|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

गुरूभक्तीने केली शाश्वताची जोपासना
सगुण रूपात असताना सत्पुरूषांच्या माध्यमातून त्यांच्या असंख्य भक्तांना अनेक ज्वलंत प्रचिती येत असतात. तरीही, सर्व संत सत्पुरूषांची चरित्रे वाचल्यानंतर आपल्या हे लक्षात येते की समोर असलेल्या सगुण देहाचे मोल त्यावेळी समजत नाही. त्याच्या तुमच्या-आमच्यासारख्या दिसणा-या सगुण देहाच्या माध्यमातून होत असलेल्या अशा लीलांना, समाजात अनेक वेळा योगायोगाचे नांव दिले जाते . तथापि, सदगुरू आनंदयोगेश्वरांसारख्या विभूतींचा जन्म हा जगाच्या कल्याणासाठीच असल्यामुळे ते आपल्या सद्भक्ताच्या व पर्यायाने समाजाच्या कल्याणासाठी आपला देहं झिजवतच असतात. म्हणुनच अशा विभूति जेव्हा निर्गुण रूपात कार्यरत होतात; तेव्हा त्यांचे निष्काम कार्य करणा-या भक्तांना विश्वातील सर्व शुभ शक्ती सहाय्यभूत होत असतात. सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या कार्यामध्ये गेल्या एक दीड वर्षापासून हा अनुभव आम्ही नित्य घेत आहेत.

सद्गुरू श्रीशंकरमहाराज यांनी २००५ सालामध्ये रविवार ५ जून या दिवशी आम्हाला सांगितले की “आज संध्याकाळी तुमच्या हॉलमधील सोफा आणि तत्सम मोठे सामान बाहेर ठेवा." आम्हाला त्याचे कारण कळले नाही. 'आनंदयोग धाम' हे सदगुरू आनंदयोगेश्वरांचे पादुका स्थान आमच्याच घरी होते. तसेच आमचे घर तळ मजल्यावर असल्याने, आम्ही मागच्या बाजुनेही दरवाजा ठेवल्यामुळे वेळप्रसंगी आम्हाला सामान बाहेर ठेवता यायचे. परंतु श्रीशंकरमहाराजांच्या त्या बोलण्याचा अर्थ आम्हाला कळला नाही. त्यासुमारास आम्हाला सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या निर्गुण रूपातील सगुण अस्तित्वाची प्रचिती एवढया ज्वलंतपणे येण्यास सुरूवात झाली होती की त्यामुळे आम्ही काहीही विचार न करता त्या संध्याकाळी आरतीच्या आधी सर्व मोठे सामान बाहेर ठेवले.

आरती सुरू होण्याच्या अर्धा तास आधी स्थानावरील दोन भक्त श्री. साखळकर व श्री. चोरगे हे पहिल्यांदाच आमच्याकडे आरतीसाठी आले. त्यानंतरच्या पुढच्या अर्ध्या तासात आमचा संपूर्ण हॉल माणसांनी भरला. एवढेच नव्हे तर काही भक्तांना बाहेर उभे रहावे लागले. आता मात्र आम्हाला श्रीशंकरमहाराजांनी सामान बाहेर ठेवण्यास का सांगितले हे लक्षात आले. ५ जून २००५ या दिवशी बरेचसे भक्त पहिल्यांदाच सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या आरतीसाठी आले आणि त्यानंतर सद्गुरूंचेच झाले

एवढे सगळे लोक त्यादिवशी येणारच होते म्हणून श्रीशंकरमहाराजांनी आम्हाला आधी संकेत दिले की त्यांच्याच अदृष्यातील लीलांमुळे एवढे सगळे लोक आले हा विचार थोडावेळ करून आम्ही सोडून दिला. कारण नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधू नये असे म्हणतात. त्यानंतर श्रीशंकरमहाराजांनी 'सदगुरू आनंदयोगेश्वर.. एक साक्षत्कारी अनुभूति भाग १' हे पुस्तक माझ्याकडून लिहून घेतले. सदगुरू एकेक टप्पा पुढे घेऊन चालले होते. सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या या कार्यामध्ये आम्हाला श्रीशंकरमहाराजांचे प्रत्येक लहान सहान गोष्टीमध्ये मार्गदर्शन मिळत होते. तरीही आमच्याकडे श्रीशंकरमहाराजांचा एकही फोटो नव्हता. आमच्या ते लक्षातही नव्हते.

तत्पूर्वी, दर सोमवारी सदगुरू आनंदयोगेश्वरांसाठी पिठलं-भात व श्रीशंकरमहाराजांसाठी कांदाभजी असा नैवेद्य आम्ही पूर्ण श्रध्देने दाखवत असू. एका रविवारी रात्री सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचा दृष्टांत मिळाला व त्यात ते असे म्हणाले की "उद्या शंकरमहाराज स्वतः भजी खायला येणार हं!" याचाही अर्थबोध झाला नाही. कारण सदगुरू स्वतः नैवेद्य ग्रहण करतात या श्रध्देनेच मी त्यांना जेवण वाढते. त्यामुळे आणखी 'स्वतः' म्हणजे काय हे कळेना - दुस-या दिवशी सोमवारी संध्याकाळी आम्ही बाहेर एक काम आटपून आलो व स्नान करून सायंकाळची आरती केली. श्री. विकास स्तोत्रपठण करत होते आणि मी श्रीशंकर महाराजांच्या कांदाभजीची तयारी करत होते.

