|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

या वेळी श्री टेंबे स्वामी महाराजांनी श्री कृष्णाजींना नित्य पूजनासाठी एक लक्षणयुक्त शाळीग्राम ;त्याचप्रमाणे एक नेसायची व एक भिक्षेची अशा दोन छोट्या दिल्या .त्यानंतर श्री स्वामी महाराजांनी त्यांना असे सांगितले की "जर कधी काळी तुझ्यावर अन्याय वगैरे झाला तर ही छाटी तुझे संरक्षण करेल व दुसरी जी परीक्षेची आहे ती कामधेनु समज. कामधेनू कल्पतरू, तुझे घरी राहील सुरू"असा उपदेश व कृपा आशीर्वाद श्रीस्वामी महाराजांनी त्यांना दिला.

त्यानंतर श्रीशिवानंद स्वामींच्या जीवनात अनेकविध संकटे आली ;परंतु आपल्या सद्गुरूंचे नित्य स्मरण करीत ते प्रत्येक संकटातून मार्ग काढत होते.' निराश न होता आपले कर्तव्य कर्म करीत राहावे' असा विचार करून ते आपल्या नित्य उद्योगात मग्न होत. एकीकडे श्री सद्गुरुदर्शनाची अत्यंतिक ओढ त्यांना लागली होती. त्या ओढीतूनच काही वर्षांनी श्रीशेत्र नरसोबावाडी येथे श्रीकृष्णाजींना आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींचे दर्शन घडले .त्यावेळी श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज त्यांना असे म्हणाले की "उदरनिर्वाह करिता शेती वगैरे केली तरी, वेद विहित कर्म व गुर्वाज्ञा पालन कधीही सोडू नये .स्वकर्म केले तर अंतःकरण शुद्ध होऊन उपासना स्थिर होते .उपासना स्थिर झाली की मनाची गडबड थांबून शांती मिळते .नंतर आत्मज्ञान होऊन मोक्षाचा लाभ होतो. मुक्तीचा लाभ करून घेणे हे मनुष्य जन्मांचे मुख्य कर्तव्य आहे ."असे सांगून श्री स्वामींनी त्यांना काही मंत्र सिद्ध करण्यास दिले व मंत्र सिद्ध कसे करावे याची माहिती दिली.

त्यानंतर श्रीस्वामींनी श्री कृष्णाजींच्या मस्तकावर आपला कृपाहस्त ठेवला व त्यांना असे म्हणाले की "आता यापुढे मार्गदर्शनासाठी आपण हुबळीच्या श्रीसिद्धारूढ स्वामींकडे जावे. त्यामुळे तुमचा कार्यभाग होईल .तेच तुमची संकटे निवारतील." असे सांगून दोन खारका व एक पैसा स्वामी महाराजांनी त्यांना प्रसाद म्हणून दिल्या. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची व श्री कृष्णाजींची ही दुसरी व शेवटची भेट ठरली.

१९०६ साली श्रीमद्‍ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांकडून अनुग्रह मिळाल्यापासून ई.स.१९१७साली श्री सिद्धारूढ स्वामींचे दर्शन होईपर्यंतचा ,१२ वर्षांचा, एक तपाचा काळ हाच खरा त्यांच्या साधनेचा प्रमुख काळ होता .याच काळात त्यांना सतत संकटांना तोंड द्यावे लागले. इ.स. १९१० ते १९१४ या दरम्यान त्यांनी श्रीस्वामी महाराजांनी दिलेले अनेक मंत्र सिद्ध करण्याचा सपाटा लावला होता. त्याचबरोबर श्री सद्गुरुविरचित स्तोत्रे व मंत्रात्मक श्लोक सिद्ध केले. तीव्र बुद्धिमत्ता व सद्गुरूंवरील अमोघ श्रद्धा यामुळे ज्योतिष शास्त्र व इतर मंत्र सिद्ध होण्यास त्यांना फार प्रयास पडत नसत. काही शाबरी मंत्र सुद्धा त्यांना या काळात सिद्ध केले होते.

