेम केले.

'भाऊलीला' ऐकताना त्यांना त्या त्या प्रत्येक भक्ताची आठवण होत होती. काही त्यांच्याजवळ राहिलेले, तर काही कुठल्या तरी कामाच्या निमित्ताने दूर गेलेले पण अजुनही लांबून का होईना आपल्या गुरुंशी अनुसंधान ठेवून असलेले, तर काही आपली कामे झाल्यावर लांब निघून गेलेले.

आम्ही दोघेही काही क्षण स्तब्ध झालो आणि भाऊ त्यांच्या नेहमीच्या मूडमध्ये येत म्हणाले, "श्रद्धा, यात तू आणखी एक अनुभव घे. आत्ता जेव्हा मी अमेरिकेला गेलो होतो ना तेव्हा तिथे एक मुस्लिम दांपत्य मला भेटण्यास आले होते. त्यांचे नाव सईद आणि सायरा खबूर. त्यांना गेली अनेक वर्षे मूल बाळ नव्हते. मी त्यांना माझ्या पद्धतीने काही करायला सांगितलं आणि आता परवाच त्यांचा अमेरिकेहून फोन आला. Now she is pregnant. काय आनंद आहे त्यांच्याकडे ? फोन ठेवल्या ठेवल्या दोन ओव्या लिहिल्या गेल्या :
सर्व जाति धर्मसमभाव, दरबारे तुझिया गुरुराव |
वांझ यवन नारी अतएव, गर्भधारणा हो सुखनैव ||

(संदर्भ पृष्ठ क्र. ९६/९७)
लक्षात आले की माझ्या इच्छेप्रमाणे ५२ ओव्या लिहून झाल्या. केवढी अगाध कृपा त्या गुरुमाऊलीची. म्हणूनच मी माझ्या सान्निध्यात येणाऱ्या सर्वांना आजही सांगते की आपल्या गुरुंचे चरण कधीही सोडू नका. सद्गुरुंना फक्त तुमची प्रेममय भक्ती व तो भाव हवा असतो.

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>