निजानंदगमन
आज विचार केला तर वाटतं - तेव्हा जर का भाऊंनी सद्गुरुंची निर्गुणात्मकमध्ये सेवा करण्याची, पूजन करण्याची सवय व गोडी आम्हाला लावली नसती तर आज आमची काय अवस्था झाली असती? गुरुवर्य भाऊमहाराज हे जवळ जवळ प्रत्येक भक्ताच्या घरातील एक सदस्य झाले होते. ज्या ज्या भक्तांना भाऊंनी शेवटच्या काळात स्वतःपासून दूर ठेवले त्यांनी हे आठवून पहावे की आपण सद्गुरु भाऊंमध्ये, त्यांच्या सगुण रुपामध्ये किती गुंतलो होतो! अशा भक्तांना जर का प्रत्यक्षात सद्गुरुंच्या मार्गदर्शनाशिवाय रहाण्याची सवय वेळीच लावली नसती तर आज ते भक्त मानसिकरीत्या उन्मळून पडले असते.
कारण त्यानंतर दोनच वर्षांनी (सोमवार, ८ मार्च २००४) सद्गुरू भाऊमहाराजांचे निजानंदगमन झाले. ज्या तिथीला प.पू. दादामहाराजांच्या आज्ञेवरून भाऊंनी त्यांच्या गुरुंच्या म्हणजेच प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या स्थानावर गुरुवार व शनिवार सायं. ७.२५ ची आरती सुरु केली, त्याच तिथीला ते देहातीत रुपात गेले. ती परमपावन तिथी म्हणजे तुकाराम बीज. याच दिवशी प.पू. दादा महाराजांचे गुरु प.पू. साटम महाराज (दाणोली) यांचीही पुण्यतिथी असते.
कायम भक्तांमध्ये रमणाऱ्या, प्रत्येक भक्तावर नितांत प्रेम करणाऱ्या आपल्या भाऊंनी आपल्याला सोडून जाणे ही घटना त्यांच्या भक्तांसाठी अतिशय दुःखदायक जरी असली तरी गुरुवर्य भाऊंच्याच म्हणण्यानुसार जेव्हा एखाद्या सत्पुरुषाचा देह पंचतत्वात विलीन होतो तेव्हा तो दिवस आपोआपच शुचिर्भूत दिवस ठरतो. सत्पुरुषांनी देह ठेवल्यानंतर वातावरणात शुद्धता येते आणि तो दिवस पुण्यस्वरुप होतो. ती तिथी पुण्य पावते आणि म्हणूनच त्या दिवसाला पुण्यतिथी म्हणतात.
देहाचा जो आनंद आहे तो आपल्या अनंत भक्तांना देऊन ते मोकळे होतात. म्हणूनच जे भक्त आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांची अनन्यभावाने भक्ती करतात; त्यांना गुरुवर्य भाऊंमहाराजांच्या अस्तित्वाची जाणीव आजही होते. आजही ते दृष्टांतरुपाने अनुभव, प्रचिती देऊन भक्तांना आनंद देत आहेत.
आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांच्या प्रार्थना-स्थळाची स्थापना
तत्पूर्वी महाशिवरात्रीचे भाऊमहाराजांच्या नामाचे नामस्मरण सुरु केल्यानंतर आम्हा काही भक्तांकडून आनंदयोगेश्वर सद्गुरु भाऊमहाराजांच्या प्रार्थना-स्थळाची स्थापना त्यांच्याच उपस्थितीत केली गेली. केली गेली असे म्हणणेच संयुक्तिक आहे कारण सद्गुरुंचे स्थान करणारे आपण कोणी नसतो. आपली तेवढी योग्यताच नसते. त्यांची इच्छा असेल तर मात्र ते आपल्याला माध्यम करून या गोष्टी घडवू शकतात. महाराज आम्हाला टप्याटप्याने पुढे नेत होते.
