|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

नामस्मरण यात्रा.,...एक अविस्मरणीय अनुभव

यात्रा म्हटली की आपल्या नजरेसमोर काशी, प्रयाग, बद्रीनाथ, केदारनाथ, हरिद्वार, गाणगापूर अशी तीर्थक्षेत्रांची नावे तरळून जातात. पण विचार केल्यावर लक्षात येते, की शेवटी ही सर्व पवित्र ठिकाणे म्हणजे शक्ती प्रवर्तक स्थानेच आहेत. ज्या ठिकाणी गेल्यानंतर, तिथल्या तीर्थराजाच्या पवित्र स्पंदनामुळे आपल्या अंतर्यामातील 'आत्म 'जागृत होणे अपेक्षित असते अशी ठिकाणे म्हणजे ही तीर्थक्षेत्रे. हीच चैतन्यमयी स्पंदने आपण सद्गुरूंच्या नामस्मरणामध्ये अनुभवतो. मग या नामस्मरणासाठी ठिकठिकाणी जाणे या यात्राच नाही का? स्वतः सद्गुरू भाऊ महाराजांनी सुद्धा अशा अनेक ठिकाणी नामस्मरणे केली होती. अशाप्रकारे नामस्मरण यात्रांची संकल्पना ठेवून आम्ही एकूण ४ यात्रा काढल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या यात्रांना आम्ही जात नव्हतो; तर सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजच त्यांच्या इच्छेने आम्हाला घेऊन जात होते हे पुढे घडलेल्या घटनांवरून व या यात्रांमध्ये आलेल्या अनुभवावरून सहज लक्षात येते. या ज्या ४ यात्रा काढल्या गेल्या, त्या प्रत्येक यात्रेमध्ये आम्ही ठरवलेल्या कार्यक्रमाप्रमाणे सर्व काही न होता, त्यात आयत्यावेळी आम्हाला बरेच बदल करावे लागले. आणि या प्रत्येक बदललेल्या कार्यक्रमाच्या वेळी आम्हाला सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे जुने परंतु आंतरिक भक्त भेटले की ज्यांना सद्गुरूंनी बरेच वर्षे आधी, देह रूपात असताना शब्द दिला होता की -" मी तुझ्याकडे नक्की येणार."

कोकण यात्रा

तर अशीही नामस्मरणाची पहिली यात्रा आम्ही दिवाळीनंतर सुरू केली. ही यात्रा भगवान परशुरामाने आपल्या चिन्मय अस्तित्वाने पावन केलेल्या कोकण भूमीतील होती. नामस्मरण संकल्पातील ११ वे व यात्रेतील पहिलेच नामस्मरण शिवशक्तीचा स्त्रोत असलेल्या श्रीतुळजाभवानी मंदिरामध्ये पार पडले. रायगड जिल्ह्यातील, रोहा तालुक्यातील, कोलाड गावांमधील या ठिकाणाचे नाव 'माय भवानी.' या ठिकाणी गेल्यानंतर आमची भेट नावाप्रमाणेच सर्वांवर मायेची पाखर करणाऱ्या 'माय भवानी 'च्या संस्थापिका व संचालिका सौ . चंदाराणी दिवाडकर कोंडाळकर यांच्याशी घडली आणि त्यांच्याशी झालेल्या संभाषणानंतर सद्गुरु आनंदयोगेश्वरांनी आम्हाला इथे का आणले असावे, याचाही बोध झाला.

अध्यात्माची वाट ही सरळ नसून, त्या मार्गामध्ये अनेक खाचखळगे आहेत. वाटेत मऊ मखमली फुलांची उधळण नसून, काट्याकुट्यातून चालून पाय रक्तबंबाळ होण्याची शक्यताच जास्त आहे. आम्ही उभयतांनी गेल्या ६ वर्षात हे शब्दशः अनुभवले होते. ९ जुलै, २००० या दिवशी सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे कार्य चालू होतानाच आम्हाला सद्गुरु आनंदयोगेश्वर नीळकंठ महाराजांनी सांगितले होते की - "बाळांनो, हे जे सद्गुरुंचे कार्य तुम्ही करायला जात आहात; त्यात तुम्हाला खूप त्रास होईल. समाजात बदनामी, टीका सहन करावी लागेल. तुमच्याकडे जे आहे ते सर्व जाईल. लोक कदाचित तुम्हाला चपलांनी तुडवतील. हां, पण त्या तुम्हाला लागणार मात्र नाहीत याची काळजी सद्गुरु घेतील." सद्गुरु आनंद योगेश्वर यांच्या या कार्यामध्ये हे सर्वच आम्ही अनुभवत होतो.

माझ्या मनामध्ये कुठेतरी नेहमी हा प्रश्न असायचा की "असे का? जगात वाईट कामे करणारी अनेक माणसे लौकिकदृष्ट्या सुखी असतात. मग समाजोपयोगी चांगले काम करणार्‍यांच्या मार्गात असे अडथळे का?" याचे योग्य आणि मार्मिक उत्तर आम्हाला सौ. चंदाराणी यांच्या बोलण्यातून सहज मिळून गेले. सौ. चंदाराणी या खरं तर एक संसारिक गृहिणी. परंतु एकदा साक्षात भवानी मातेने त्यांना दृष्टांत देऊन सांगितले की "तू माझे या या ठिकाणी मंदिर बांधायचेस ."एकदा योगायोग वाटून सोडून दिले, दुसऱ्यांदा ही सोडून दिले. परंतु त्यानंतर तिसरा ज्वलंत दृष्टांत झाला आणि त्यात देवीने त्यांना ती जागासुद्धा दाखवली. त्यानंतर जागेपणीही श्री भवानीदेवी त्यांना डोळ्यांसमोर ती जागा दाखवू लागली. आज त्याच जागेवर हे जागृत मंदिर उभे आहे.

परंतु स्वतः दृष्टांत देऊनही, भवानी मातेने हे मंदिर त्यांच्याकडून सहजासहजी होऊन दिले नाही. त्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. घरच्यांनी विरोध केला. तो विरोध पत्करून भवानी आईचा आशीर्वाद आहे, म्हणून सौ. चंदाराणी देवीने स्वप्नात सांगितलेल्या जागेवर गेल्या. जागा विकत घेण्यासाठी आयुष्यभराची पुंजी खर्च केली. त्यावेळी कोलाड या गावातील ती जागा म्हणजे दाट झाडाझुडपांचे बांबूंचे जंगलच होते. त्या ठिकाणचे स्थानिक रहिवासी म्हणजे आदिवासी होते. सर्वात मोठी समस्या म्हणजे त्या ठिकाणच्या जवळपास कुठेच पाण्याची सोय नव्हती. अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत करीत, केवळ श्रीतुळजाभवानी मातेच्या विश्वासावर ती बाई एकटी पुढे जात राहिली आणि त्याशक्तीदेवतेच्या परीक्षेस पूर्णपणे उतरून तिच्या कृपेस पात्र झाली.

<< Previous      Next >>