|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

गेली ५ वर्षे अव्याहतपणे केल्या जात असलेल्या या आरत्यांमुळे या प्रार्थनास्थळावरील वातावरण अतिशय भारल्यासारखे वाटते. रविवारी इथे आरतीसाठी येणाऱ्या भक्तांना त्याचा भरपूर आनंद मिळतो व आत्मिक समाधान मिळते. प्रचित मिळते.

अशीच एक प्रचिती -
मे २००५ मध्ये आम्हाला साईबाबांचा दृष्टांत मिळाला व त्या दृष्टान्तामध्ये त्यांनी आम्हाला शिर्डीस येण्यास सांगितले. आम्ही म्हणजे मी, माझे पती विकास व मुले बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शिर्डीला बाबांकडे जाऊन आलो. त्यानंतर एक रविवार मध्ये गेला आणि सोमवारी रात्री सदगुरु आनंदयोगेश्वरांचा दृष्टांत झाला. भाऊ म्हणाले, "शिर्डीहून येताना साईबाबा तुमच्याबरोबर इथे आले आहेत. या रविवार पासून माझ्या प्रार्थनास्थळावर साईबाबांची आरतीसुद्धा सुरु करा." त्याप्रमाणे आम्ही या प्रार्थना स्थळावर साईबाबांची आरती रविवार, ५ जून २००५ या दिवसापासून म्हणायला सुरुवात केली.

सदगुरु कशी साक्ष देतात! त्याच रविवारी स्थानाचे दोन भक्त श्री. दिपक साखळकर व श्री. राजन चोरगे हे पहिल्यांदाच आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांच्या प्रार्थना स्थळावर आरतीसाठी आले. त्यांच्याकडून कळले की ५/६ दिवसांपूर्वी श्री. राजन चोरगे यांना गुरुवर्य भाऊमहाराजांचा दृष्टांत मिळाला की 'आनंदयोगेश्वर सदगुरु भाऊमहाराज हे साईरुपात आपले कार्य करण्यासाठी निघाले आहेत.' त्यांना रविवारी येथे आरतीला यावेसे वाटले व आल्यानंतर कानावर पडली ती भाऊमहाराजांच्या आरतीबरोबरच साईबाबांची आरती; जी आम्ही गुरुभाऊंच्या मार्गदर्शनानुसार प्रथमच सुरु केली होती. आणि 'गुरुसाधना' या आरत्या झाल्यानंतर सदगुरु भाऊंनी जे मनोगत व्यक्त केले त्यातीलच एक वाक्य मला आठवले - "तूज सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. निर्गुण रूपात गेल्यानंतर सदगुरु आपल्या सद्भक्तांना खऱ्या अर्थाने सगुण साक्षात्कारी प्रचिती देण्यास सुरुवात करतात.”

सद्गुरुंचे ऋण
आज मागे वळून बघताना लक्षात येते की कशाप्रकारे सुरुवातीपासूनच प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज व आनंदयोगेश्वर सदगुरु भाऊ महाराज यांनी आमचे प्रापंचिक व अध्यात्मिक जीवन योजनाबद्ध पद्धतीने घडवत आणले ! कशाप्रकारे जीवाचा कर्मभोग भोगण्यासाठी आमच्या जीवनात अनेक प्रकारचे खाचखळगे आणले व त्या खाचखळग्यातून आम्हाला प्रत्येक वेळी स्वतःच बाहेरही काढले ! कशाप्रकारे अध्यात्माचे कुठलेही अवडंबर माजू न देता, "बाळांनो, अध्यात्म ही कुठे बाहेर शोधण्याची गोष्ट नाही. ते तुमच्यामध्येच आहे" हे आमच्या तनामनांत त्यांनी झिरपवले.

आमच्यावर असलेले आमच्या आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांचे हे ऋण आम्ही अनेक जन्मात फेडू शकणार नाही. अजुनही आठवतात - स्वछ पांढरा शुभ्र झब्बा लेंगा घालून आरतीला उभे रहाणारे भाऊ, अजुनही आठवतात - 'जितेंद्रिय गणाग्रणी रभिरतः परब्रह्मणी' म्हणत भक्तांना ज्ञानामृत पाजण्यासाठी प्रवचनाला सुरुवात करणारे भाऊ, अजुनही आठवतात - महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी असलेल्या नामस्मरणाला वीणा घेऊन, नामस्मरणात रममाण होऊन नाचणारे भाऊ आणि भक्तांच्या आनंदासाठी त्यांच्या घरी जाऊन, मग ते घर कुठेही असो, स्वतः तल्लीन होऊन सर्वांनाच तल्लीन करणारे भाऊ.

अजुनही आठवतात - असामान्य असूनही सामन्यांमध्ये सहजपणे मिसळणारे भाऊ. अजुनही आठवतात - आपल्या गुरुंच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यासाठी जीवाचे रान करणारे भाऊ व त्यासाठी सातासमुद्रापार जाऊन तिथल्या भक्तांनाही आपले गुरु कळावे म्हणून तासनतास बोलणारे भाऊ.

अजुनही आठवतात - केवळ समाजाला व आपल्या भक्तांना स्वामी महाराजांची स्पंदनं मिळावी म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला, कितीही थकलेले असले तरी, तीर्थराज पूजन करून, कलश डोक्यावर घेऊन नाचणारे भाऊ. भक्तांच्या समस्या सोडविण्यासाठी कायम तत्पर असलेले भाऊ, त्यासाठी “चिंता करू नकोस बाळ" असे माऊलीच्या प्रेमाने सांगणारे भाऊ. अजुन कानामध्ये घुमतो त्यांनी प्रेमभराने उच्चारलेला एक शब्द

"आशीर्वा ऽऽ द"

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous      Next >>