एवढ्यात दारावरची बेल वाजली. दरवाजात श्री. साखळकरांना पाहून आम्हा दोघांनाही आश्चर्य वाटले, कारण तोपर्यंत ते फक्त रविवारी आरतीसाठी यायचे. मी किचनमध्ये भजी करत होते. श्री. विकास यांनी त्यांना त्यांच्या अचानक येण्याचे कारण विचारल्यावर ते म्हणाले “आज सकाळी मी झोपेतून उठलो ते सद्गुरू भाऊमहाराजांच्या आवाजाने. मला सद्गुरू भाऊंचा स्पष्ट आवाज ऐकू आला की 'तुझ्याकडे जो एकमेव शंकरमहाराजांचा फोटो आहे तो आजच्या आज खामकरांकडे पोचता कर'. मी माझ्याकडचा श्रीशंकरमहाराजांचा फोटो शोधून काढला आणि तो घेऊनच मी आता तुमच्याकडे आलो आहे.” असे म्हणून त्यांनी पिशवीतून श्रीशंकरमहाराजांचा फोटो काढला व श्री. विकास यांच्याकडे सुपूर्त केला . श्री . विकास यांनी त्या फोटोवर मस्तक टेकून नमस्कार केला व मुख्य गाभार्‍यामध्ये श्रीशंकरमहाराजांना विराजमान केले.

त्याचवेळी मी किचनमधून दर सोमवारी करत असलेली कांदाभजी घेऊन बाहेर आले. ज्यावेळी मी कांदाभजीचा नैवेद्य श्रीशंकरमहाराजांना दाखवला त्यावेळी खरोखरंच त्या फोटोरूपाने श्रीशंकरमहाराज स्वतः तिथे हजर होते. सदगुरू भाऊमहाराजांनी आदल्यादिवशी दृष्टांतात सांगितलेल्या गोष्टीची सत्यता अशाप्रकारे पटली आणि आम्हाला अतिशय गहिवरून आले. निरनिराळया रूपात वावरत असलेले गुरूतत्व आम्हाला सर्वतोपरि कृपाशीर्वाद देऊन कृतकृत्य करत होते.

कुठल्याही जागृत मंदिरामध्ये किंवा स्थानांवर तेथील शुभशक्तीच्या संवर्धनासाठी हवने केली जातात. या हवनांमध्ये किंवा यागांमध्ये ज्या इष्टदेवतेचा तो याग असतो त्या देवतेच्या सिध्दमंत्रांचे पठण केले जाते. तसेच त्या मंत्रांचा काही भाग त्या यज्ञनारायणाला, त्या अग्नीदेवतेला अर्पण केला जातो. या मंत्रांचे पठण शास्त्रशुध्द पध्दतीने व अतिशय शूचिर्भूत वातावरणामध्ये होणे आवश्यक असते. अर्थात् अशा गोष्टींचे फार थोडेच ज्ञान असल्यामुळे आम्ही कधीही असे यज्ञयाग करण्याचा विचारही केला नाही. तथापि, सदगुरू आनंदयोगेश्वरांचे हे कार्य सर्व गुरुतत्वशक्तींच्या इच्छेने आणि प्रेरणेनेच चालू असल्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी आणि व्यवस्था त्यांच्याशिवाय कोण करणार?

जून महिन्याच्या तिस-या आठवडयामध्ये सदगुरूंनीच आदेश दिला की ७ जुलै या दिवशी नवचंडी याग करायचा. असा विचार पूर्वी कधीच केला नसल्याने हा याग कसा करायचा, त्याचे पौरोहित्य कोणी करायचे, त्यासाठी सामान काय लागेल, खर्च किती होईल, वगैरे गोष्टींची चर्चा आम्ही करू लागलो. शिवाय हे स्थान आमच्या घरी असल्यामुळे एवढया लहान जागेमध्ये हवन करणे शक्य होईल का, असाही प्रश्न आम्हाला पडला. आमच्या बुध्दीप्रमाणे अनेक ठिकाणी चौकशी केल्यावर एका ठिकाणी असे पौरोहित्य करणा-यांचे मंडळ आहे व तेथे या हवनासाठी ब्राम्हण मिळू शकतील असे आम्हाला कळले . त्याप्रमाणे त्यांना संपर्क करून आम्ही एक मुख्य ब्राहण निश्चित केले. त्यांच्याबरोबर आणखी ८/१० ब्राम्हण येणार होते. सर्व कार्यक्रम निश्चित करून आम्ही निश्चिंत झालो .

