|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

आम्ही जेव्हा रेडीज कुटुंबांच्या घरी पोचलो; तेव्हा सद्गुरू भाऊमहाराजांचे स्वागत करताना सौ. रेडीजच्या डोळ्यांतील आनंदाश्रू पाहिले आणि आम्ही भरून पावलो. ते पूर्वनियोजित नसलेले नामस्मरण अतिशय छान रंगले व सर्वांनाच त्याचा आनंद मिळाला. त्या सर्वच कुटुंबाने सद्गुरू भाऊंबरोबरच आमचे सर्वांचे खूप प्रेमाने स्वागत व आदरातिथ्य केले. त्यानंतर सौ. पुष्पा रेडीज यांनी आदल्या दिवसातील त्यांच्या मनाची अवस्था काय होती हे सांगताना आम्हाला सांगितले की "केवळ सद्गुरू भाऊमहाराजांच्या कृपेने तुम्ही मला काल स्वामींच्या मठात भेटलात; तेव्हा तुम्हाला घरी बोलवावे की नाही अशी माझ्या मनामध्ये चलबिचल चालु होती. त्यात तुम्ही सद्गुरूंच्या नामस्मरण संकल्प विषयी सांगताच मला आमच्या घरी हे नामस्मरण ठेवण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. परंतु एवढ्या वर्षांमध्ये मी माझ्या पतींच्या आज्ञेशिवाय आणि इच्छेशिवाय काही केले नाही. त्यांचा आनंद तोच माझा आनंद. माझे पती हे परमसाईभक्त असल्याने सद्गुरु भाऊंच्या नामस्मरणविषयी त्यांना विचारण्याचे काल मला धाडसच झाले नाही. ते नाही म्हणाले असते असेही नाही; परंतु एवढ्या वर्षात मी स्वतःहून कधी त्यांना माझ्या इच्छेविषयी असे काही विचारले नाही. आज जेव्हा, तुम्ही सकाळी फोन केलात; तेव्हा न जाणो कुठून मला शक्ती मिळाली मला माहित नाही. मी माझ्या पतींना सांगितले की, माझ्या सद्गुरूंच्या पादुका चिपळूण मध्ये आल्या आहेत आणि त्यांचे नामस्मरण आपल्या घरी करण्याची माझी इच्छा आहे. यावर ते मनापासून 'करू या 'असे म्हणाले आणि आज सद्गुरु भाऊमहाराजांच्या या नामस्मरणाचा आनंद आम्हाला सर्वांनाच मिळाला."

सौ. रेडीज यांचे हे बोलणे ऐकल्यानंतर आम्ही त्यांना आम्ही सावर्डे येथून पुन्हा आम्ही चिपळूणला कसे काय आलो, याचा वृत्तांत कथन केला, तेव्हा सौ. रेडीज आम्हाला गहिवरून म्हणाल्या "तुम्ही आला नाहीत, तुम्हाला सद्गुरू भाऊ महाराजांनी इथे आणले आहे. कारण सद्गुरू भाऊ महाराजांनी ३-४ वर्षांपूर्वी मी त्यांच्या दर्शनाला गेले असताना मला सांगितले होते की "मी तुझ्याकडे चिपळूणला येणार आहे हं." परंतु जेव्हा गेल्या वर्षी त्यांनी देह ठेवल्याचे समजले, तेव्हापासून माझ्या मनामध्ये नेहमी हा विचार येई, की माझ्या गुरुंनी मला दिलेला शब्द पाळला नाही. पण खरंच, कालची आपली अचानक झालेली भेट, तुमचे पुढे जाऊन पुन्हा अनपेक्षितपणे मागे येणे आणि आज या वास्तुमध्ये सद्गुरू भाऊमहाराजांचे नामस्मरण संपन्न होणे, हे सर्व त्यांनी, मला दिलेला आपला शब्द खरा करण्यासाठीच घडवले यात शंका नाही. आज मला धन्य वाटते आहे. काही वर्षांपूर्वी सद्गुरू भाऊमहाराजांच्या उपस्थितीमध्ये १२ तासांचे नामस्मरण याच ठिकाणी झाले होते. तोच नामाचा आनंद आम्हाला आज पुन्हा अनुभवण्यास मिळाला."

सद्गुरु आनंद योगेश्वरांची गुरुबंधू भेट
सौ. रेडीज यांचे ते शब्द ऐकल्यानंतर आमच्या सर्वांच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहिले. त्यांच्याकडे प्रसादभोजनाचा लाभ घेऊन सद्गुरु आनंदयोगेश्वर आता आम्हाला आमच्या यात्रेतील पुढच्या टप्प्यावर घेऊन निघाले. ज्या ठिकाणी आम्ही आता जाणार होतो, तिथे जाण्यासाठी माध्यम ठरले आमचे गुरूबंधू श्री दिपक साखळकर. त्यांनी आम्हाला, राजापूर जवळ पांगरे बुद्रुक येथे श्रीशिवानंद स्वामी या सत्पुरुषांचा मठ असल्याचे सांगितले. तेथे पोहोचेपर्यंत पूर्ण काळोख झाला होता. आमची गाडी डोंगराळ आणि दाट झाडीच्या रस्त्यावरून वर जात आहे एवढेच आम्हाला दिसत होते. तेथे गेल्यानंतर, गाडी लावलेल्या ठिकाणापासून मुख्य मठ ७ ते ८ मिनिटांच्या अंतरावर होता. त्याठिकाणी रात्रीचे नामस्मरण करून तेथेच मुक्काम करण्याचे आमचे ठरले होते. त्यामुळे सर्व सामान उतरवून घेऊन त्या काळोखात टॉर्चच्या मिणमिणत्या प्रकाशात चालताना, आजूबाजूच्या वातावरणावरून असे वाटत होते की हे एक डोंगरांमधील जंगल आहे. आणि खरोखरच आमच्या समोरून एक सापही गेला. 'साखळकर काका आपल्याला येथे कोठे घेऊन आले' असा विचार करीत' हात पाय धुवून आम्ही जेव्हा मुख्य मंदिरात पोहोचलो तेव्हा आश्चर्याने थक्कच झालो.

सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराज आम्हाला जिथे जिथे घेऊन जात होते त्या सर्वांमध्ये एक प्रकारची सुसूत्रता होती हे आमच्या लक्षात आले. या ठिकाणी समोर श्री शिवानंद स्वामींची तसबीर होती आणि त्याच्या बाजूला प. प .श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांची मोठी तस्वीर होती. श्रीटेंबेस्वामी महाराजांना पाहिल्यानंतर आम्हाला आमच्याच घरी आल्यासारखे वाटू लागले आणि रात्रीच्या त्या किर्र अंधारामध्ये, त्या आड रानाच्या अतिशय शांत वातावरणामध्ये सद्गुरु आनंद योगेश्वरांचे नामस्मरण त्यांच्याच गुरुंच्या साक्षीने संपन्न झाले. हे नामस्मरण होत असताना माझ्या डोळ्यासमोर मला एक डोलणारा नाग दिसत होता. थोडंसं दचकून मी डोळे उघडले आणि थोड्यावेळाने पुन्हा नामस्मरणात तल्लीन होऊन बंद केले तर पुन्हा तो नागराज मला डोलताना दिसू लागला.याचा अर्थ मला दुसऱ्या दिवशी कळला.

डोंगरावरील आड रानातील मठ आणि त्यात नोव्हेंबरचे दिवस. थंडी मी म्हणत होती. तशाही परिस्थितीत, केव्हा एकदा सकाळ होते आणि सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशात आपण नक्की कोठे आलो आहोत, याचे आकलन होते असे आम्हाला सर्वांनाच वाटत होते. आम्ही सर्वच जण पहाटे ४.३० वाजता उठून त्या कडाक्याच्या थंडीत नाकातोंडातून थंडीची वाफ निघत असताना अंघोळी पांगोळी आटपत होतो. दोन दिवसांच्या अथक प्रवासाचा त्रास आणि जागरण झालेले असतानाही सर्वांच्याच अंगात वेगळाच उत्साह संचारला होता.

सद्गुरु आनंदयोगेश्वरांची तसेच सद्गुरु श्रीशिवानंद स्वामींची काकड आरती करेपर्यंत थोडे उजाडले. आम्ही आजूबाजुला पाहिले आणि तो स्वर्गीय असा निसर्गरम्य परिसर पाहून आमच्या डोळ्याचे पारणे फिटले. एखाद्या हिल स्टेशनला लाजवील असे डोंगरावरील धुके, खाली वाहणाऱा ओहोळ, आजूबाजूला मोठमोठ्या, पुरातन वाटावे अशा, वृक्षांची दाटी आणि या पार्श्वभूमीवर उभा असलेला श्री शिवानंद स्वामींचा तो मठ. स्वप्नातदेखील आम्ही अशा कुठल्या जागेची कल्पना केली नव्हती.

या ठिकाणी श्रीटेंबेस्वामी महाराजांचा फोटो कसा, हा विचार एकीकडे डोक्यामध्ये चालू होता. तेथील व्यवस्थापकांशी आणि सेवेक-यांशी बोलल्यानंतर आमच्या लक्षात आले, की आम्ही तिथे केलेले संकल्पातील नामस्मरण हे फक्त निमित्त होते. खरं तर ती भेट होती -दोन गुरुबंधूंची.

सन १९०६ मध्ये, पौष शुद्ध पौर्णिमेला, श्री. सखारामपंत टेंबे या श्रीशिवानंद स्वामींच्या वडिलांच्या विनंतीवरून व स्वतः पारख करून घेऊन श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी श्री कृष्णाजींना (श्रीशिवानंद स्वामींचे लौकिक नाव) अनुग्रह दिला होता. यावेळी श्री कृष्णाजींना उपदेश करताना प .प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणाले - "विलासी वृत्ती आवर एकभुक्त रहा. त्रिकाल स्नान कर. एकांतात बस. नित्य गुरुचरित्र वाच. मोहातून पार पडण्यासाठी श्रीदत्त उपासना कर. स्वगृहीचा शुक्र द्वादशस्थानी आहे. वारंवार परीक्षा बघण्यासाठी मोह पाडील. तरी जागरूक रहा. श्रीदत्तउपासनेत मग्न रहा ."

<< Previous      Next >>