|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

शिवस्वरूप आनंद योगेश्वर निळकंठ महाराज

श्रीशिवशंभो भोलेनाथ, सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे हे कार्य व पर्यायाने आम्ही दोघे यांचे काय नाते जोडले गेले होते ते या पुस्तकाच्या 'भाग १' मध्ये विस्तृतपणे आले आहे. २००० साली सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांचे जे नामस्मरण 'महाशिवरात्री' या दिवशी आम्ही सुरू केले, ते आजतागायत आमच्या घरी महाशिवरात्रीला संपन्न होते. त्यादिवशी शास्त्रोक्त पद्धतीने रुद्राभिषेक करून सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या चरणांवर बेलाचा अभिषेक केला जातो .सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांच्या नावातच 'निळकंठ' म्हणजे शिवरूप आहे आणि हे नाव संपूर्ण जीवनातील स्वतःच्या आचरणाने आणि अत्यंत सहनशीलतेने त्यांनी सार्थ केले.

देव आणि दानव यांच्यातील अमृत मंथनाच्या वेळी समुद्रामधून प्राप्त झालेल्या अमृताचा आणि इतर नानाविध रत्नजडितांचा लाभ सर्वांनीच घेतला. परंतु त्या मंथनाच्या वेळी जे विष बाहेर आले त्याचा अंगीकार करून ते पचवण्याची ताकद फक्त एका शिवशंकरामध्ये होती. शिवाने ज्याप्रमाणे ते हलाहल आपल्या मुखाद्वारे प्राशन करून समस्त अमर्त्य असे तसेच सत्य लोकाला संकटमुक्त केले, त्याचप्रमाणे सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांनी आपल्या भक्तांसाठी कली काळाचे सारे विष स्वतःमध्ये पचवले. त्यांच्या जीवनात सर्व बाजूने होत असलेला त्रास कोंडमारा त्यांनी स्वतः पाशीच ठेवून भक्तांपर्यंत निव्वळ आनंदाचा झरा पोहोचवण्याचा सतत प्रयत्न केला .साक्षात विष्णूचा अवतार असलेल्या श्रीरामाला ज्याप्रमाणे मनुष्य देहं धारण केल्यानंतर देहाचे भोग चुकले नाहीत, वनवास चुकला नाही; त्याचप्रमाणे साक्षात दत्तावतारी प. प .श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचेच अवतारी स्वरूप असलेल्या सद्गुरु भाऊ महाराजांनीही त्यांच्या जीवनामध्ये मानसिक वनवास चुकला नाही. परंतु केवळ आपल्या भक्तांच्या आनंदासाठी त्यांनी स्वतःच्या कोंडमाऱ्याचे हे विष पचवले व 'आनंदयोगेश्वर निळकंठ' हे आपले नाव सार्थ केले .

शिवशंकराचे अधिष्ठान असलेला वार म्हणजे सोमवार. तद्वतच, सद्गुरु आनंदयोगेश्वरांचा जन्म सोमवारचा आणि त्यांनी देह ठेवला तोही सोमवारीच. त्यांचे जन्म नक्षत्र आद्रा, जे शिवाचे नक्षत्र आहे. अशा प्रकारे साक्षात शिवाचेच स्वरूप असलेल्या सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या ७५ व्या जयंतीवर्षप्रित्यर्थचे पुढचे नामस्मरण, देवगड येथील श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे संपन्न झाले. श्रीकुणकेश्वर मंदिर हे प्राचीन शिवालय असून एका मुस्लिम व्यापाराने त्याचा जिर्णोद्धार केला. त्या व्यापाराची बोट तेथील समुद्रातील वादळामध्ये भरकटलेली असताना तो नवस बोलून गेला की -"आता माझे प्राण जर का वाचले तर समोर दिसत असलेल्या मंदिराचा मी जीर्णोद्धार करीन" त्याप्रमाणे स्वतःचा जीव वाचल्यानंतर त्याने खरोखरच त्या मंदिराचा जिर्णोद्धार केला व आज आपल्यासमोर हे जागृत शिवमंदिर कुणकेश्वर या ठिकाणी उभे आहे. हे मंदिर समुद्राच्या ज्या किनाऱ्यावर बसले आहे तेथील एक आख्यायिका म्हणजे एखादे दांपत्य जर त्या ठिकाणच्या पाण्यात उभे राहिले तर त्यांना काशीयात्रेला गेल्याची पुण्य प्राप्त होते .त्या ठिकाणीही आम्ही सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या 'नमो गुरवे निळकंठाय' या संकल्पतील नामजपाच्या २ डायऱ्या विसर्जित केल्या.

<< Previous      Next >>