|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

नामाच्या नावेत बसलो तर कुठलीही वादळे येवोत, हा जीवनरूपी भावसागर सहज पार होऊन जातो. जीवाला शिवाची साथ हवी असेल तर नामाशिवाय पर्याय नाही.

नाम आधी नाम नंतर
जीव आणि शिव यामध्ये केवळ नामच अंतर
प्रपंच आणि परमार्थ केवळ नामानेच सार्थ
नामानेच आपला जन्म होई कृतार्थ

(आधी सांगितल्याप्रमाणे वरील ओळी या श्रीशंकर महाराजांनी स्वतः माझ्यासमोर रचून मला लिहिण्यास सांगितल्या आहेत.)

एवढेच नव्हे तर निर्गुणाला सगुणामध्ये आणण्याची ताकदही फक्त नामात आहे. सद्गुरु भाऊमहाराज हे निर्गुण रुपात वावरणाऱ्या वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचेच अवतारी सगुण रुप आहे. त्यांनी भक्तांना दिलेल्या प्रत्येक प्रचितीची साक्ष पटवली. कुठलीही अनुभूति ही सायकॉलॉजिकली वाटली म्हणून नाही तर; हे असंच कसं आहे हे नेहमी वैज्ञानिक दृष्ट्या व वास्तवाचे भान ठेवून त्यांनी पटवून दिले. म्हणून तर या प्रचितीनां, या अनुभवांना, साक्षात्कारी अनुभूति म्हणायचं आणि म्हणूनच ते श्रीगुरुदत्त - साक्ष पटवणारे असे आहेत. त्यांनी भक्तांच्या मनात, जीवनात भक्तियोग, कर्मयोग व ज्ञानयोग रुजवला.

भक्तांना विविध प्रापंचिक व अध्यात्मिक अनुभव देऊन, त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये आनंद फुलवून 'आनंदयोग' ही साधला. असे हे आनंदयोगेश्वर साक्षात शिवाचेच रुप आहे. त्यांचे जन्म नक्षत्र 'आर्द्रा' जे शिवाचे आहे, जन्म दिवस व निजानंदगमन दिवसही सोमवार जो शिवाचा आहे. शिव म्हणजेच लय, म्हणजेच स्वतःमध्ये विलीन करुन घेणारा, सामावून घेणारा, असा हा आनंदयोगेश्वर निळकंठ.

याच आंतरिक विचारांतून व सद्गुरु भाऊमहाराजांच्या सगुण रुपातील मिळणारा निर्गुणात्मकाचा जो आनंद आजपर्यंत अनुभवला त्यातून त्यांच्यावरील नामजप स्फुरला गेला.
|| हे वासुदेव श्री गुरुदत्त | आनंदयोगेश्वर निळकंठ ||

हा नामजप भाऊंना महाप्रसादाच्या दिवशी म्हणून दाखवला. त्याआधीच || दिगंबरा दिगंबरा वासुदेव गुरुभाऊ दिगंबरा || हा नामजपही केला गेला होता. हे दोन्ही नामजप त्यांना अतिशय आवडले. ते म्हणाले, "हे साक्षात अक्षरब्रम्ह आहे." आम्ही विचारले, "भाऊ, या दोन्ही नामजपांचे नामस्मरण ठेवण्याची इच्छा आहे. आपण आज्ञा दिलीत तर..." भाऊ हसत म्हणाले, "या महाशिवरात्रीला सुरुवात करा."

त्यावेळी भाऊमहाराजांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज, एक वेगळीच चमक होती. त्याचप्रमाणे हे सर्व आम्हीच घडवत आहोत असा मिश्किल भावही होता. तेव्हापासून आजतागायत दर महाशिवरात्रीला आमच्या घरी आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांचे नामस्मरण व त्यानंतर पाद्यपूजा असते.

गुरुतत्त्व समजून घ्या - भाऊमहाराजांची दूरदृष्टी व भक्ताची परीक्षा

भाऊमहाराज सगुण रुपात असतांना, नामस्मरणानंतर भाऊमहाराजांच्या चरणांचे पाद्यपूजन करण्याची प्रथा होती. त्याचा आनंद भक्तांना मिळायचा. पण सद्गुरुंची दूरदृष्टी काय असू शकते व भक्ताला ते योग्य मार्गाने कसे पुढे घेऊन जातात याचेच हे उदाहरण !

भाऊमहाराज देहातीत रुपात जाण्याआधी दोन वर्षे, काही कारणास्तव आमच्या घरी महाशिवरात्रीच्या नामस्मरणाला येऊ शकले नाहीत. साहजिकच पाद्यपूजेलाही ते नव्हते. सुरुवातीला आम्हांला थोडं वाईट वाटले. कारण सगुण रुपालाही तेवढेच महत्व आहे. पण आम्हांला त्याचबरोबर गुरुभाऊंचे शब्दही आठवले, "तुम्ही भाऊंच्या देहात अडकू नका. गुरुतत्त्व समजून घ्या. ते महत्वाचे आहे." आमचा जो अध्यात्मिक प्रवास आमच्या गुरुमाऊलीने आजपर्यंत घडवला होता तो पाहता भाऊमहाराज प्रत्यक्षात जरी येणार नसले तरी आम्ही निश्चिन्त होतो. त्यामुळे तेवढ्याच उत्साहाने आम्ही नामस्मरण पार पाडले व पहिल्यांदाच आमच्या सगुण रुपातील सद्गुरु भाऊमहाराजांचे पाद्यपूजन आमच्याकडून निर्गुणामध्ये घडले ते त्यांच्या पादुकांच्या स्वरुपात. त्या पूजनाचा आनंद केवळ आम्हालाच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या सर्व भक्तांना मिळाला.

ठराविक एका स्तरापर्यंत सद्गुरुंशी मनाने एकरूपता साधली की त्या भक्ताची परीक्षा घ्यायला सद्गुरु सुरुवात करतात असे म्हणतात. एखाद्या भक्ताला सर्वांसमक्ष घालून पाडून बोलणे, एखाद्याकडे दर्शनासाठी समोर आल्यास दुर्लक्ष करणे, स्वतःहून त्याच्याशी न बोलणे व स्वतःपासून शरीराने दूर करणे, त्या भक्ताला लांब ठेवणे अशा प्रकारच्या अनेक भक्तांच्या परीक्षा भाऊंनीही घेतल्या. त्यांना हेच पहावयाचे होते की असं करुनसुद्धा जो भक्त गुरुचे नाम व गुरुचे चरण सोडणार नाही तो खरा भक्त.

म्हणूनच शेवटच्या २/३ वर्षात सद्गुरु भाऊमहाराजांनी अनेक भक्तांना स्वतःपासून दूर ठेवले. पण हृदयाने, आत्म्याने ज्यांनी ज्यांनी त्यांच्याशी एकरुपता साधली त्यांना ते कधीच दूर वाटले नाहीत. जेव्हा सद्गुरु अशाप्रकारची परीक्षा घेतात ना, त्यावेळी भक्ताने प.प. वासुदेवानंद स्वामी महाराजांनी लिहिलेल्या 'गुरुस्तुती' मधील एक चरण जरुर आठवावे.

जे दृष्य ते रुप नसे जयाचे | दृष्यांत राहे अविकारी ज्याचे
स्वरूप तोचि अविनाशी अर्थ | तो पूर्ण आनंद गुरु समर्थ

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>