त्यांच्या त्यावेळेच्या वागण्या बोलण्यातून समोर साक्षात सद्गुरु भाऊमहाराजच त्यांच्यात त्याक्षणी वावरत असल्याची जाणीव होत होती. श्रीअण्णा महाराजांनी स्वतः फिरून आम्हाला श्रीसद्गुरू समर्थ राऊळबाबांचे समाधीमंदिर व आसपासचा सर्व परिसर दाखवला. त्यावेळीही त्यांचे भरभर चालणे आम्हाला सद्गुरु भाऊमहाराजांची आठवण करून देत होते. सद्गुरु आनंदयोगेश्वर म्हणजे चालता बोलता सुखद झंजावतच होते. कुठेही जाताना ते इतके झरझर चालायचे की त्यांच्यामागून चालताना अशीच आमची दमछाक व्हायची . श्रीअण्णा महाराजांच्या सहवासातही त्यावेळी आम्ही तोच एक प्रकारचा सुखद असा झंजावात अनुभवला. त्याचप्रमाणे श्रीअण्णांसारख्या एका परम शिष्याने स्वकष्टाने निर्माण केलेले ते सद्गुरूंचे आध्यात्मिक वैभव पाहून आणि सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज यांनी निर्माण केलेले त्यांच्या गुरूंचे स्थान आठवून गुरु--शिष्य परंपरेविषयी अभिमान वाटून मनात विचार आला की-" शिष्य असावा तर असा."
श्री विनायक अण्णांच्या परवानगीने आणि आशीर्वादाने आम्ही श्री राऊळमहाराजांच्या समाधीमंदिरामध्ये सद्गुरु समर्थ श्रीराऊळमहाराजांसमोर सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे नामस्मरण केले. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी कार्तिकी एकादशी होती आणि ते नामस्मरण या संकल्पनेतील २१ वे नामस्मरण होते. त्यावेळी त्याठिकाणी सद्गुरूंचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत होते. वातावरणातील स्पंदनांचा वेगळेपणा लक्षात येत होता. त्या श्रीक्षेत्र पिंगुळीमध्ये परमपूज्य श्रीअण्णांच्या रूपात वावरत असलेल्या सद्गुरू समर्थ श्रीराऊळबाबांच्या दर्शनाने मन भरून आले. परमपूज्य श्रीअण्णांच्या आज्ञेने दुपारचा प्रसाद तेथेच करून आम्ही निघणार तोच श्री अण्णांनी आम्हाला वर बोलावले. तेथे त्यांच्याकरिता आणलेल्या जेवणामधून त्यांनी आम्हाला प्रेमाने एक एक घास स्वतःच्या हाताने भरवला. त्या स्नेहाद्रपूर्ण प्रेमाने आम्ही आमचे राहिलोच नाही. त्यानंतर अचानक परमपूज्य श्रीअण्णांनी आम्हाला विचारले "तुमच्या गाडीत जागा आहे का? "आम्ही "का" असे विचारतात त्यांनी सांगितले की "मला मुंबईला जायचे आहे, तुमच्या गाडीमध्ये जागा असेल तर मी तुमच्या बरोबर येतो.
"एवढी मोठी भाग्याची संधी चालून आली असतानाही आम्ही त्यांना लगेच हो' म्हणू शकत नव्हतो; कारण आमची यात्रा अजून पुढे माणगाव, दाणोली असे सर्व करून गोव्यापर्यंत जायची होती. आणि आम्हाला मुंबईला जाण्यासाठी अजून ३ ते ४ दिवस लागणार होते .आम्हाला मनामध्ये फार वाईट वाटले. तसे आम्ही श्रीअण्णांना सांगितले, तेव्हा परमपूज्य अण्णा म्हणाले "तुम्ही परतुन येताना पुन्हा इथे या. मग आपण बरोबर जाऊ." त्याचप्रमाणे त्यांनी हसतच पुढे असे सांगितले की "तुम्ही एक दोन दिवसातच इथे परत येणार. "त्यांच्या कुठल्या शब्दांचा अर्थ त्यावेळी आम्हाला कळला नाही. परमपूज्य श्री अण्णांचा निरोप घेऊन आम्ही पुढे श्री शेत्र माणगाव येथे जाण्यासाठी निघालो.
