आपल्या भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन करताना ते म्हणायचे की “आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये तणावमुक्त जीवन जगण्याची कला केवळ अध्यात्माच्याच माध्यमातून साध्य होऊ शकते. प्रत्येकाच्या शरीरात अंतर्याम आहे; पण तेच त्याला कळत नाही. त्यावर विकारांची पुटे चढत गेल्यामुळे त्याची जाणीव त्याला होत नाही. केवळ देहंबुध्दीच्या माध्यमातून अध्यात्माचा विचार न करता अंतर्यामाशी संबंधित असलेल्या आत्मबुध्दीच्या सहाय्यानेच त्याचे ज्ञान होऊ शकेल. आत्मबुध्दीचा प्रभाव वाढू लागला की विकारांवर ताबा मिळवता येतो. त्या आत्मबुध्दीचा वर्तनाशी ज्या प्रमाणात मेळ घातला जातो त्या प्रमाणात तणावाची तीव्रता आपोआप कमी जास्त होते. मला निश्चितपणे कोठे जायचे आहे व तिथे जाईपर्यंत मी कसे वागायला हवे याचा विचार प्रत्येकाने आपल्या अंतर्यामी करायला हवा . विश्वामध्ये ज्या अनंत शक्ती आहेत, जे तेज आहे; त्या तेजाचाच आपण एक भाग आहोत याची खात्री पटली म्हणजे काळाच्या ओघात परिस्थितीनुरूप जे काही तणाव निर्माण होतील त्यांना तोंड देण्याची मानसिक ताकद निर्माण होईल व इतरांसाठी तणाव निर्माण करण्यास आपण कारणीभूत ठरणार नाही. तसेच आत्मतत्त्व शोधताना आधी स्वतःमध्ये परिवर्तन होणे आवश्यक आहे. त्यासाठी देहाची व मनाची योग्य बैठक तयार व्हायला हवी; जी केवळ व्यवहारातही सद्विचारांची सांगड घातल्यानेच होऊ शकते.'
त्यांचे हे अनुभवाचे बोल सामान्य माणसाच्या हृदयाला भिडणारे होते. त्यामध्ये कोठेही बुवाबाजीचा किंवा ढोंगीपणाचा लवलेशही नसल्यामुळे आपोआपच सामान्य जन त्यांच्याकडे आकर्षिला गेला. १९७८ ते १९८४ व १९८४ ते १९९० या काळामध्ये सदगुरू भाऊमहाराजांनी आपल्या सदगुरूंची दोन भव्य स्थाने 'ओम् सदगुरू प्रतिष्ठान' या नावाने निर्माण केली आणि 'आसेतु हिमाचल' आपल्या गुरूंच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचे जे 'असिधारा व्रत' त्यांनी घेतले होते; त्यातूनच सूर्य-चंद्र असेपर्यंत शाश्वत टिकणारा आनंद त्यांनी येणा-या अनेक पिढयांसाठी निर्माण करून ठेवला.
१९४८ साली, 'राजाभाऊ हा ठार वेडा झाला आहे. तो मुंबईस राहण्यास लायक नाही. याच्यापासून अनेकांना त्रास होऊ शकतो. तेव्हा याला गावाला नेऊन ठेवलेलेच बरे . ' असे ठरवून त्यांना गावी पाठवले गेले. पण स्वतः सदगुरू भाऊमहाराजांना माहित होते की 'मी वेडा नाही. विशिष्ट अशी शक्ती माझ्या मागे कार्यरत आहे.' झालेल्या अपमानाच्या ओझ्याखाली गुदमरून गेल्यामुळे एकदिवस ते घरापासून लांब असलेल्या एका जंगलवजा ठिकाणी पोचले. एका विषण्ण अशा मनाच्या अवस्थेमध्ये बराच वेळ असताना त्याठिकाणी त्यांना एक जबरदस्त अनुभूति आली आणि त्या अनुभूतिची प्रचिती त्यांना त्यानंतर ५२ वर्षांनी ९ जुलै, २००० या दिवशी आली. या गोष्टीची वाच्यता त्यांनी त्या दिवशी केलेल्या प्रवचनातून सर्वाच्या समक्ष केली. तो ९ जुलै २००० हा दिवस म्हणजेच सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या 'आनंद-योग धाम' या पादुका-स्थानाच्या स्थापनेचा दिवस.
या ५२ वर्षामध्ये त्यांच्या सदगुरूंनी म्हणजेच प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्या अनेक प्रकारे परीक्षा घेतल्या. पण आपल्या सदगुरूंच्या परीक्षेला हा परमभक्त पुरेपूर उतरला. म्हणुनच 'ओम् सदगुरू प्रतिष्ठान' या प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या पादुका स्थानाच्या निर्मितीच्या वेळी त्यांच्या गुरूंनी प्रत्यक्ष त्यांना आपल्या खांद्यावर बसवून त्या वास्तुभोवती एक फेरी मारली.
सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांनी आपल्या गुरूंवर, प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांवर निरतिशय प्रेम केले. श्रीस्वामी महाराजांसमोर नमस्कारासाठी उभे असताना ज्या प्रेमाने ते श्रीस्वामींकडे पहायचे ते पाहून सामान्य भक्तालादेखील हे प्रेम जाणवल्याशिवाय रहात नसे. गुरुवर्य भाऊमहाराज काही भक्तांना आशीर्वाद देताना "महाराऽऽज" हा एक शब्दसुध्दा इतक्या हळूवारपणे व अधिकाराने उच्चारायचे की ऐकणा-याच्या नजरेसमोर तत्क्षणी श्रीटेंबेस्वामी महाराज उभे रहायचे. तसेच आपल्या गुरूंविषयी कुठल्याही प्रकारची माहिती मिळाली की त्यांना अत्यानंद होत असे. असेच एकदा त्यांना कळले की ज्या नाडसूर या गावी त्यांचा जन्म झाला; त्याठिकाणी असलेल्या एका मंदिरामध्ये स्वतः श्रीटेंबे स्वामीमहाराज काही वेळ थांबले होते व त्या मंदिराच्या पायरीवर बसून त्यांनी भाकरीसुध्दा खाल्ली होती. हे ऐकल्यानंतर 'आपल्या सद्गुरूंचे पवित्र चरण माझ्या जन्मगांवी लागले ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे' या जाणीवेने ते कृतार्थ झाले.
एवढेच नव्हे, तर एक दोनदा त्यांच्या सद्गुरूंना प्रत्यक्ष पाहिलेल्या व्यक्तिविषयी त्यांना काही माहिती मिळाली. तेव्हा ते स्वतः जाऊन त्या व्यक्तींना भेटून आले. त्यापैकी एक म्हणजे सप्तर्षीबाई. सदगुरू भाऊमहाराज स्वतः मुंबई मधील खार या ठिकाणी राहाणा-या या सप्तर्षीबाईना भेटून आले होते. सप्तर्षीबाईना आलेला श्रीस्वामी महाराजांचा अनुभव म्हणजे त्यांच्यासमोर श्रीस्वामी महाराज पाण्यावरून चालत पैलतीरी गेले. त्यावेळी ही घटना प्रत्यक्ष आपल्या डोळयांनी पाहिलेल्या उपस्थितांमध्ये श्री. सेनापती बापट हे सुध्दा होते.
प.प. श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांचा प्रत्यक्ष अनुग्रह मिळालेल्या आणखी एका व्यक्तीला सद्गुरू आनंदयोगेश्वर स्वतः जाऊन भेटले. ते म्हणजे माणगांवजवळील साळगांव या गावातील परमपूज्य काकामहाराज खानोलकर. त्यांनी १०४ वर्षाचे असताना आपला देहं ठेवला. परंतु त्याच्या काही काळच आधी त्यांची आणि सदगुरू आनंदयोगेश्वरांची घडलेली भेट ही केवळ योगायोगाची भेट नव्हती. परमपूज्य आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या दृष्टीने श्रीकाकामहाराजांची भेट म्हणजे एक अपूर्व योग होता कारण श्रीकाकामहाराजांनी त्यांच्या गुरूंना प्रत्यक्ष पाहिले व अनुभवले होते. पण श्रीकाकामहाराजांच्या दृष्टीने परमपूज्य आनंदयोगेश्वरांची भेट म्हणजे साक्षात् त्यांच्या सद्गुरूंचीच भेट होती जी त्यांनी देहं ठेवण्याच्या काहीच काळ आधी झाली होती. याची प्रत्ययकारी प्रचिती खालील घटनेवरून येते :
सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज आपल्या काही भक्तांसोबत साळगांव येथे परमपूज्य श्रीकाकामहाराज खानोलकरांच्या निवासस्थानी पोचले. वयोपरत्वे श्रीकाकामहाराजांना स्पष्ट दिसत नसले तरी त्यांना स्पष्टपणे ऐकू येत असे व त्यांचा आवाजही खणखणीत होता. ज्यावेळी सद्गुरू भाऊमहाराज त्याठिकाणी पोचले; तेव्हा कोणीतरी आल्याची चाहूल लागताच श्रीकाकामहाराज उठून उभे राहिले. त्यांना स्पष्ट काहीच दिसेना. परंतु सदगुरू भाऊमहाराजांनी जेव्हा त्यांची चौकशी करताना त्यांच्याशी संभाषण केले, त्यावेळी त्यांचा आवाज ऐकून श्रीकाकामहाराज पटकन उद्गारले - "स्वामी महाराज" व त्यांनी लगेच सद्गुरू भाऊमहाराजांना, श्रीटेंबेस्वामी महाराज म्हणून नमस्कार केला.
|