सावर्डे या ठिकाणचे नामस्मरण पार पडणे व आम्ही रात्री भोजन करून सद्गुरू आनंदयोगेश्वरांची शेजारती करून आपापल्या खोल्यांमध्ये झोपण्यासाठी गेलो. 'आनंदयोग धाम 'वर सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांची नित्य पूजा-अर्चा, काकड आरती, चहा, दुपारचा नैवेद्य, संध्याकाळची आरती, शेजारती हे सर्व उपचार भक्तिभावाने नित्यनियमाने संपन्न होत असतात. आम्ही यात्रेला निघाल्यानंतर, इथे बोरिवलीला सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या पादुका -स्थानावर काही भक्त हे सर्व नित्य सोपस्कार करतच होते. या यात्रा आम्ही केवळ आमच्या बुद्धीने काढलेल्या नसून त्यामागे सद्गुरूंची प्रेरणा असल्यामुळे सद्गुरु आनंदयोगेश्वरच आम्हाला ठिकठिकाणी घेऊन चालले होते. गाडीमध्येही आम्ही पुढची सीट सद्गुरुंसाठी ठेवून त्यावर त्यांचा फोटो व पादुका ठेवत होतो आणि संपूर्ण यात्रेमध्ये अतिशय शुचिर्भूतपणे सद्गुरूंच्या वरील सेवा केल्या जात होत्या. त्यातलाच एक भाग म्हणजे ही शेजारती.
सावर्डे येथे सद्गुरूंना निजवून आम्ही झोपण्यासाठी गेलो खरे ; पण थोड्याच वेळात मला स्वतःला त्या ठिकाणी फार बैचेन वाटू लागले. काही झालं तरी याठिकाणी रात्री मुक्काम करायचा नाही, असे प्रकर्षाने जाणवू लागले. मी बाहेर येऊन श्री. विकास यांना तसे सांगताच तेही म्हणाले की "श्रद्धा, इथे थांबावेसे वाटत नाही काय करू या?" त्यावेळी रात्रीचे ११ वाजले होते. एकमेकांशी विचार विनिमय करून आमच्याबरोबर यात्रेमध्ये असलेल्या इतर भक्तांशी याविषयी बोलायला गेलो; तर त्यांच्यापैकी एका दोघांना असेच वाटत होते की 'इथे राहू नये.'
एवढ्या रात्री त्या गावांसदृश्य ठिकाणी एवढ्या भक्त- स्त्री -पुरुषांना घेऊन कुठे जाणार? तेथून जवळचे ठिकाण हे चिपळूणच होते. पण पुन्हा मागे कसे जायचे? असे विचार करता करता रात्रीचे बारा वाजले. सद्गुरु भाऊमहाराजां समोर बसून त्यांचे दोन मिनिटे ध्यान केले आणि चिपळूणलाच परत जायचे असा निर्णय घेतला. आदल्या दिवशी आम्ही चिपळूणमध्ये ज्या लॉजमध्ये उतरलो होतो; त्या लॉजमध्ये रात्री १२ वाजता फोन केला व "एवढ्या रात्री आम्ही तिथे आल्यानंतर पुन्हा त्या खोल्या आम्हाला मिळतील का?" असे त्यांना विचारले. त्यांनी "हो" असे सांगताच सर्व सामान पुन्हा गाडीमध्ये ठेवून आम्ही रात्री २ च्या सुमारास चिपळूण मध्ये पोहोचलो. वाटेत सर्वांनाच हा प्रश्न पडला होता की 'आपण असे का केले?' का आपण पुन्हा मागे चिपळूणमध्ये चाललो आहोत?' प्रश्न आपले असतात आणि त्यांची उत्तरे मात्र फक्त सद्गुरूंकडेच असतात .आपण फक्त सबुरीने वाट बघायची.
सकाळी उठल्यावर सद्गुरुंनी दिलेल्या प्रेरणेप्रमाणे आम्ही आमच्या बरोबर असलेले सद्गुरूंचे शिष्य श्री .प्रदीप हजारे व श्री. दीपक साखळकर यांना सांगितले की "अनायासे आपण पुन्हा चिपळूणमध्ये आलोच आहोत; तर निघण्यापूर्वी एकदा सौ.रेडीजना नामस्मरणविषयी विचारून पहा." या दोघांनी त्यांना फोन करताच क्षणभर सौ. पुष्पा रेडीज यांना काय बोलावे तेच सुचले नाही .पण त्या 'नाही'' म्हणाल्या नाहीत. त्या म्हणाल्या "मी मिस्टरांना विचारून तुम्हाला सांगते. तुम्ही अर्ध्या तासाने पुन्हा फोन कराल का?"
अर्ध्या तासाने फोन केल्यावर अतिशय आनंदाने त्या उत्तरल्या "तुम्ही आमच्याकडे नामस्मरण कराच. पण सद्गुरूंच्या स्वागताची माझी काही तयारी नाही. तुम्हाला काय काय सामान लागेल?" बोलताना त्यांचा स्वर अत्यानंदाने कापत होता. श्री .विकास म्हणाले "जे तुमच्या घरी सहज शक्य उपलब्ध आहे त्यासहितच तुम्ही तुमच्या गुरूंचे स्वागत करा. सद्गुरूंना हे उपचार नको असतात. त्यांना हवा असतो तो फक्त शुद्ध सात्विक भक्तिभाव; जो तुमच्याकडे आहे तेव्हा तुम्ही निश्चिंत होऊन सद्गुरुसेवेला सिद्ध व्हा. काही काळजी करू नका."
सद्गुरु किती प्रकाराने आपल्या भक्तांचे मन चाचपत असतात! म्हणूनच म्हटले आहे की अध्यात्ममार्ग हा कठीण नाही; तसाच सोपा ही नाही. कुठल्या प्रकारे भक्ताची परीक्षा घेतली जाईल ते सांगू शकत नाही. या प्रसंगामध्ये जशी सौ. रेडीज यांच्या भक्तीची परीक्षा झाली तसेच सद्गुरूंचा आदेश बरोबर ओळखून एवढ्या रात्री धोका पत्करून पुन्हा चिपळूणला येणाऱ्या आम्हा भक्तांचे ही परीक्षा झाली. आपल्याकडून घडणाऱ्या प्रत्येक कर्माचा कर्तेपणा आणि या कर्माच्या फळाचा विचार जर का सद्गुरुंवरच सोडून दिला, तर मग परीक्षा घेणारेही तेच होतात आणि परीक्षेत पास करणारेही तेच असतात - हा या मार्गातला आमचा अनुभव आहे.
|