|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

कृपा म्हणजे मानव देहामध्येच साक्षात्काराने दिसणारे एक तत्व आहे. ज्या भक्तांना सद्गुरुरूपी प्रयोगशाळेत कसे जावे हे कळते व तेथे गेल्यावर तो अतिशय विनम्र होऊन सर्वतोपरी लायक भक्त होतो, तेव्हा प्रयोग यशस्वी होतो. त्या शुभ वेळेला जी स्पंदने त्या सत्पुरुषाकडून भक्ताला प्रदान होतात त्यालाच कृपा झाली असे म्हणतात. कृपेला अस्तित्व नाही पण कृपा झाली हे मानवी देहाला नक्की जाणवते जेव्हा त्या मानवाची आर्तता, त्याची शरणांगतता व त्याच्यावरील संकट यांची सांगड सदगुरु घालतात व त्या संकटाचे निवारण होते. परंतु कृपा व सदगुरु कृपा यातही फरक आहे.

नर करणी करे तो नर का नारायण बन जाये. याप्रमाणे आपल्या मध्ये नारायण म्हणजे स्वर्ग निर्माण करायचा आहे की नरक हे आपणच ठरवायचे आहे. स्वर्ग निर्माण करण्यासाठी ज्या गुरुतत्वाची कृपा प्राप्त झाली त्याच्याशी संवाद निर्माण झाला पाहिजे. त्या सद्गुरुंनी सांगितलेली मार्गदर्शक तत्वे व अध्यात्मातील पथ्ये यांची कास डोळसपणे धरली पाहिजे. दैनंदिन कर्तव्ये यथासांग व कसोशीने मनापासुन पार पाडण्याचा प्रयत्न केला पाहजे. अशाप्रकारे केवळ सत्याची कास धरुन स्वधर्माचे पालन करताना त्यात जर का पेचप्रसंग आले तर शांत राहून वेळी अपमान, निंदा सहन करूनही अंतर्यामी आनंदी असावे. सतत नामस्मरणात दंग राहिल्यास प्रयत्नाने असे राहता येईल व मग तुमच्यात सद्गुरुतत्वाचा वास होऊन सदगुरु कृपेचा लाभ होईल. तुमच्याकडून नेहमी सत्कर्मच घडत गेल्यामुळे षड्रिपूंचे थैमान शांत होऊन खरोखरच नर का नारायण बनण्याकडे वाटचाल करता येईल.

........आनंद योगेश्वर भाऊ महाराज

|| श्री आनंदयोगेश्वर निळकंठाय नमः ||

<< Previous