आम्ही पुन्हा श्री . खळतकर गुरूजींना फोन करून तसे सांगितले; तर ते म्हणाले “तुमची जरी २५ जुलै यादिवशी याग करण्याची इच्छा असली तरी त्यादिवशी अग्नीचे बळ असले पाहिजे. मी तुम्हाला पंचांग बघून सांगतो.” आमची खात्री होती की, ज्याअर्थी सद्गुरूंकडून ही तारीख आली आहे त्याअर्थी यादिवशी अग्नीचे बळ असणारच. आणि तसेच झाले . गुरूजींनी आम्हाला २५ जुलै या दिवशी हा भवानीशंकर याग करू शकतो असे सांगितले. पहिल्या यागाचा थोडा फार अनुभव गाठीशी असल्यामुळे या यागाची तयारी करणे सोपे गेले. पहिल्या यागाप्रमाणेच हा भवानीशंकर याग निर्विघ्नपणे व अतिशय पवित्र वातावरणात पार पडला.
साक्षात् शिवाचे अधिष्ठान असणा-या या यागाचे महत्व आणि त्याची पाळणूक किती असेल! परंतु प्रत्येक वेळी आम्ही निश्चिंत होतो कारण हे सदगुरूंचे कार्य तेच करून घेत होते. हे हवन या पादुका स्थानावर सदगुरूंनी का करून घेतले असेल याची प्रचिती व फार मोठा अनुभव आम्हाला दुस-याच दिवशी आला. इथे नित्य नियमाने येणा-या भक्तांच्या चिरंतन शाश्वत आनंदासाठी, या सर्व शुभ शक्तींचे संवर्धन, दोन मोठया शक्तीयागांच्या माध्यमातून सदगुरूंनी केले होते. आम्ही फक्त एक माध्यम होतो. हे हवन सुरू असतानाच खूप मोठा पाऊस पडत होता. परंतु या पावसामध्ये दुस-या दिवशीच्या प्रलयंकारी संकटाची चाहूल अजिबात लागली नव्हती. संध्याकाळी सर्व आटपल्यानंतर गुरुजीही व्यवस्थितपणे पुण्याला गेले .
दुस-या दिवशी म्हणजेच २६ जुलै २००५ या दिवशीचा महाप्रलय संबंध महाराष्ट्रात कोणी विसरू शकणार नाही. सुदैवाने आदल्यादिवशीच्या यागाच्या थकव्यामुळे श्री. विकास ऑफीसला न गेल्यामुळे ते कुठेही अडकले नाहीत व इथे घडलेल्या प्रसंगात आमच्याबरोबर राहू शकले. आमचे घर तळ मजल्यावर असल्यामुळे या महाप्रलयाचा फटका आम्हालाही बसला. याप्रसंगी आमचे जे राखले गेले ते सद्गुरूंनी राखले व जे गमावले गेले तीही सदगुरूंचीच इच्छा होती. जे जे अशाश्वत होते ते सर्व गेले; परंतु जे शाश्वत होते ते सर्व आमच्या सदगुरूंनी टिकवले हीच त्यांची आमच्यावरची खूप मोठी कृपा आहे .
२६ तारखेला दुपारी २ वाजण्याच्या सुमारास श्री. विकास आमच्या मुलीला म्हणाले “पूजा, त्या हवनामधील श्रीभवानीशंकराचे भस्म आता थंड झाले असेल. ते एका मोठ्या चमच्याने परातीमध्ये काढून ठेव.” चि. पूजाने पुढच्या अर्ध्या तासात ते भस्म परातीत काढून ती परात तिने स्वयंपाकघरातील ओट्यावर नेऊन ठेवली. ते भस्म काढून ठेवायला अजून १५ मिनिटे उशीर झाला असता तर ! पण सदगुरू असे होऊ देत नाहीत व त्याप्रमाणेच ते त्या त्या वेळी आपल्या भक्ताला तशी तशी बुध्दी देत असतात.
