सद्गुरु आनंदयोगेश्वर यांच्या पंचाहत्तराव्या जयंतीप्रित्यर्थचा हा संकल्प आम्ही उभयतांनी, सद्गुरुंसमोर नारळ ठेवून, त्यावर पाणी सोडून सर्व भक्तांच्या साक्षीने केला खरा; पण त्यानंतर जेव्हा आम्ही दोघे थोड्याशा देहबुद्धी वर आलो, तेव्हा मात्र बर्यापैकी धास्तावलो. कारण 'एका वर्षात ७५ नामस्मरणे' हा संकल्प लहान नव्हता. त्यात आमच्यासारख्या सामान्य भक्तांकडे मनुष्यबळ कमी आणि आर्थिक बळ तर अजिबातच नाही अशा स्थितीमध्ये तुटपुंज्या भक्तांच्या साथीने आपापले नोकरी धंदे सांभाळून एका वर्षात हा एवढा मोठा संकल्प कसा काय पूर्ण होणार, या विचाराने आम्ही चिंतेत पडलो. 'भावनेच्या भरात आपण सद्गुरुंच्या नावाला बोल येईल असे भलतेच काहीतरी तर करून बसलो नाही ना' असे वाटू लागले .
त्याच रात्री सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे देह रूपातील मार्गदर्शक गुरु परमपूज्य श्री नानामहाराज तराणेकर (इंदोर )यांचा मला दृष्टांत झाला. परमपूज्य श्रीनाना म्हणाले "बाळांनो, तुम्ही कसली चिंता करता? हा संकल्प काही तुम्ही केलेला नाही. तुमच्या माध्यमातून तो आम्ही केला आहे आणि आम्हीच तो पूर्ण करून घेणार." सद्गुरूंचे जे कार्य 'आनंदयोगधाम'च्या आणि पर्यायाने आमच्या माध्यमातून चालू होते, त्याचे कर्तेपण हे आमच्याकडे नसून या सर्व परमेश्वरीय शक्तीच ते करवून घेत आहेत हा महाबोध परमपूज्य श्रीनाना महाराजांच्या त्या दृष्टांताने आम्हाला झाला. आम्ही निश्चिंत झालो. जे कर्म आपल्याकडून घडत नाही आहे, ज्याचे करते आपण नाही त्याची चिंता कसली करायची? आजपर्यंत त्यांनी करवून घेतले आणि यापुढेही तेच करवून घेणार या दृढ विश्वासाने आम्ही कामाला लागलो.
जिथे जिथे 'आमची" बुद्धी चालवायचा प्रयत्न करायचो तिथे चाचपडायला व्हायचे. पण ज्या ठिकाणी अंतर्यामातील एक विशिष्ट आवाज ऐकून पुढे जायचं त्या ठिकाणी सहजगत्या पुढचा मार्ग दृष्टीपथास यायचा .सुरुवातीला आम्ही 'कोणाकोणाच्या घरी ही नामस्मरणे होऊ शकतील' याची एक यादी बनवली; तेव्हा आमच्या ओळखीतील फक्त ३०/ ३५ नावेच झाली. आता काय करायचे? एक भक्त म्हणाला -"आपण पुन्हा त्याच भक्तांच्या घरी नामस्मरणे रिपीट करू ." दुसरा म्हणाला- " सद्गुरु भाऊमहाराजांच्या जुन्या भक्तांशी संपर्क साधून त्यांना विचारू." असे करता करता आम्ही एकेक नामस्मरण करीत गेलो. अनेकांचे सहकार्य आम्हाला मिळत गेले .नंतर नंतर तर काही लोक स्वतःहून "आमच्या घरी हे सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे नामस्मरण करा" असे सांगायचे. ज्यांच्याकडे हे नामस्मरण असायचे, त्यांच्याकडे सद्गुरु आनंदयोगेश्वराची खुर्ची, त्यांचा फोटो व त्यांनी देहरूपात असताना स्वतः वापरलेल्या पादुका असे सर्व आम्ही घेऊन जायचो. यातील बहुतेक लोक आमच्यासाठी अनोळखी होते. परंतु सद्गुरूंचे कोणाशी काय आणि कुठल्या जन्मातले ऋणानुबंध असतात याची कल्पना आपल्याला कशी येणार?
आम्ही केवळ त्यांच्याच इच्छेने आणि प्रेरणेने पुढे जात होतो .….आणि अचानक आमच्या मनामध्ये विचार आला '-नामस्मरणाच्या यात्रा''काढायच्या.
|