सद्गुरुतत्त्व - सगुणात्मक आणि निर्गुणात्मक
आनंदयोगेश्वर सद्गुरु निळकंठ महाराजांच्या सगुण रूपातील अनेक अनुभूती त्यांच्या असंख्य भक्तांना मिळाल्या. परंतु २००४ सालामध्ये तुकाराम बीज या पुण्यपावन तिथीला त्यांनी देह ठेवल्यानंतर 'आपले 'गुरु' आपल्याबरोबर आहेत का? त्यांना आपल्या मनाची अवस्था कळत आहे का?' अशा प्रकारचे विचार माझ्यासारख्या अनेक भक्तांच्या मनात येऊ लागले. आणि ते स्वाभाविक होते. कारण हे संपूर्ण जग मायेने भरले आहे. समोर साक्षात श्रीकृष्ण आदेश देत असतानाही त्याचा परमभक्त असलेल्या अर्जुनाच्या मनात युद्ध करण्याविषयी विकल्प हा आलाच. म्हणूनच तर आपल्या त्या प्रिय शिष्याच्या देह मना-वरील मायेचा पडदा बाजुला करुन त्याची आत्मबुद्धी जागृत करण्यासाठी श्रीकृष्णाला स्वतःचे विराटरूप दाखवून त्याला आत्मसाक्षात्कार घडवावा लागला.
तद्वतच, सतत सद्गुरूंचे ध्यान करणाऱ्या माझ्यासारख्या अनेक सामान्य भक्तांचा 'सद्गुरु ' तत्त्वावरील विश्वास अढळ राहून, त्यांची अध्यात्मिक साधना योग्य प्रकारे चालू राहावी; यासाठीच कदाचित सद्गुरु आनंदयोगेश्वरांनी, देह ठेवल्यानंतर जवळजवळ एका वर्षाने, त्यांच्या निर्गुण स्वरूपातील सगुण अस्तित्वाची प्रचिती 'आनंदयोग-धाम' या त्यांच्या पादुका स्थानाच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्हाला देण्यास सुरुवात केली. या चमत्कार वाटाव्या अशा विलक्षण प्रचितींमुळे कधी आम्ही चक्रावून गेलो, तर कधी हेलावून गेलो. सद्गुरु आनंदयोगेश्वर ही विभूती काय आहे - इहेच जणू सर्व विश्वात्मक शक्ती आमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे वाटू लागले.
वास्तविक पाहता, सद्गुरू आनंदयोगेश्वर सगुण रुपात असताना त्यांनी कधीही त्यांच्या माध्यमातून भक्तांना आलेल्या अनुभवांना अवास्तव चमत्काराचे स्वरूप दिले नाही . स्वकर्माचा सिद्धान्त सांगताना त्यांनी नेहमीच "तुझे आहे तुजपाशी" आणि "चॉइस इज युवर्स" असेच कायम भक्तांना सांगितले असे असूनही चमत्कार वाटाव्या अशा या घटना घडू शकल्या; याचे कारण एकच वाटते ते म्हणजे, सद्गुरूनी दाखवलेल्या 'नामा' च्या मार्गावरील दृढ श्रद्धा व त्या अनुषंगाने आमची पुढची वाटचाल.
" जगाच्या पाठीवर कुठेही असताना , दैनंदिन कर्तव्य- कर्म योग्य प्रकारे करता करता अंतर्यामी सद्गुरूंचे नाम घ्या. सद्गुरु तुमच्या बरोबर आहेत याची प्रचिती तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही" हे सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे भक्तांना दिलेले अमृतवचनआहे. स्वतःच्या अथक परिश्रमातून त्यांनी भक्तांसाठी पेरलेले हे नामाचे बीज आता अंकुरले आहे असे म्हणण्यास हरकत नाही. सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या आनंदयोग धाम या पादुका स्थानावरील आम्हा सर्वांकडून या नाम बीजाची योग्य मशागत करून घेऊन सद्गुरुनीच
त्याचे कामकल्पद्रुम अशा कल्पवृक्षात रूपांतर केले आहे. याचा अनुभव आम्ही '७५ नामस्मरण 'संकल्पाच्या निमित्ताने घेतला.
७ सप्टेंबर २००५ ते ७ सप्टेंबर २००६ हे सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे पंचाहत्तराव्या जयंती वर्ष. आपल्या सद्गुरूंनी अहोरात्र झटून आपल्यासाठी तसेच साऱ्या समाजासाठी जे काही कार्य केले आहे त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण काय करू शकतो त्याचप्रमाणे त्यांनी अंगीकारलेले समाज प्रबोधनाचे व्रत यापुढे कशाप्रकारे पुढे नेऊ शकतो असे विचार रात्रंदिवस आमच्या मनामध्ये येऊ लागले यातून उत्तर मिळाले फक्त एकच ते म्हणजे नामस्मरण.
