|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

प्रचिती देऊन या भक्ता, शब्द सत्य करी गुरुदत्ता

ही वरील ओवी सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या भक्तांना आलेल्या प्रचितीवर आधारित लिहिल्या गेलेल्या 'श्रीभाऊलीला 'मधील आहे. ही ५२ ओव्यांची 'श्रीभाऊलीला' सद्गुरूंनी कशाप्रकारे लिहून घेतली याची विस्तृत वर्णन या पुस्तकाच्या 'भाग १' मध्ये आलेले आहे. या प्रचिती सद्गुरु भाऊ महाराजांनी सगुण रूपामध्ये भक्तांना दिलेल्या प्रचिती होत्या . परंतु या ओवीतील शब्द सद्गुरु आनंद योगेश्वर आज निर्गुण रूपामध्ये असतानाही कसे सार्थ करीत आहेत याचा अनुभव आम्ही यात्रेतील सर्व भक्तांनी श्री. राजन राणे यांच्याकडे घेतला.

खारेपाटणवरून निघाल्यानंतर पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आम्ही देवगड मधील नारिंग्रे येथील सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे अनुग्रहित दांपत्य श्री. राजन राणे व सौ .वंदना राणे यांच्या घरी पोचलो. ते सर्वजण सद्गुरु भाऊ महाराजांची चातकाप्रमाणे वाट पहात होते. आम्ही सद्गुरु भाऊ महाराजांचा फोटो व पादुका घेऊन दरवाजात उभे होतो व सद्गुरूंना यथासांग ओवाळून त्यांचे स्वागत करणाऱ्या सौ. राणे यांच्या डोळ्यातील पाणी खळत नव्हते. त्या गहिवरल्या आवाजाने एवढेच म्हणून शकल्या की -"भाऊंनी सांगितलं होतं तुम्ही गावाला स्थायिक व्हा .मी तुमच्याकडे येऊन जाणार. ते आज एवढ्या वर्षांनी इथे आले आहेत!

"काय ही सद्गुरुंवरील अगाध श्रद्धा आणि या श्रद्धेतून निर्माण झालेला प्रेमपुर्वक अधिकार! श्री. राजन राणे यांनी त्यांच्या गावातील सर्व लोकांना आपल्या सद्गुरूंच्या नामस्मरणासाठी आमंत्रित केले होते. श्री. राणे हे एक उत्तम आर्टिस्ट असल्यामुळे त्यांनी यापूर्वी 'ओम सद्गुरु प्रतिष्ठान' या ठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव, गुरूदीन हा सद्गुरु भाऊंच्या वाढदिवसाचा उत्सव अशा अनेक सोहळ्यासाठीची स्टेजवरील डेकोरेशनची सेवा उत्कृष्टपणे केली होती. या वेळीही, त्यांनी सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे या सेवेची सुवर्णसंधी सोडली नाही. त्यांनी सद्गुरुंसाठी अतिशय सुंदर सुशोभित आसन तयार करून ठेवले होते. त्याच्या बाजूला दिव्यांची आरास केली होती. अशा थाटात सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे संकल्पातील १८ वे नामस्मरण श्री .राणे कुटुंबीयांकडे त्यांच्या इच्छेप्रमाणे बरोबर गुरुवारी ज्यावेळी गुरुवर्य भाऊ महाराज आपल्या सद्गुरूंची आरती करायचे, त्याच वेळामध्ये संपन्न झाले. भक्ताच्या कळकळीला अशा प्रकारे त्याची मनोमनीची इच्छा पूर्ण करून सद्गुरू नेहमीच त्याला आपला कृपाप्रसाद देत असतात. मात्र त्यावेळी तो प्रसाद घेण्यासाठी आपण तन- मनाने सिद्ध असायला हवे. श्री. राणे कुटुंबीय तसे सिद्ध असल्यामुळेच त्यांना पुढील काही दिवसांमध्येच सद्गुरुंच्या नामाचा अनुभव आला आणि त्यांची ढासळलेली मन: शांती त्यांना पुन्हा प्राप्त झाली.

सद्गुरुंचे अस्तित्व असणे आणि त्याची भक्ताला जाणीव होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. श्री. राणे यांच्या वास्तुमध्ये नामस्मरण सुरू असताना त्या नामाच्या स्पंदनांतून सद्गुरूंचे निर्गुण रूपातील सगुण अस्तित्व सर्वांना जाणवत होते हे उल्लेखनीय .देवगड या ठिकाणी एक दिवस राहून पुढे जाण्याचे आमचे ठरले होते. परंतु श्री. राणे यांच्या घरातील एका समस्येमुळे सद्गुरु भाऊंनी आम्हाला तेथून हलू दिले नाही आणि आम्ही आणखी एक दिवस त्यांच्याकडे मुक्काम केला. श्री. राजन राणे यांना त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये एक मोठी समस्या भेडसावत असतानाच या नामस्मरण संकल्पाच्या निमित्ताने येऊन सद्गुरु आनंदयोगेश्वरांनी त्यांना कशाप्रकारे तारले, हे या पुस्तकातील शेवटच्या भागातील त्यांच्या अनुभव कथनामध्ये आलेच आहे.

<< Previous      Next >>