आमच्या घराचे पडदे बंद असल्यामुळे बाहेर काय गोंधळ चालू आहे हे आम्हाला समजलेच नाही. माझ्या आईचा बोरीवली पश्चिम येथून फोन आला की "बोरीवलीच्या दौलत नगर फ्लाय ओव्हरजवळ खूप पाणी भरले आहे. तुमच्या कडे काय स्थिती आहे?" त्यावर “आमच्याकडे सर्व काही ठीक आहे" असे म्हणून आम्ही मुख्य दरवाजा उघडून सहज बाहेर पाहले; तर आमचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! आमच्या बिल्डिंगच्या दुस-या पायरीपर्यंत पाणी आले होते व पाण्याचा प्रवाह खूपच जोरदार होता. आम्ही आमच्या घराच्या मागच्या बाजुला पहायला गेलो तर तिथेही खूप पाणी साचले होते. पुन्हा मुख्य दरवाजातून पुढल्या बाजुने पाहिले तर पाणी आणखी एक पायरी वर आले होते व तोपर्यंत मागच्या दरवाजाने ते पूराचे पाणी आमच्या घरात शिरलेसुध्दा.
त्या दोन तीन मिनिटांमध्ये काय होतय ते कळायच्या आत, बिल्डिंगमधील माणसे सर्व तळमजल्यांवरील लोकांना वर येण्यास सांगायला आली. श्री. विकास हे मला व मुलीला म्हणाले की तुम्ही वर जा. मी सदगुरू भाऊंबरोबर थांबतो. " हे ऐकून आम्ही दोघीही घरातच थांबू लागलो. तोपर्यंत एक फूट पाणी घरात शिरले होते. इतर माणसे आम्हाला घर सोडण्यास सांगत होती. सर्व इतके अनपेक्षित होते की विचार कारायलाही वेळ मिळाला नाही. आम्ही नेसत्या वस्त्रानिशी बाहेर पडलो आणि वर पहिल्या मजल्यावर गेलो. रस्त्यावर साडेतीन ते चार फूट पाणी वाहताना आम्ही वरच्या गॅलरीतून पाहिले. पुढच्या ५ मिनिटांत मारूती गाडया, टेंपो हे सर्व आमच्या डोळयांसमोर त्या पाण्यातून वाहून चालले होते. आणि आम्हाला कल्पना आली की आमच्या घराची काय स्थिती झाली असेल !
बाकी कशाचीही चिंता आम्हाला वाटत नव्हती. आमचे असे होतेच काय! पण सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या पादुका; ज्या त्यांनी मला १९९९ साली ओटीत दिल्या होत्या, सदगुरूंचा फोटो; जो एवढया वर्षाच्या नियमित सेवेमुळे सजीव जाणवू लागला होता, तसेच आमच्या दोघांच्या सद्गुरूंनी अनुग्रहाच्या वेळी दिलेल्या छोटया पादुका हे सर्व आमच्या नजरेसमोर येऊ लागले.
थोडयावेळाने पाऊस जरी थांबला तरी पाणी ओसरायला अडीच तीन तास लागले. आमचा जीव खाली वर होत होता. कुठे तरी मनात विश्वास होता की सद्गुरूंच्या पादुकांना काही होणार नाही. तरीही रस्त्यावरचे दृष्य पाहिल्यानंतर धडकी भरत होती. संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास आम्ही खाली आलो.. धडधडत्या अंतःकरणाने मोठ्या मुश्किलीने दरवाजा उघडला. आत पाऊल ठेवले आणि काळजाचा ठाव चुकला.
घरामध्ये सर्व सामान इतस्ततः विखुरलेले होते. घरामध्ये जवळ जवळ अडीज फूट पाणी येऊन गेल्याचे दिसत होते. जमिनीवर जवळ जवळ ९ इंचाचा घट्ट गाळ थोडया पाण्यासहित होता. विद्युतपुरवठा खंडीत केल्यामुळे व आकाशही ढगाळ असल्यामुळे घरात पूर्ण काळोख होता. आमच्या घरातील सोफा सेट, शोकेस असे सर्व मोठे सामान या भिंतीकडून त्या भिंतीकडे सरकले होते. ज्या घरामध्ये आपण एवढी वर्षे रहात आहोत त्याची ही वाताहात पाहून वाईट नक्कीच वाटत होते. तरीही आमची नजर शोध घेत होती सद्गुरूंच्या पादुकांची . स्वयंपाकघरातील गॅसचा भरलेला सिलेंडर जेव्हा पाण्याच्या त्या प्रवाहाबरोबर बाहेर हॉलमध्ये आलेला पाहिला तेव्हा सद्गुरूंच्या पादुका चांगल्या स्थितीत मिळण्याची आमची आशा मावळली. तरीही टॉर्चच्या प्रकाशात आम्ही खालचा गाळ हातानेच चाचपत होतो. तेवढयात एका उलट्या झालेल्या खुर्चीच्या खाली आम्हाला काहीतरी दिसले. जवळ जाऊन पाहिले; तर मातीच्या त्या गाळावर सदगुरू भाऊमहाराजांनी माझ्या ओटीत दिलेल्या पादुका होत्या. आणि सर्वात आश्चर्य वाटण्याची गोष्ट म्हणजे एवढया सगळ्या दाणादाणीत त्या पादुका तिच्या खालच्या गादीसहित सहीसलामत होत्या. हा एक खूप मोठा चमत्कारच आहे आणि आम्ही तो आमच्या डोळ्यांनी बघितला आहे. पाण्याच्या एवढया जोरदार प्रवाहाबरोबर जर स्वयंपाकघरातील भरलेला सिलेंडर बाहेर हॉलमध्ये येऊ शकतो तर ती कापसाची गादी पाण्याने जड होऊन खाली बुडायला कितीसा वेळ लागणार होता!
