साक्षात् भवानीशंकराचे ते भस्म पूर्णपणे सुस्थितीत आहे हे पाहिल्यावर खूप आनंद झाला . लगेच बेडरूममध्ये जाऊन पाहिले तर बेडरूम पूर्ण अस्ताव्यस्त झाली होती. कपाट उलटे फिरले होते व कपाटातील सर्व कपडे भिजून बाहेर आले होते . किचनमधील भांडी, वाट्या, प्लेट हे सुध्दा वाहून तिथे आले होते. आम्ही कपाट सरकवले व आत गेलो. लाकडाचा दिवाण अख्खा फुगला होता. त्यावरील सर्व गाद्या भिजल्या होत्या व जड होऊन अर्धवट जमिनीवर पडल्या होत्या. पण त्यावर ठेवलेला सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचा फोटो मात्र जशाचा तसा त्या फुगलेल्या दिवाणावर होता. जसे काही हे सर्व आक्रित होत असताना कोणीतरी तो फोटो आपल्या हातात पकडून ठेवला असावा आणि सर्व घडून झाल्यावर पुन्हा तिथे ठेवला असावा. आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. वाचकांना कदाचित ही सर्व अतिशयोक्ति वाटेल पण हे पूर्ण सत्य आहे. सद्गुरूंनी घडवलेला हा चमत्कार आम्ही आमच्या डोळयांनी पाहिला आहे.
एवढेच नव्हे तर आमच्या दोघांच्याही अनुग्रहाच्या पादुका; ज्या एवढया लहान आहेत की वाहत्या पाण्याबरोबर कुठेही विखुरल्या जाऊ शकत होत्या; त्या आपापल्या स्टीलच्या लहान डिशमध्ये वर वाहलेल्या अष्टरच्या फुलासहित आम्हाला मिळाल्या. त्याशिवाय केवळ १५ दिवसांपूर्वी प्रकाशित केलेल्या 'सद्गुरू आनंदयोगेश्वर . . . एक साक्षात्कारी अनूभूति' या पुस्तकाच्या जवळ जवळ ७०० प्रती दोन दिवस आधीपर्यंत अशाच टेवलावर ठेवल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी श्री . विकास यांना काय सुचले कोणास ठाऊक, त्यांनी ही सर्व पुस्तके निरनिराळ्या प्लस्टिक पिशव्यांमध्ये घालून थोडया उंचावर ठेवली. त्यामुळे ती एक मोठी ठेवसुध्दा वाचली. आणखी काय हवे !
त्यानंतर, जे जे आम्हाला मानसिक आधार देण्यासाठी नंतर भेटायला आले त्या सर्वांना आश्चर्य वाटत होते की इतके मोठे नुकसान झाल्यानंतरसुध्दा आम्ही एवढे आनंदी कसे आहोत. कारण आमचा सोफा, शोकेस, टी.व्ही., कॉम्प्यूटर, फ्रिज, मिक्सर, याशिवाय गाद्या, चादरी, उंची साडया, कपडे, मुलांची पुस्तके, जरूरी कागदपत्रे हे सर्व गेले होते. मघाशी म्हटल्याप्रमाणे जे जे सद्गुरूंना या वास्तूमधून घालवायचे होते ते सर्व त्यांनी घालवले व जे त्यांनी पूर्णपणे टिकवले, तो सर्व सद्गुरूंचा शाश्वत ठेवा होता.
त्यानंतर लागलीच घर ठीकठाक करून आम्ही नेहमीची रविवारची आरती चालूच ठेवली. सदगुरू आनंदयोगेश्वरांनी आम्हाला २००० सालामध्ये त्यांचे कार्य सुरू करतानाच सांगितले होते की “तुमच्याकडे जे आहे ते सर्व जाईल." त्यांचे शब्द अशारितीने तंतोतंत खरे झाले व आमची अध्यात्मातील आणि सद्गुरूंच्या कार्यातील वाटचाल योग्य मार्गावरून होत आहे याचीही पोचपावती अशाप्रकारे आम्हाला मिळाली.
आता आम्हाला वेध लागले होते ते सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या ७५ व्या जयंतीवर्षाचे. त्यानिमित्ताने काय काय करता येईल हा विचार आम्ही रात्रंदिवस करू लागलो. आम्ही जरी आमच्या घरी रहायला आलो असलो, तरी प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा आम्हाला आदेश होता, की २० ऑगस्टपर्यंत या घरामध्ये अग्नी पेटवायचा नाही. त्यामुळे आम्ही चहासुध्दा हॉटेलमधून मागवत होतो. सद्गुरू आनंदयोगेश्वरांना नैवेद्य दाखवता येत नव्हता. जवळ जवळ १०/१२ दिवस असे गेले असतील आणि एक दिवस पुण्याहून श्री. खळतकर गुरूजींचा फोन आला.
