त्यांच्या त्यावेळेच्या वागण्या बोलण्यातून समोर साक्षात सद्गुरु भाऊमहाराजच त्यांच्यात त्याक्षणी वावरत असल्याची जाणीव होत होती. श्रीअण्णा महाराजांनी स्वतः फिरून आम्हाला श्रीसद्गुरू समर्थ राऊळबाबांचे समाधीमंदिर व आसपासचा सर्व परिसर दाखवला. त्यावेळीही त्यांचे भरभर चालणे आम्हाला सद्गुरु भाऊमहाराजांची आठवण करून देत होते. सद्गुरु आनंदयोगेश्वर म्हणजे चालता बोलता सुखद झंजावतच होते. कुठेही जाताना ते इतके झरझर चालायचे की त्यांच्यामागून चालताना अशीच आमची दमछाक व्हायची . श्रीअण्णा महाराजांच्या सहवासातही त्यावेळी आम्ही तोच एक प्रकारचा सुखद असा झंजावात अनुभवला. त्याचप्रमाणे श्रीअण्णांसारख्या एका परम शिष्याने स्वकष्टाने निर्माण केलेले ते सद्गुरूंचे आध्यात्मिक वैभव पाहून आणि सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांनी निर्माण केलेले त्यांच्या गुरूंचे स्थान आठवून गुरु--शिष्य परंपरेविषयी अभिमान वाटून मनात विचार आला की-" शिष्य असावा तर असा."
श्री विनायक अण्णांच्या परवानगीने आणि आशीर्वादाने आम्ही श्री राऊळमहाराजांच्या समाधीमंदिरामध्ये सद्गुरु समर्थ श्रीराऊळमहाराजांसमोर सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे नामस्मरण केले. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी कार्तिकी एकादशी होती आणि ते नामस्मरण या संकल्पनेतील २१ वे नामस्मरण होते. त्यावेळी त्याठिकाणी सद्गुरूंचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत होते. वातावरणातील स्पंदनांचा वेगळेपणा लक्षात येत होता. त्या श्रीक्षेत्र पिंगुळीमध्ये परमपूज्य श्रीअण्णांच्या रूपात वावरत असलेल्या सद्गुरू समर्थ श्रीराऊळबाबांच्या दर्शनाने मन भरून आले. परमपूज्य श्रीअण्णांच्या आज्ञेने दुपारचा प्रसाद तेथेच करून आम्ही निघणार तोच श्री अण्णांनी आम्हाला वर बोलावले. तेथे त्यांच्याकरिता आणलेल्या जेवणामधून त्यांनी आम्हाला प्रेमाने एक एक घास स्वतःच्या हाताने भरवला. त्या स्नेहाद्रपूर्ण प्रेमाने आम्ही आमचे राहिलोच नाही. त्यानंतर अचानक परमपूज्य श्रीअण्णांनी आम्हाला विचारले "तुमच्या गाडीत जागा आहे का? "आम्ही "का" असे विचारतात त्यांनी सांगितले की "मला मुंबईला जायचे आहे, तुमच्या गाडीमध्ये जागा असेल तर मी तुमच्या बरोबर येतो.
"एवढी मोठी भाग्याची संधी चालून आली असतानाही आम्ही त्यांना लगेच हो' म्हणू शकत नव्हतो; कारण आमची यात्रा अजून पुढे माणगाव, दाणोली असे सर्व करून गोव्यापर्यंत जायची होती. आणि आम्हाला मुंबईला जाण्यासाठी अजून ३ ते ४ दिवस लागणार होते .आम्हाला मनामध्ये फार वाईट वाटले. तसे आम्ही श्रीअण्णांना सांगितले, तेव्हा परमपूज्य अण्णा म्हणाले "तुम्ही परतुन येताना पुन्हा इथे या. मग आपण बरोबर जाऊ." त्याचप्रमाणे त्यांनी हसतच पुढे असे सांगितले की "तुम्ही एक दोन दिवसातच इथे परत येणार. "त्यांच्या कुठल्या शब्दांचा अर्थ त्यावेळी आम्हाला कळला नाही. परमपूज्य श्री अण्णांचा निरोप घेऊन आम्ही पुढे श्री शेत्र माणगाव येथे जाण्यासाठी निघालो.
मच्छिंद्रनाथ महिमा
श्री .दीपक साखळकरकाका म्हणाले "इथून जवळच मच्छिंद्रनाथाचे मंदिर आहे. तेथे आपण नामस्मरण करू या". नाथसंप्रदायाच्या ठिकाणी सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे संकल्पातील नामस्मरण करण्याची संधी आम्ही कशी काय सोडणार ? आम्ही तेथे जाण्यास निघालो. हे मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवाचा डोंगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या एका डोंगर माथ्यावर उभारलेले आहे. हे मंदिर जरी मच्छिंद्रनाथांचे मंदिर म्हणून सर्वांना ज्ञात असले तरी त्या ठिकाणी शिवाचे व भवानी मातेचेही अधिष्ठान आहे. येथील अख्यायिका खूपच रोचक आहे.
शेकडो वर्षांपूर्वी त्या ठिकाणी श्री मच्छिंद्रनाथ व श्रीकालिकादेवी यांचं तुंबळ युद्ध झाले. कोणीही हार मानायला तयार नव्हते. या सर्वांमध्ये सृष्टीची हानी होऊ नये म्हणून शेवटी भगवान शंकराने यामध्ये हस्तक्षेप केला व हे युद्ध सामोपचाराने मिटवले. म्हणूनच या मंदिरामध्ये श्रीमच्छिंद्रनाथ व श्रीशिवशंकर यांच्यामध्ये देवीची मूर्ती आहे. सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे त्या डोंगराच्या खाली एका ठिकाणी एका विशिष्ट आणि वेगळ्याच आकाराचे अचल अवस्थेतील दगड आणि खडक आहेत .आख्यायिका अशी आहे की हे दगड म्हणजे त्या युद्धाच्या वेळी देवी कालिकेकडून आणि श्रीमच्छिंद्रनाथांकडून वापरली गेलेली शस्त्रे आहेत. त्याचप्रमाणे या डोंगरावरील मंदिराच्या तीन दिशांना तीन देवींची जागृत मंदिरे आहेत. त्या देवींचे मुख हे या डोंगराच्या दिशेने आहे .हे युद्ध चालू असताना या तिन्ही देवी आपापल्या ठिकाणाहून हे युद्ध पहात होत्या त्याचे हे प्रतीक आहे असे मानले जाते. यातील चिपळूण येथील देवी श्रीविंध्यवासिनी हिच्या दर्शनाला गेलो असता, ही आख्यायिका मान्य करावी लागते ; कारण या श्रीविंध्यवासिनीचे तोंड, मान वाकडी करून, या 'देवांच्या डोंगरा 'च्या दिशेने वळलेले स्पष्ट दिसते.
तर अशा या देवाच्या डोंगरावर सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे नामस्मरण संपन्न झाले, नव्हे सद्गुरु भाऊ महाराजच आम्हाला तिथे घेऊन गेले. तेथील श्री. नाना नावाच्या वयस्कर सेवेकऱ्यांनी आमचे अतिशय प्रेमाने स्वागत केले व या नामस्मरणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले. आपल्या हिंदू संस्कृतीमधील अशा अनेक गोष्टी आपल्याला ज्ञात नसतात. या नामस्मरणाच्या निमित्ताने 'देवाचा डोंगर 'येथील हे जाज्वल्य तेज आम्हाला अनुभवायला मिळाले हे आमचे महत्त् भाग्यच. त्यानंतर आम्ही श्रीक्षेत्र माणगाव येथे आलो.
|