|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

सकाळी चिपळूण येथे सद्गुरू आनंद योगेश्वरांच्या श्री. संतोष चव्हाण नामक भक्ताकडे नामस्मरण करुन आम्ही संध्याकाळी ४ च्या सुमारास तेथील मार्कंडी मठामध्ये गेलो. हा मठ सुद्धा श्री स्वामी समर्थांचा आहे, हे आम्हाला तेथे जाईपर्यंत माहीत नव्हते. सद्गुरु आनंदयोगेश्वर आम्हाला त्यांच्या इच्छेने घेऊन चाललेले होते. या मठामध्ये सद्गुरूंचे नामस्मरण खूपच रंगले. त्यानंतर तिथे मुख्य सेवा करणाऱ्या श्री. केळकर नावाच्या एका वयस्कर गृहस्थाशी बोलतांना त्यांनी आम्हाला त्या मठाची जन्म कहाणी कथन केली. श्री स्वामी समर्थांचा तो मठ कोणाला तरी वाटलं म्हणून निर्माण झाला नव्हता; किंवा भरपूर पैसा गाठीशी आहे म्हणूनही झाला नव्हता. तर त्या मागची हकीकत मोठी रंजक होती. श्री .केळकर यांच्या मागच्या २/३पिढीतील एका नास्तिक व्यक्तीला 'जलोदर' या विकाराचा अपरिमित त्रास होत होता. त्यांनी त्या काळामध्ये उपलब्ध असणारे अनेक उपाय करून पाहिले; परंतु कुठल्याच उपायाने त्यांना आराम वाटला नाही. शेवटी रोजच्या दुखण्याला कंटाळून त्यांनी एका क्षणी अतिशय आर्थतेने परमेश्वराला हाक मारली व साक्षात परमेश्वराला असे आवाहन केले की -"जर माझी ही व्याधी पूर्ण बरी झाली तर मी तुझे अस्तित्व स्वीकारून आणि तुझी सेवा करेन."

त्या रात्री ती व्यक्ती आपल्या घरी झोपली असताना तेथे साक्षात श्री अक्कलकोट स्वामी महाराज आले व त्यांच्याच कृपेने त्या व्यक्तीला लघवीला जावेसे वाटू लागले. त्याच रात्री त्याचा जलोदर संपूर्ण बरा झाला. या जागृत अशा साक्षात्काराने त्या व्यक्तीमध्ये आमूलाग्र परिवर्तन झाले व आपण दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याने गुरूंची कायमस्वरूपी सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा लहानसे मंदिर बांधले. तोच हा मार्कंडी मठ. त्या तिथे सेवा व साधना करताना त्यांना खूप कष्ट सहन करावे लागले. सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज ज्या ज्या ठिकाणी आम्हाला घेऊन गेले; त्या ठिकाणचे मंदिर व मठ हे अशाप्रकारे अत्यंतिक प्रेरणेतून आणि कळकळीच्या श्रमातून निर्माण झालेले जागृत देवस्थान होते. आम्हाला या ठिकाणी आणण्याचा सद्गुरूंचा कार्यकारण भाव हा सहज लक्षात येतो.

भक्ताची अंतरी तळमळ आणि सद्गुरु परीक्षा

सद्गुरु भाऊ महाराज जेव्हा 'ओम सद्गुरू प्रतिष्ठान' या त्यांनी स्वकष्टाने निर्माण केलेल्या श्रीटेंबे स्वामी महाराजांच्या स्थानावर, माघ महिन्यामध्ये 'श्रीगुरुचरित्र पारायण सप्ताह' करीत; त्यावेळी आमचे घर हे प्रतिष्ठानापासून अगदी जवळ असल्यामुळे बाहेर गावाहूनही आलेल्या त्यांच्या काही भक्तांना ते ८ दिवस आमच्या घरी उतरवत. त्यातील एक सौ .पुष्पा रेडीज नावाच्या भक्त होत्या. आमचा त्यांच्याशी चांगला परिचय होता. त्यांच्याकडे नामस्मरण करण्याची आमची इच्छा होती. परंतु या गोष्टीला बरीच वर्षे उलटून गेली असल्याने त्यांचा पत्ता आमच्याकडे नव्हता. चिपळूणमधील या श्री मार्कंडी मठामधील नामस्मरण आटपून सद्गुरु आनंदयोगेश्वरांची खुर्ची, फोटो, मृदुंग, बॅनर्स अशा सर्व गोष्टी गाडीमध्ये ठेवून आम्ही निघण्यासाठी म्हणून गाडी सुरू करणार..... एवढ्यात सद्गुरु भाऊ महाराजांच्या सौ. पुष्पा रेडीज नावाच्या या अनुग्रहित भक्त आपल्या मुलींना घेऊन श्री मार्कंडे मठामध्ये दर्शनाला आल्या.

काहीच हासभास नसताना सद्गुरू भाऊ महाराजांचा फोटो व पादुकांचे दर्शन मिळाल्यामुळे त्यांना आश्चर्यमिश्रित आनंद झाला .त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. थोडं भानावर आल्यानंतर त्या म्हणाल्या "मी खरं तर यावेळी मठामध्ये येणार नव्हते. पण आज मंगळवार असल्याने देवीच्या देवळात जाऊन यायचे होते म्हणून या वेळी आले ."खरोखरच त्या एक मिनिट जरी उशीरा आल्या असत्या किंवा आम्ही एक मिनिट लवकर निघालो असतो तर आमची भेट झाली नसती. पण असं कसं झालं असतं ?आपलं प्लानिंग हे नजीकचा काळ डोळ्यासमोर ठेवून केलेलं असतं; परंतु सद्गुरूंचं प्लॅनिंग हे अनेक जन्मांच्या समीकरणांनी झालेलं असतं. सौ . रेडीज यांना कुठेतरी मनामध्ये गुरुभेटीची जी आंतरिक तळमळ लागली होती; त्यातूनच सद्गुरु आनंदयोगेश्वरांनी हा योग घडवला होता, असेच म्हणावेसे वाटते.

परंतु याहून मोठा योग तर पुढे घडायचा होता. सौ . रेडीज अशा अचानकपणे भेटल्यानंतर आमच्या मनामध्ये असा विचार आला की "या तर सद्गुरु भाऊंच्या अनुग्रहित भक्त आहेत. केवळ सद्गुरूकृपेने त्यांची आता भेट घडली आहे .या पार्श्वभूमीवर सद्गुरु भाऊंच्या ७५ नामस्मरणांपैकी एक नामस्मरण त्यांच्याकडे होणे किती संयुक्तिक आहे !" पण जोपर्यंत त्या स्वतःहून सांगत नाहीत तोपर्यंत आपण बोलणे योग्य नाही, असा विचार करून आम्ही काहीच बोललो नाही. त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनाची चलबिचल स्पष्टपणे दिसत होती. परंतु त्या सुद्धा या विषयी काही बोलल्या नाहीत आणि आम्ही तेथून आमच्या पुढच्या मुक्कामासाठी निघालो. संध्याकाळी चिपळूणपासून १२ कि. मी. अंतरावर असलेल्या सावर्डे या ठिकाणी सद्गुरूंचे नामस्मरण ठरलेले होते. तेथे रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी राजापूरकडे प्रयाण करायचे होते.

<< Previous      Next >>