ते म्हणाले “मी आता एका पुजेला बसलेलो असताना अचानक मला आतून असं वाटलं की खामकरांकडे उदक शांती करावी. तेव्हा पुढच्या आठवडयात मी ४/५ ब्राम्हणांना घेऊन येतो." आम्हाला काही कळेना. आधीच इतके नुकसान झाले होते; त्यात पुण्याहून येणा-या ब्राम्हणांचा खर्च, उदक शांतीचे सामान हे सर्व कसे झेपणार? आम्ही काही बोलणार एवढयात श्री. खळतकर गुरूजी पुढे म्हणाले “हे सर्व मी माझ्याकडून करणार आहे. तुम्ही काही नाही दिलंत तरी चालेल. कदाचित ही श्रीटेंबेस्वामी महाराजांचीच प्रेरणा असावी.
आता सर्व प्रकार लक्षात आला. २६ जुलै या दिवशी जे पाणी आमच्या घरात आले होते; त्यामुळे श्रीटेंबेस्वामी महाराजांना अपेक्षित असलेला सद्गुरू आनंदयोगेश्वरांच्या पादुका स्थानाच्या शूचिर्भूततेला बाधा आली असावी. म्हणूनच त्यांनी आम्हाला २० ऑगस्टपर्यंत अग्नी न पेटवण्याची आज्ञा दिली होती. आम्ही हे सर्व श्री. खळतकर गुरूजींना सांगितले व २० तारखेच्या आसपास ही उदक शांती करण्याची विनंती केली. परंतु म्हणाले की "२५/२६ तारखेपर्यंत माझे सर्व कार्यक्रम ठरलेले आहेत तेव्हा मी त्यानंतर येऊन हे कार्य करतो.
मला अतिशय वाईट वाटले कारण २५ ऑगस्ट या दिवशी श्रावण कृष्ण पंचमी म्हणजेच आमचे परात्पर गुरू श्रीवासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांची जयंती होती. दर वर्षी यादिवशी मी महाराजांना आवडणा-या गुळाच्या शि-याचा नैवेद्य दाखवत असे. मात्र या वर्षी श्रीस्वामी महाराजांना अभिप्रेत असलेली उदक शांती होईपर्यंत घरात अग्नी पेटवायचा नव्हता. त्यामुळे श्रीस्वामींना त्यांच्या जयंतीच्या दिवशी नैवेद्य दाखवता येणार नाही या विचाराने मला खूप वाईट वाटले . पण सद्गुरूच ते! भक्ताची आंतरिक तळमळ किती आहे याची परीक्षा झाल्यावर भक्तावर कृपाशीर्वादाचा वर्षाव करणारेही तेच असतात.
२० तारीख उलटून गेली. आम्ही अजुनही बाहेरूनच जेवण मागवत होतो. २१ तारखेला श्री . खळतकर गुरूजींचा आम्हाला फोन आला की ते २४ तारखेला उदक शांती करण्यास येत आहेत. आम्हाला खूप आनंद झाला! श्रीस्वामी महाराजांपर्यंत आमची तळमळ पोचली होती. २४ ऑगस्ट या दिवशी त्या दशग्रंथी ब्राम्हणांनी सदगुरू आनंदयोगेश्वरांच्या पादुका स्थानावर उदक शांती संपन्न करून येथील वातावरणामध्ये, श्रीस्वामी महाराजांना अभिप्रेत असलेली शूचिर्भूतता निर्माण केली. सर्व कार्यक्रम संपल्यानंतर श्री. खळतकर गुरूजी आम्हाला म्हणाले “आम्ही खरं तर आजच्या दिवशी इथे येऊ शकणार नव्हतो.
कारण आम्हाला एका ठिकाणी एका मोठ्या कार्यासाठी जायचे होते. पण त्या यजमानांना आयत्यावेळी सुतक लागल्यामुळे ते कार्य रद्द करावे लागले. त्यामुळे आम्हाला येता आले. ही सर्व श्रीस्वामी महाराजांची कृपा.'
अशाप्रकारे २५ ऑगस्ट या श्रीस्वामी महाराजांच्या जयंतीच्या आधी 'आनंदयोग धाम'वर उदक शांती संपन्न झाली. श्री. खळतकर गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टीवरून हे सर्व श्रीस्वामी महाराजांनी कसे साधले हे आमच्या लक्षात आले व आम्ही धन्य झालो.
२५ ऑगस्ट २००५ हा श्रीस्वामी महाराजांच्या जयंतीचा दिवस सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या भक्तांसाठी आणखी एका महत्वपूर्ण गोष्टीसाठी औचित्यपूर्ण होता. ७ सप्टेंबर २००५ ते ७ सप्टेंबर २००६ हे सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे ७५वे जयंती वर्ष होते. त्याप्रित्यर्थ 'आनंदयोग धाम' या त्यांच्या पादुका स्थानावरून एका वर्षात ठीकठिकाणी '७५ नामस्मरणे' करण्याचा संकल्प आम्ही श्रीस्वामी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी सोडला. सदगुरूंच्या आशीर्वादाने आणि परमपूज्य नानामहाराज तराणेकर यांच्या कृपेने हा संकल्प नियोजित वेळेआधीच पूर्ण झाला. त्याची साक्षात्कारी प्रचिती भक्तांना कशी मिळाली, त्या सर्व अनुभूति 'नामस्मरण संकल्प' या भागामध्ये आल्या आहेत.
या ७५ नामस्मरणांची पुष्पमाळ 'आनंदयोग धाम'च्या भक्त परिवारातर्फे सदगुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांना श्रद्धापूर्वक अर्पण.
|