निर्गुण पादुका ओटीत दिल्या
सद्गुरु भाऊमहाराजांनी भक्तांच्या व समाजाच्या कल्याणासाठी अनेक लहान मोठे संकल्प केले व ते आपल्या भक्तांच्या माध्यमातून पूर्णही करुन घेतले. या संकल्पात सहभागी होणाऱ्या प्रत्येकाला त्याचा पुरेपुर आनंद मिळत असे. त्यांनी १९९८ साली 'नमो गुरवे वासुदेवाय' या लिखित ११ कोटी नामजपाचा संकल्प सोडला होता. त्याच्या पूर्ततेबद्दल पुन्हा १९९५ सारखीच १९९९ साली स्वामी महाराजांची पालखी व भक्तांची पदयात्रा बोरिवली ते खोपोली अशी काढण्यात आली. माझी व माझ्या यजमानांची अशी इच्छा होती की या पालखीतून आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांच्याही पादुका मिरवल्या जाव्यात.
भाऊंना विचारल्यावर त्यांनी पालखीत ठेवण्यासाठी माझ्या यजमानांना आपल्या पायातील वापरत्या पादुका पटकन काढून दिल्या. पालखी सोहळा फारच सुंदर झाला. त्यात सहभाग घेतलेल्या सर्वांना त्याचा आनंद मिळाला. पालखी खोपोलीच्या स्थानावर पोचली तेव्हा भाऊमहाराज तिथे आधीच पोचलेले होते. आपल्या गुरुंची पालखी भाऊंनी स्वतःच्या खांद्यावर घेऊन मिरवली तेव्हा त्यांनी त्यातील स्वतःच्या पादुका काढून पायात घातल्या होत्या.
कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व जण आपापल्या सेवेमध्ये गुंतले. थोड्या वेळाने भाऊंच्या खोलीत आवराआवर करताना मला एका बाजूला काढलेल्या त्या मुंबईतून पालखीतून आणलेल्या पादुका दिसल्या. भाऊमहाराजांच्या खोपोली या स्थानावरही वेगळ्या पादुका असल्याने तेव्हा त्यांनी त्या परिधान केल्या होत्या. म्हणून आवरा आवरीच्या घाईतच मी भाऊंना विचारले की, "भाऊ, या पादुका कुठे ठेऊ?"
भाऊ महाराजांनी त्या पादुका माझ्याकडून आपल्या हातात घेतल्या, बाजूला ठेवलेले एक फुल घेतले आणि उत्स्फूर्तपणे व अतिशय आवेगाने मला म्हणाले, "श्रद्धा, तुझी ओटी पुढे कर. या तुझ्यासाठीच आहेत." व त्यांनी पादुका माझ्या ओटीत घातल्या.
चार वर्षांपूर्वी मिळालेल्या गुरुंनी वापरलेल्या वहाणा, आज प्रसाद मिळालेल्या या गुरुंनी वापरलेल्या पादुका, त्या मधल्या काळात घडलेल्या आरत्या, सर्व घटनांची लय सापडायला लागली. सद्गुरु स्वतःच आमच्याही नकळत आमची गाडी सगुण भक्तीकडून निर्गुण भक्तीकडे घेऊन चालले होते. पण या पादुकांचे खरे प्रयोजन त्यानंतर कळले.
नामाचे महत्व व गुरुभाऊंवरील नामजप
२००० सालातील गाणगापूर यात्रा उत्सव सुरु असतांना आमच्या मनात विचार सुरु झाला तो सद्गुरु भाऊमहाराजांवरील नामजपाचा व नामस्मरणाचा. ज्याप्रमाणे गुरुवर्य भाऊंनी आपणास त्यांच्या गुरुंच्या नामाची गोडी लावली व त्या नामाच्या माध्यमातून अनेक अनुभव, साक्षात्कार दिले; त्याचप्रमाणे सद्गुरु भाऊंच्याही नामाची गोडी आम्हांला लागली पाहिजे.
विश्वातील चैतन्यस्वरुप स्पंदने आनंदयोगेश्वराच्या सगुण रुपामध्ये वावरत असतानाच, त्या स्पंदनांना अक्षरब्रम्ह अशा नामामध्ये बद्ध केले तर ती स्पंदने चिरंतन काळापर्यंत भक्तांचे, समाजाचे व संपूर्ण जगाचे संतुलन राखण्यास साहाय्यभूत ठरु शकतात. ही आमची ठाम भावना होती.
नामाचे महत्व भाऊंनी अनेक वेळा सांगितले होते. केवळ रामनामाने वानरांनी एवढा मोठा सेतू उभा केला. नाम हे जीवन आहे व नाम हाच प्राण आहे. नाम हेच साधन आहे व नाम हेच साध्य आहे. या मायिक जगात आपण फक्त 'नाम' सोबत घेऊन आलो व जातानाही केवळ नामच सोबत घेऊन जाणार आहोत. गडबड होते ती इथे असतांना. आम्हांला 'सोहम' चा विसर पडतो. नाम विसरतो. मग आयुष्याची गाडी रुळावरुन घसरायची भीती जेव्हा निर्माण होते तेव्हा आम्ही या ना त्या कारणाने कुठल्या ना कुठल्या शक्तीचे नाम घेतो. पण जर का सद्गुरुंचे नाम कायमस्वरूपी घेतले व आपल्या जीवनाची गाडी सतत नामाच्या चाकावर चालत ठेवली तर त्या गाडीचे सारथ्य साक्षात सद्गुरुच करतील. या गाडीची चाके ते कुठेही रुतू देणार नाहीत. गाडी रुळावरून घसरु देणार नाही. म्हणूनच तर सद्गुरु भाऊमहाराजांनी अखिल मानवजातीला एक मोलाचा संदेश दिला -
"नामचिंतनाने चिंता मुक्त व्हा"
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|