ती गादी खालून पूर्णपणे ओली झालेली दिसत होती परंतु तिच्यावर असलेल्या पादुकांवर पाण्याचा एक थेंबही नव्हता आणि चिखलाचा एक डागही नव्हता. त्या पादुका मी हळूवारपणे माझ्या हातांनी त्या गादीवरून उचलल्या आणि दुस-या क्षणाला ती गादी पाण्यामध्ये गेली. त्या मुख्य पादुका मिळाल्याच्या आनंदात आम्ही बाकी सर्व विसरून गेलो. त्यावेळी काळोखात त्या गाळामध्ये हात घालून आणखी काही शोधणे योग्य नव्हते कारण तो सर्व गाळ नॅशनल पार्कच्या दिशेने आल्याने त्यात लहान सहान किटक असण्याची शक्यता होती. यानंतर पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता नाही असे गृहीत धरून आम्ही पलीकडे रहाणा-या माझ्या आईच्या घरी गेलो. पादुका स्थानाची लाकडाची मखर अडीज फूटापर्यंत भिजल्यामुळे निघताना आम्ही सदगुरू भाऊमहाराजांचा फोटो बेडरूममधील दिवाणावर ठेवून जड अंतःकरणाने गेलो.
आईकडे गेल्यानंतर आमच्या मुलीला एकदम आठवण झाली की आपण श्रीभवानीशंकर यागाच्या भस्माची परात किचनमध्ये ठेवली होती. त्याचे काय झाले ते घरी गेल्यानंतर पाहू असे म्हणून दुस-या दिवशी सकाळी उठून आम्ही आमच्या घरी आलो. आल्यानंतर कळले की रात्री १ वाजता पुन्हा पाणी आले होते आणि यावेळी ते पाणी बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यापर्यंत आले होते. घराचा दरवाजा उघडल्यावर पाहतो तर आदल्या दिवशीपेक्षाही भयंकर परिस्थिती होती. रात्री घरात जवळ जवळ सहा फूट पाणी येऊन गेले होते. आमच्या लक्षात आले की आता सद्गुरूंचा फोटो किंवा भस्म वाचलेले असणे शक्य नाही. आता खरंच रडू येऊ लागले. कालच आपल्याबरोबर तो फोटो घेऊन गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटू लागले. एवढयात किचनमधून माझी मुलगी अक्षरशः ओरडली. आम्ही धावत सर्व इतस्ततः विखुरलेल्या सामानातून वाट काढत किचनमध्ये गेलो तर मुलगी उभी होती तेथेच खाली गाळामध्ये ती परात सरळच्या सरळ घट्ट रुतून बसली होती. तिच्यातील भस्मामध्ये एक थेंबही पाणी गेले नव्हते. हा दुसरा चमत्कार होता. निसर्गनियमानुसार ओट्यावर ठेवलेली ती स्टीलची जड परात, ६ फूट पाण्याच्या जोरदार प्रवाहाने थोडीफार वाकडी होऊन बुडायला हवी होती. परंतु तसे न होता, बहुतेक ती परात पाण्यावर तरंगली असावी व जसजसे पाणी ओसरत गेले ती खाली येत येत गाळामध्ये रूतून बसली असावी. म्हणतात ना 'देवाची करणी आणि नारळात पाणी'.
|