त्या जागृत मंदिराच्या संस्थापनपासूनचा आजतागायतचा या मार्गातील त्यांचा प्रवास त्यांच्या मुखातून ऐकताना, आम्हाला सद्गुरू भाऊमहाराजांच्या या कार्यामध्ये सर्व बाजुंंनी होत असलेला समस्यांचा पाऊस नकळतपणे आठवत होता. त्याचप्रमाणे, मनातील "असे का" या प्रश्नांनाही उत्तरे मिळत गेली. सोन्याला भट्टीत घातल्याशिवाय दागिना घडत नाही, प्रसूतीच्या कळा सोसल्याशिवाय आई होता येत नाही. इतकेच काय, साक्षात विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाचा जन्म होण्यासाठी त्याआधी जन्मलेल्या सात अर्भकांचे प्राण जावे लागले. त्याचप्रमाणे अशा प्रकारचे त्रास शांतपणाने सहन करण्याची शक्तीच जणू तिथे पार पडलेल्या नामस्मरणाच्या माध्यमातून आम्हाला श्रीभवानी मातेने प्रदान केली. आम्ही तिथून निघताना भवानी मातेची नित्य उपासना करता करता तन -मनाने तिच्याशी एकरूप झालेल्या सौ .चंदाराणी उद्गारल्या ,"आज तुम्ही सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या नामस्मरणाला इथे आला नाहीत; तर आज माझा भाऊ माझ्याकडून ओवाळून घ्यायला आला आहे".
साक्षात शक्तिदेवतेचा आशीर्वाद घेऊन आम्ही तिथूनच थोडं पुढे पोलादपूरजवळील कशेडी घाटावरील श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मठात गेलो. अतिशय उंचावर आणि कठीण चढ असलेल्या या मठाचे बांधकाम कसे काय केले गेले असे याचे आश्चर्य वाटते ! शेवटी 'भक्तीभाव' हा मनुष्याकडून अवघडातली अवघड गोष्टही करून घेऊ शकतो हेच खरे. त्या ठिकाणी राहून सेवा करणाऱ्या दांपत्याने सद्गुरु भाऊ महाराजांचे खूप छान स्वागत केले. दत्तसंप्रदायातील श्री दत्तप्रभूंचे द्वितीय अवतार असलेले श्रीनरसिंह सरस्वती स्वामी महाराज हे गाणगापूरच्या संगमाजवळ गुप्त झाले व त्यांनी सर्व समाजाच्या दृष्टीने आपले अवतार कार्य संपवले. तथापि, तेच गुरुतत्त्व कर्दळीच्या वनामध्ये एका पुण्यवान मनुष्याला वारुळामधून दृग्गोचर झाले आणि तेच साक्षात श्री क्षेत्र अक्कलकोटचे श्री सद्गुरू समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज होत. अशा या दत्तावतारी श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आम्हाला त्या मंदिराबरोबरच, पुढच्या सर्व यात्रेमध्ये या ना त्या माध्यमातून मिळत राहिले. त्यानंतर आम्ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार चिपळून येथे मुक्काम केला.
नाथपंथीय सद्गुरु श्री प्रसादे महाराजांची भेट
चिपळूणमध्ये आमची एका सत्पुरुषांशी भेट घडली. आनंदयोगेश्वर सद्गुरु नीळकंठ महाराजांनी १९९० सालामध्ये, खोपोली येथे प .प. श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा चैतन्यमयी पुतळ्याची स्थापना केली होती .सद्गुरू भाऊ महाराजांचे आपल्या सद्गुरूंप्रतीचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले प्रख्यात शिल्पकार श्री. नारायण उर्फ दादा सोनावडेकर यांनी. श्री. दादा सोनावडे करांचे सहकारी श्री.दाजी यांच्याकडून आम्हाला चिपळूणच्या या सत्पुरुषांची माहीती मिळाली होती आणि अंतर्यामी आपोआपच त्यांच्या भेटीची इच्छा उत्पन्न झाली. या नाथपंथीय सत्पुरुषांचे नाव श्री प्रसादे महाराज. चिपळूण मधील रामवरदायिनी मंदिराजवळ त्यांचे निवासस्थान आहे. त्यांची वैयक्तिक माहिती जरी आम्हाला फारशी कळू शकली नाही तरी आमची त्यांच्याशी झालेली भेट ही सद्गुरूंनीच घडवून आणली हे आमच्या लक्षात आले. कारण संध्याकाळी ७ च्या सुमारास, काळोखात, त्यांचा अर्धवट माहीत असलेला पत्ता शोधत शोधत जेव्हा आम्ही त्यांच्याकडे पोचलो, तेव्हा पटकन ते म्हणाले," तुम्ही १०मिनिटे आधी आला असता तरी मी तुम्हाला भेटलो नसतो आणि १० मिनिटे नंतर आला असता तरीही मी तुम्हाला भेटलो नसतो. मी एका ठिकाणी जाण्यासाठी म्हणून बाहेर पडलो होतो. काय वाटलं कुणास ठाऊक ,पण १० मिनिटांनी जाऊ म्हणून मी परत आलो आणि आपली भेट घडली" नंतर आम्हाला कळले की ते सहजासहजी कोणाला भेटत नाहीत.
खरंच !सद्गुरु काय करू शकतात! ठिकठिकाणी रस्ता चुकवत बरोबर त्यावेळेला सद्गुरु आम्हाला श्रीप्रसादे महाराजांकडे घेऊन आले. श्री प्रसाद महाराजांनी आमची फार प्रेमाने विचारपूस केली. आमच्यापैकी प्रत्येकाशी ते वैयक्तिकरित्या बोलले. जेव्हा आम्ही उभयतांनी, त्यांना सद्गुरू आनंदयोगेश्वर नीळकंठ महाराजांच्या 'आनंदयोग धाम''च्या माध्यमातून होत असलेल्या कार्याविषयी, काही अध्यात्मिक प्रश्न विचारले; तेव्हा त्यातील काही प्रश्नांना समर्पक उत्तरे देऊन त्यांनी आम्हाला सांगितले की' "तुम्हाला पुढच्या यात्रेमध्ये एक सत्पुरुष भेटतील आणि तेच तुम्हाला तुमच्या सद्गुरूंच्या या कार्यामध्ये योग्य मार्गदर्शन करतील." सत्पुरुषांचे शब्द म्हणजे काळया दगडावरची रेघ. श्रीप्रसादे महाराजांचे आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या ठरलेल्या मुक्कामाकडे निघालो.
|