तोपर्यंत आम्ही पंचांगही बघितले नव्हते. आषाढ शुध्द प्रतिपदा ही प.प. श्रीटेंबे स्वामी महाराजांची पुण्यतीथि कुठल्या दिवशी आहे व त्यादिवशी आपल्याला काय करता येईल हे पहाण्यासाठी आम्ही कालनिर्णय बघितले आणि आनंदाने आश्चर्यचकित झालो. कारण श्रीस्वामी महाराजांची पूण्यतीथि ७ जुलै या दिवशीच होती. अशाप्रकारे, सदगुरू आनंदयोगेश्वरांनी आधीच त्यांच्या सद्गुरूंच्या पुण्यतीथिचा कार्यक्रम निश्चित करून ठेवला होता व तो कार्यक्रम आमच्याकडून तेच करून घेणार होते.

त्याच सुमारास ब्राम्हणांनी या नवचंडी यागासाठी जो खर्च सांगितला व पाठ वाचनाची जी पध्दत सांगितली ती खरोखर योग्य आहे का हे पडताळण्यासाठी म्हणून आम्ही सदगुरू भाऊमहाराजांचे नेहमीचे पुरोहित दशग्रंथी ब्राम्हण पुण्याचे श्री. खर्शीकरगुरूजी यांना फोन करून या यागासंबंधी माहिती विचारली होती . यागाच्या ७/८ दिवस आधी श्री . खर्शीकर गुरूजींचा एका रात्री आम्हाला फोन आला व त्यांनी श्री . खळतकर गुरूजींनी या हवनासाठी तुमच्याकडे येण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे, असे सांगितले. सद्गुरू भाऊमहाराज देहरूपात असताना श्रीस्वामी महाराजांची पुण्यतीथि, तीर्थराज पूजन करून साजरी करायचे, त्यावेळी श्री . खळतकर गुरूजी हेच त्या संपूर्ण कार्यक्रमाचे पौरोहित्य करायचे . यावर्षीसुध्दा सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या पादुका स्थानावर सदगुरू इच्छेने संपन्न होणा-या या यागासाठी त्यांची योजना बहुधा सद्गुरूंनीच केली असावी या विचाराने आम्ही त्यांना आनंदाने होकार दिला.

आदल्या दिवशी, म्हणजे ६ तारखेलाच सर्व ब्राह्मण पुण्याहून आमच्या घरी उतरले . आम्ही घराबाहेर मांडव घातला होता. ७ जुलै २००५ या दिवशी 'आनंदयोग धाम'वर श्रीनवचंडी याग अतिशय शूचिर्भूत वातावरणामध्ये संपन्न झाला. यागाच्या प्रत्येक विधीच्या वेळी श्री. खळतकर गुरूजी त्या विधीच्या मंत्रांचा अर्थ व त्या विधीचे आजच्या आधुनिक विज्ञानयुगातील महत्व सांगत असतात. तसेच श्री. खळतकर गुरूजींचे आणि त्यांच्या बरोबरच्या इतर ब्राम्हणांचे मंत्रोच्चारण अतिशय स्पष्ट आणि लयबध्द असते . साक्षात् दत्तावतारी सदगुरूंसामोर उच्चारल्या गेलेल्या या श्रीनवचंडीच्या मंत्रोच्चारणामुळे साक्षात् शक्तीदेवतेचे अधिष्ठान याठिकाणी जाणवू लागले . ज्या श्रीस्वामीमहाराजांच्या पुण्यतीथिच्या दिवशी हे सर्व दशग्रंथी ब्राम्हण सदगुरू आनंदयोगेश्वरांबरोबर असायचे त्या सर्वांना सदगुरूंनी आजही या दिवशी स्वतःजवळ आणले व त्यांच्याकडून आपल्या गुरूंची पुण्यतीथि साजरी करून घेतली . सर्व ब्राम्हण जेव्हा येथून पुण्याला जाण्यास निघाले तेव्हा श्री . विकास त्यांना बोलून गेले की "लवकरच आपल्याला अजून एक हवन करायचे आहे." त्यानंतर २० जुलैची गुरूपौर्णिमाही सद्गुरूंनी अशीच थाटात साजरी करून घेतली आणि त्याच आसपास सद्गुरूंनी आणखी एक हवन करण्याचा आदेश दिला. मागच्या यागासाठीच खूप खर्च झाला होता. आता पुन्हा एवढा खर्च करणे आम्हाला वास्तविकदृष्टया शक्य नव्हते. परंतु आजपर्यंत कधीही आम्ही सद्गुरूंची आज्ञा मोडली नव्हती. सदगुरू आनंदयोगेश्वर देहरूपात असताना त्यांनी अनेक अशा गोष्टी आम्हाला करायला सांगितल्या; ज्यामुळे लौकिकदृष्टया आम्ही अनेकदा समाजाच्या टीकेला पात्र झालो. परंतु तरीही आम्ही कधीही 'असे का' हा प्रश्न त्यांना विचारला नाही. अक्षरश: डोळे झाकून आम्ही सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या आज्ञेचे शब्दशः पालन केले आहे. त्यामुळे काहीही झाले तरी त्यांनी सांगितलेला याग करायचाच होता. या यागाचे नाव होते श्रीभवानीशंकर याग व त्यांनी दिलेली तारीख होती २५ जुलै.

<< Previous      Next >>