आमच्या हृदयात तर आमच्या सद्गुरुंच्या कार्याची ज्योत तेवतच होती. आनंदयोगेश्वर भाऊंचे प्रचार आणि प्रसाराचे कार्य हा आमच्या जीवनाचा श्वास होता. पादुका आल्या, आरत्या झाल्या, आता आपल्या अंतरात्म्याला भावलेल्या या सद्गुरुंचे एक लहानसे का होईना पण स्थान व्हायला हवे व त्या ठिकाणी त्यांच्या आरत्या नियमित म्हटल्या जाव्यात असे विचार मनात येऊ लागले.
जे चैतन्यमय जाज्वल्य गुरुतत्व सगुणरूपात एवढी वर्षे वावरले, त्या गुरुतत्वाचे एकत्रित ऊर्जा स्वरूपात, स्थान स्वरूपात पुढील अनेक वर्षे जतन व्हावे व त्या ऊर्जास्रोताचा लाभ पुढील अनेक पिढ्यांना मिळावा अशी आमची आत्यंतिक तळमळ होती. जेव्हा हे आम्ही गुरुवर्य भाऊंशी बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले, "आणखी दोन भक्तांच्या मनातही असेच विचार आहेत. तुम्ही एकत्र येऊन या गोष्टी बोला आणि मग ठरवा."
त्याप्रमाणे आम्ही चौघे म्हणजे विकास खामकर, श्रद्धा खामकर, कुमार उपासनी व श्रीराम करंदीकर आम्ही एकत्र येऊन चर्चा केली. टेंबे स्वामी महाराजांची व साईबाबांची मनापासून प्रार्थना केली की, "सद्गुरु भाऊमहाराजांच्या या महत कार्यासाठी आम्हाला निमित्त करून घ्या."
भाऊंना भेटून त्यांच्याशी याविषयी बोललो. सुरुवातीलाच भाऊंनी स्पष्ट केले, "गुरूंचे कार्य वाटते तेवढे सोपे नाही. त्यात खूप त्रास आहे. गुरु तावून सुलाखून घेतात. तुमच्याकडे जे काही आहे ते सर्व जाईल. तुमच्यावर खूप टीका होईल. बदनामीही सहन करावी लागेल. कदाचित लोकांच्या चपलासुद्धा खाव्या लागतील. पण त्या चपला तुम्हाला लागणार नाहीत याची काळजी गुरु घेतील. तुमची तयारी आहे का ?"
आम्ही 'हो' सांगितल्यानंतर भाऊंनी आम्हाला एक मुहूर्त दिला. या तिथीला असलेली नक्षत्रांची स्थिती ही अनेक वर्षानंतर आली होती व पुढील अनेक वर्षे नक्षत्रांची अशी स्थिती असणार नाही असे गुरुवर्य भाऊंनीच आम्हाला सांगितले. तो दिवस होता रविवार, ९ जुलै २०००. आमच्या हातात फार कमी दिवस होते. पण सद्गुरु पाठीशी असताना कसली चिंता?
गुरुवर्य भाऊमहाराजांनी संगितल्याप्रमाणे आम्ही करत गेलो. मोठे स्थान होईपर्यंत तात्पुरते 'प्रार्थना - स्थळ' स्थापून तिथे दर रविवारी संध्याकाळी भाऊंची आरती सुरु करा असे भाऊ महाराजांनी सुचवले. त्यांनीच सुचवलेल्या एका भक्ताच्या घरी तात्पुरते हे 'प्रार्थना स्थळ' आम्हाला निमित्त करून स्थापन केले गेले व २००४ साली हेच 'प्रार्थना स्थळ' आमच्या घरी, ज्या घरात सद्गुरु भाऊ 'हे माझे घर आहे' असे म्हणत, त्या ठिकाणी हलविण्यात आले. त्यावेळी जाणीव झाली की १९९९ साली गुरुवर्यांनी माझ्या ओटीत त्यांच्या निर्गुण पादुका का दिल्या ?
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|