आज या प्रार्थनास्थळाची कक्षा हळूहळू वाढत जात असून त्याचे 'आनंदयोग धाम' या पादुका-स्थानामध्ये रुपांतर झाले आहे. "माझ्याबरोबर चल, तुला माझ्याबरोबरच यायचंय" या त्यांच्या दृष्टांतांतील शब्दांचा अर्थ आज खऱ्या अर्थाने कळला. हे प्रार्थना स्थळ भविष्यात या घरात होणार याचे संकेत सद्गुरुंनी आधीच कसे दिले होते तेही आठवले.
प्रार्थना स्थळाचे पूर्वीच मिळालेले संकेत
मी त्यावेळी वर्षातून एकदा प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी लिहिलेल्या 'श्री दत्तमहात्म्य' या ग्रंथाचे सात दिवस पारायण करत असे. ७ सप्टेंबर या गुरुभाऊंच्या वाढदिवशी मी त्याचे उद्यापन करीत असे. दाम्पत्याला बोलावत असे. या उद्यापनाच्या दिवशी सद्गुरु भाऊमहाराज आपल्या व्यस्त दिनक्रमातून थोडा वेळ येऊन व जेवून, आशीर्वाद देऊन जात.
१९९८ सालातील ही अनुभूती. त्यावर्षी नागोठणे येथे स्वामी महाराजांचे अखंड १२ तास नामस्मरण होते. दुसऱ्या दिवशीच पहाटे उठून मला परायणाला सुरुवात करायची होती. नागोठण्याला भाऊंची पाद्यपूजा झाल्यानंतर निघताना मी या पारायणासाठी भाऊंचे आशीर्वाद घेण्यास गेले. तेव्हा भाऊ म्हणाले, "महाराजांसाठी आसन ठेव हं. महाराज ऐकायला येणार." पारायण झाले. खूप आनंद मिळाला.
सातव्या दिवशी म्हणजे ७ सप्टेंबर या दिवशी दर वर्षीप्रमाणे भाऊमहाराज येऊन जेवून गेले. नंतर श्री. व सौ. परांजपे दाम्पत्य मेहूण म्हणून जेवले. दक्षिणा घेऊन ब्राम्हण उठणार इतक्यात श्री. परांजपे थरथर कापायला लागले. व थोड्याच वेळात रडायलाही लागले. आम्हाला काही कळेना. मी त्यांना विचारले की, "माझ्याकडून काही चूक झाली का?" तेव्हा थोड्या वेळाने ते म्हणाले की, "आताच प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज इथे येऊन गेले. ते आतल्या खोलीतून आले व कोपऱ्याकोपऱ्याने या हॉलमधील भाऊंच्या खुर्चीजवळ आले. नंतर कुठे गेले कळलेच नाही. मी रडतो आहे कारण साक्षात सद्गुरु समोर येऊन गेले पण मला त्यांना नमस्कार करायचेही सुचले नाही." मला काही कळेना.
दुसऱ्या दिवशी मी गुरुवर्य भाऊंना आदल्या दिवशीचा सर्व वृत्तांत सांगितला व विचारलें, "भाऊ, हे खरं आहे का? आणि खरं असेल तर गेले सात दिवस मी दत्तमहात्म्याचे पारायण केले. मग महाराजांनी मला दर्शन का नाही दिले?" भाऊ म्हणाले, "हे सर्व खरं आहे, श्रद्धा. मी तुला सांगितले होते महाराजांसाठी बसायला आसन ठेव. महाराज सातही दिवस दत्तमहात्म्य ऐकायला आले होते. काल मेहूण वाढून झाल्यानंतर महाराज त्या पाटावरुन उठून बाहेर आले व माझ्या खुर्चीमध्ये विलीन झाले. त्या खुर्चीमध्ये आम्ही आहोत." माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले.
त्यानंतर १९९९ साली जेव्हा बोरिवलीहून खोपोलीला स्वामी महाराजांची पालखी व पदयात्रा निघाली तेव्हा ती पदयात्रा आमच्या घरावरून जात होती. भाऊही थोडे अंतर चालणार होते. जेव्हा आमच्या बिल्डिंगसमोर पालखी थांबली तेव्हा भाऊंनी मला जवळ बोलावले व म्हणाले, "तुझ्या घरातील माझी खुर्ची घेऊन ये. मी जरा वेळ बसतो इथे." बिल्डिंगच्या गेटवरच भाऊ त्या खुर्चीमध्ये १० मिनिटे बसले. त्याठिकाणी सुवासिनींनी त्यांना ओवाळले.
सरळ साध्या वाटणाऱ्या घटनेमध्ये पुढील घडणाऱ्या घटनांचे संकेत कसे असतात ! आज ज्या ठिकाणी भाऊंची खुर्ची त्यांनी ठेवायला सांगितली होती त्याठिकाणी सदगुरु भाऊमहाराजांच्या निर्गुण पादुका व प्रार्थना स्थळ आहे. मला साईबाबांच्या जीवनातील त्या प्रसंगाची आठवण झाली जेव्हा साईबाबा श्री बुटी बनवत असलेल्या मंदिरात एका ठिकाणी थोडा वेळ बसले जेथे आज बाबांचे मंदिर आहे.
नमो गुरवे निळकंठाय - एक सिद्ध मंत्र
त्याच सुमारास आपल्या सगुण रुपातील गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने 'नमो गुरवे निळकंठाय' या सदगुरु भाऊमहाराजांच्या लिखित नामजपाच्या ५५०० डायऱ्यांचा संकल्प केला गेला. सदगुरु आनंदयोगेश्वर निळकंठमहाराजांचे एक भक्त श्री. संजीव वासवानी यांची ही संकल्पना.
"नमो गुरवे वासुदेवाय" हे भक्तियोग, ज्ञानयोग व कर्मयोगाचे प्रतीक आहे तर; हे सर्व साध्य होतानाच जो सर्वात उत्तुंग व उत्फुल्ल असा आनंदयोग साधला जातो त्याचेच प्रतीक आहे "नमो गुरवे निळकंठाय." आनंदयोगेश्वरांच्या प्रार्थना स्थळावर या संकल्पपूर्तीचा याग १३ मार्च २००१ या दिवशी संपन्न झाला. त्यासाठी पुण्याचे दशग्रंथी ब्राम्हण श्री खर्शीकरगुरुजी यांनी पौरोहित्य केले.
या हवनाला सदगुरु भाऊ महाराज स्वतः बसले व त्यांनी स्वतः "नमो गुरवे निळकंठाय" हा नामजप भक्तांसाठी सिद्ध केला.
तुज सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे.
आनंदयोगेश्वर सदगुरु भाऊमहाराज नेहमी आम्हाला गुरुतत्वाविषयी सांगताना म्हणायचे, "तुज सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे." म्हणूनच सदगुरु भाऊंच्या सगुण रुपामध्ये एवढी वर्षे मिळालेला निर्गुणात्मकाचा आनंद व आता त्यांच्या निर्गुण रुपामध्ये मिळत असलेला सगुणात्मकाचा अनुभव व आनंद हा त्यांच्यावरील आरत्या, स्तोत्रे व कवनांमधून दर रविवारी संध्याकाळी ६.३० ते ७.३० या वेळेमध्ये या प्रार्थना स्थळावर व्यक्त केला जातो. ही सामुदायिक आरती सर्वांसाठी खुली आहे.
|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||
|