|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

खरोखरंच श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजच आपल्या शिष्याला त्याच्या निर्वाणापूर्वी दर्शन देण्यास तर आले नव्हते ना!

आनंदयोगेश्वर सद्गुरू निळकंठ महाराज आपले गुरू प. प. टेंबेस्वामी महाराज यांच्याशी बोलत. त्यांच्या एका शिष्याला त्यांनी फक्त एकदाच त्यांच्या गुरूंचा, श्रीटेंबेस्वामींमहाराजांचा आवाजही काही क्षण ऐकवला होता. क्वचित ते प . प . वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या विषयीच्या कुठल्याही वाङमयात उल्लेख न केलेल्या गोष्टी भावसमाधीमध्ये जाऊन बोलत व बोलता बोलता अचानक थांबून विषय बदलून टाकत. सदगुरू आनंदयोगेश्वरांशी बोलताना झटक्यात त्यांचे व्यक्तीमत्त्व वेगळे भासायला लागायचे व लक्षात यायचे की हे काहीतरी वेगळे आहे. परंतु काही शिष्य वगळता त्यांनी शेवटपर्यंत कोणालाच हे कळू दिले नाही की, स्वामी महाराज त्यांच्या या परमभक्ताच्या माध्यमातून बोलतात की, तेच साक्षात् श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे अवतारी स्वरूप आहेत. मात्र ९ जुलै २००० या दिवशी जेव्हा त्यांच्या पादुका स्थानाची स्थापना त्यांच्याच काही शिष्यांकडून त्यांच्याच आशीर्वादाने व उपस्थितीत केली गेली त्यावेळी प्रवचनात बोलताना गुरुवर्य भाऊमहाराज बोलून गेले - "आजचा दिवस हा निर्गुण रूपामध्ये असलेल्या प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांचे सगुण रूप कळण्याचा दिवस आहे. '

....... लक्षात येते की गुरूंचा प्रत्यक्ष अनुग्रह किंवा दीक्षा न मिळताही गुरूंनी समाधी घेतल्यानंतर १७ वर्षांनी जन्माला आलेल्या, स्वतःला 'गुरूंचा एक सामान्य भक्त' म्हणवणा-या आनंदयोगेश्वर सदगुरू निळकंठ महाराजांकडून प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वतींचे एवढे भव्य व अलौकिक कार्य कसे काय झाले असेल. सदगुरू आनंदयोगेश्वरांच्याच शब्दात सांगायचे तर "तूज सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. ". प.प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या जीवन-कार्यप्रणालीचा प्रचार व प्रसार करून हजारो सश्रध्द भक्तांचे पारमार्थिक प्रबोधन केलेल्या सदगुरू भाऊमहाराजांचा भक्तपरिवार भारताबाहेरही इंग्लंड, अमेरिका, आफ्रिका, सिंगापूर, कॅनडा, आखाती देश अशा अनेक ठिकाणी विखुरलेला आहे. अशा या भक्तांच्या लौकिक व पारमार्थिक उद्धारासाठी अखंड झिजणा-या सद्गुरू भाऊमहाराजांनी २००४ साली तुकाराम बीज या पुण्यपावन तीथिला आपला देहं ठेवला. त्यावेळच्या भक्तांच्या अवस्थेचे वर्णन भाग १ मध्ये विस्तृतपणे आले आहे.

त्यांनी आपल्या प्रवचनांमधून विज्ञानाचा आधार देत नेहमीच हे सांगण्याचा प्रयत्न केला की - "काहीही निर्माण होत नाही व काही नष्टही होत नाही. फक्त त्याचे स्वरूप बदलते.” त्यांच्या पादुका- स्थानावर नियमित आरतीला उपस्थित रहाणा-या भक्तांना अनेक प्रकारच्या प्रचिती देत त्यांनी त्याची साक्ष पटवली आहे. अशा सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांना आम्हा भक्तांचे कोटि कोटि प्रणाम. त्यांनी प्रसवलेली नामाची गंगा अखंड वाहत राहो व सर्वांना त्याचा निरंतर आनंद मिळो हीच सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या चरणी श्रध्दापूर्वक प्रार्थना.

<< Previous      Next >>