परात्पर गुरूंच्या जन्मगावी सद्गुरूंचे नामस्मरण
श्रीक्षेत्र माणगाव हे आमचे परात्पर गुरु प. प .श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान. त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या श्रीदत्त मंदिरामध्ये कार्तिकी एकादशीलाच रात्री सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे नामस्मरण संपन्न झाले; तेव्हा त्याचे स्वरूप, 'सद्गुरू समोर त्यांचेच रूप असलेल्या त्यांच्या परमभक्ताचे नामस्मरण 'असे होते. त्या रात्री श्रीक्षेत्र माणगाव येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही श्रीस्वामी महाराज ज्या गुहेमध्ये बसून आपली साधना करीत त्या गुहेमध्ये गेलो. आत्तापर्यंतच्या यात्रेमधील प्रवासाचा शीण असून सुद्धा आमच्यापैकी कोणालाच तो जाणवत नव्हता. आमच्याबरोबर यात्रेमध्ये असलेल्या सौ .स्मिता नारकर तसेच श्री .दीपक साखळकर हे वयाची साठी उलटलेले भक्त तर आमच्यापेक्षा जास्त वेगाने त्या गुहेपर्यंत जाण्यासाठीचा डोंगराळ चढ चढून गेले. तेथपर्यंत पोचल्यानंतर मात्र आम्हाला त्या श्रमाचे चीज झाले असेच वाटू लागले.
माणगांव येथे श्री स्वामी महाराजांच्या निवासस्थानी दर्शनाकरिता गेलो असता; तेथे योगायोगाने आम्हाला सद्गुरु भाऊंचे एक जुने भक्त भेटले. त्यांना आम्ही वर गुहेमध्ये जात आहोत असे सांगितले; तेव्हा ते म्हणाले की "डोंगरावरच वाटेमध्ये एका ठिकाणी स्वामी महाराजांची एक आध्यात्मिकदृष्ट्या अधिकारी व्यक्ती आहे. तिथे मी तुम्हाला घेऊन जातो. पण त्यांची भेट होणे आणि त्यांच्याशी बोलायला मिळणे तसे दुरापास्त आहे. कारण त्यांच्या साधनेच्या वेळेला ते कोणालाही भेटत नाहीत. "त्या गृहस्थांबरोबर आम्ही त्या ठिकाणी गेलो; तर ज्यांची भेट होणे दुरापास्त आहे असे सांगितले होते तेच स्वतः समोरून आमच्यापर्यंत आले. ते पूजेसाठी झाडाची फुले तोडीत होते. त्यांना तेथील लोक 'तात्या महाराज' या नावाने संबोधत होते. त्यांच्या हातात श्रीस्वामी महाराजांसारखीच दंडा सदृश्य काठी होती. त्यांनी आल्या आल्या स्वतःच्या हातातील फुलांची परडी माझ्या हातात पकडायला दिली व ते आपल्या साधनेच्या खोलीमध्ये आम्हाला घेऊन गेले. श्रीतात्या महाराजांनी त्यावेळी आम्हाला अध्यात्मातील अनेक गोष्टींचे ज्ञान दिले. कष्टाविषयी आणि सद्गुरुकार्याविषयी त्यांनी आम्हाला एकच मोलाचा संदेश दिला आणि तो म्हणजे "पदोपदी मरायला शिका ". ते पुढे म्हणाले "या मार्गात तुम्हाला अनेक अडचणी येतील त्यांना घाबरू नका. सतत पुढे जात राहा. सद्गुरूंवर पूर्ण निष्ठा ठेवा. तुमच्या श्रद्धेचे फळ तुम्हाला नक्की मिळणार. तुमच्या या कार्यासाठी श्रीस्वामी महाराजांचे आशीर्वाद आहेतच. तुम्हाला याचा खूप आनंद मिळणार. सावधानतेने मार्ग चाला. कार्य खूप मोठे होईल कारण तुम्ही ज्यांचे नाव घेत आहात ते सामान्य नाहीत. ते एक महान सत्पुरुष आहेत."
आम्ही खरंतर तेथे ५ मिनिटांसाठी म्हणून गेलो होतो परंतु श्रीतात्या महाराजांच्या या सहज रसाळ वाणीतील अमृतानुभव ऐकता ऐकता आम्ही एवढे तल्लीन झालो की पाऊण तास केव्हा निघून गेला हे आमच्या लक्षातच आले नाही. ते पुढे दासबोध वाचण्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करताना म्हणाले की "गुरुभक्ती कशी करावी, जीवनामध्ये कसे वागावे, अध्यात्माची दैनंदिन जीवनात कशी सांगड घालावी, भक्त कसा असावा, साधना कशी असावी, संत महात्म्यांची लक्षणे कोणती, अध्यात्म व दैनंदिन जीवनात काय घ्यावे व काय टाकावे याचे ज्ञान होण्याकरिता साधकाने दासबोधाचा अभ्यास करणे आवश्यक आहे .जमेल तसा तो वाचत राहा व त्यातील विचारांना आपल्या जीवनामध्ये व कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला यश मिळेल. "असे सांगून आम्ही निघताना त्यांनी खडीसाखर आमच्या हातावर ठेवली व म्हणाले "या साखरेसारखेच गोड व्हा."
|