सद्गुरू भाऊ महाराजांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत केवळ नामस्मरणाच्या आणि नामजपाच्या माध्यमातून भक्तांना प्रापंचिक तथा पारमार्थिक मार्गदर्शन केले. 'ओम सद्गुरु प्रतिष्ठान 'या त्यांनी त्यांच्या दिवस रात्रीच्या अथक प्रयत्नातून शून्यातून निर्माण केलेल्या अध्यात्मिक संस्थेमध्ये, त्यांनी जे अध्यात्मिक उपक्रम राबवले ते सर्व उपक्रम नामस्मरणावर व नामजपावरच आधारित होते. त्यामध्ये श्री दत्तजयंतीच्या निमित्ताने होत असलेला 'नामस्मरण सप्ताह', प.प. श्रीस्वामी महाराजांच्या पुण्यतिथीला होत असलेले सूर्योदय ते सूर्योदय असे २४तासांचे नामस्मरण, श्रीगाणगापूर यात्रेच्या निमित्ताने होत असलेले सूर्यास्त ते सूर्योदय असे १२तासांचे नामस्मरण, आषाढी एकादशीला सूर्योदय ते सूर्यास्त असे होत असलेले स्त्रियांचे नामस्मरण, त्याशिवाय प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी होत असलेले सूर्योदय ते सूर्यास्त असे १२तासांचे नामस्मरण, दर एकादशीला रात्री १ प्रहर होत असलेले नामस्मरण हे सर्व नामस्मरण उपक्रम नित्य नियमाने त्यांनी भक्तांकडून करून घेतले होते. तसेच त्यांनी स्वतः घरोघरी जाऊन ही नामाची स्पंदने लोकांपर्यंत पोचवली होती . आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सर्व नामस्मरणामधे 'आधी केले मग सांगितले 'या उक्तीनुसार ते स्वतः सहभागी व्हायची व तितक्याच तन्मयतेने आपल्या भक्तांना ही त्या नामामध्ये रंगवून ठेवायचे.
आदल्या दिवशी रात्री कितीही उशिरा झोपलेले असले किंवा थकलेले असलेले तरीसुद्धा पहाटे उठून बरोबर सूर्योदयाच्यावेळी गुरुवर्य भाऊ वीणा घेऊन उभे असणारच .संध्याकाळी सूर्योदयाच्या वेळी वीणा ठेवताना सद्गुरू भाऊ नाहीत, असे कधीही घडले नाही. या त्यांच्या व्रतामध्ये १९८४ ते २००४ या २० वर्षांमध्ये कधीही खंड पडला नाही. ज्यांनी ज्यांनी सद्गुरू भाऊ महाराजांच्या मुखातून ही नामस्मरणाने ऐकली आहेत ते खरोखरच धन्य होत. त्यावेळी हातामध्ये श्री नारद मुनींचे प्रतीक असलेली व श्रीसरस्वती देवीचे स्वरूप असलेली वीणा, नामातील विलक्षण तल्लीनता, त्या तल्लीनतेतून वेगवेगळ्या ताला -सुरांमध्ये सद्गुरूंचे नाम घेताना खाली वर चढणारा त्यांचा स्वर आणि नामस्मरण म्हणताना देह- मनाचे भान नसणारे सद्गुरू भाऊ महाराज पाहणे म्हणजे साता जन्माची पुण्याईच. अशा प्रकारचे सद्गुरु भाऊंचे नामस्मरण त्यांच्या मागून म्हणत म्हणत अनुभवताना नवविधा भक्तीतील नामसंकीर्तन या भक्तीची ओळख त्यांनी आम्हाला करून दिली.
त्यामुळेच सद्गुरु आनंदयोगेश्वर भाऊमहाराजांनी खऱ्या अर्थाने जो अमूल्य ठेवा भक्तांना देऊ केला तो म्हणजे या नामाचा ठेवा आणि हा अनमोल ठेवा जपण्यासाठी, वाढवण्यासाठी व त्याचा आम्हाला मिळत असणारा आनंद इतर समाजापर्यंत पोचविण्यासाठी; सद्गुरू आनंद योगेशवरवरांच्या ७५व्या जयंती प्रित्यर्थ नामस्मरणापेक्षा दुसरे प्रभावी आणि सद्गुरू कृपायुक्त असे माध्यम ते कोणते असणार?
याच हेतुने प्रेरित होऊन दिनांक २५ ऑगस्ट २००६ या दिवशी 'आनंदयोग धाम' या सद्गुरू भाऊ महाराजांच्या पादुका स्थानावरून एका वर्षात ठिकठिकाणी '७५ नामस्मरणे करण्याचा संकल्प केला गेला .दिनांक २५ऑगस्ट, २००६ हा दिवस निवडण्याचे कारण म्हणजे, त्या दिवशी श्रावण कृष्ण पंचमी म्हणजेच आमचे परात्पर गुरु प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांची जयंती होती. ज्या सद्गुरु आनंदयोगेश्वर यांनी आपल्या देहातील शेवटचा श्वास असेपर्यंत आपले गुरु प.प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे कार्य केले; त्यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या संकल्पाला अशाप्रकारे त्यांच्याच सद्गुरुंच्या आशीर्वादाचे कोंदण प्राप्त झाले .हा संकल्प पुढे केवळ आणि केवळ सद्गुरू कृपेने फक्त ९ महिन्यांमध्ये पूर्ण झाला आणि या ९ महिन्यांमध्ये 'जेथे जेथे नाम, तेथे मी' या सद्गुरूंनी दिलेला दिलेल्या वचनाची प्रचिती 'आनंदयोग धाम 'च्या सर्व भक्तांनी घेतली.
|