एकदा श्रीकृष्णाची पांगरे येथील श्रीहरीहरेश्वराच्या सानिध्यात ध्यान करीत असताना सुमारे ६ तास टिकलेल्या भाव समाधीमध्ये त्यांना पहाटे तीनच्या सुमारास सर्व गाभारा कोटी सूर्याच्या प्रकाशाप्रमाणे तेजाने भरून गेल्याचा प्रत्यय आला. त्या तेजाची ज्योत भूमध्यात स्थिर झाली. जणू त्यांना तृतीय नेत्रप्राप्तीच झाली. या भाव समाधीनंतर श्रीस्वामी शिवानंदनांना दिक्कालाची बंधने राहिली नाहीत. त्रिखंडातील कोणत्याही ठिकाणचे दृश्य बसल्या जागेवरून दिसू लागले. खऱ्या अर्थाने श्रीप्रभू कृपा होऊन ते पूर्ण सिद्ध योगी झाले. आणि अशा या योगी पुरुषाच्या सानिध्यात आम्हाला सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे नामस्मरण करण्याचा योग आला ही त्यांची केवढी आगाध कृपा!

त्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये आम्ही दर्शनासाठी गेलो आणि पहाटे तर काय! तेथील श्री शंकराच्या पिंडीवर जो नाग होता तो मी आदल्या दिवशी नामस्मरण करताना पाहिलेल्या नागासारखाच हुबेहूब. इथून उठून तिथे आला असावा एवढे साम्य. यावेळी श्री शिवशंकर या परमेश्वरीय शक्तीशी आपली काहीतरी नाळ जुळलेली आहे हे आत मध्ये कुठेतरी नकळतपणे जाणवायला लागले. त्याची साक्षात्कारी प्रचिती त्यानंतर काही दिवसातच आम्हाला आली.

श्री हरिहरेश्वर मंदिराजवळील ओढ्यामध्ये आम्ही मुंबईहून विसर्जनासाठी नेलेल्या सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या 'नमो गुरवे निळकंठाय' या संकल्पनेमध्ये २ डायऱ्या विसर्जित केल्या. या डायऱ्या दिसेनाशा होईपर्यंत आम्ही तिथे उभे राहिलो. ओढ्याच्या पाण्यात सोडलेल्या या दोन्ही डायऱ्या शेवटपर्यंत हातात हात घातल्यासारख्या एकत्र राहिल्या. जणू काही श्रीविष्णू आणि श्रीशिव असा हा श्री हरिहरेश्वरच त्या डायऱ्यांच्या रूपामध्ये हातात हात घालून चालले होते. सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांमध्ये वास करीत असलेल्या चितशक्तींचा प्रत्यय आम्ही अशा अनेक प्रचितीमधून घेतला.

आमच्या नामस्मरण यात्रेचा पुढचा टप्पा होता खारेपाटण येथील श्री. मामा शेट्ये यांच्याकडील नामस्मरण त्यांच्याकडे गेल्यानंतर पाहतो; तर ज्या ठिकाणी सद्गुरु आनंद योगेश्वरांची खुर्ची ठेवली होती त्याच्या आजूबाजूच्या सर्व भिंतींवर अनेक सत्पुरुषांचे फोटो लावलेले होते. त्याविषयीची माहिती देताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या घरी या संत सत्पुरुषांच्या पालख्या, यात्रा येऊन गेल्या व त्यांना या सर्व सत्पुरुषांचे कृपा आशीर्वाद त्या पालखीच्या निमित्ताने, त्यांच्याकडून घडणाऱ्या सेवेतून प्राप्त झाले आहेत. श्री मामा शेट्ये व त्यांच्या सर्व कुटुंबियांनी सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे व आम्हा सर्वांचे अतिशय प्रेमाने व विनम्रतेने स्वागत व आदरातिथ्य केले. या सर्वांचीच सद्गुरु तत्त्वाशी असलेल्या ऋणानुबंधांची जाणीव आपल्याला कशी होणार? प्रत्येक जण आपापल्या भाग्य रेषेनुसार त्या त्या सत्पुरुषापर्यंत येतो व पूर्वसुकृतानुसार ती ती सेवा त्या जीवाकडून घडली जाते हेच खरे!

<< Previous      Next >>