|| सद्गुरु आनंदयोगेश्वर ||

....एक साक्षात्कारी अनुभूति ...

त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही गुहेकडे प्रयाण करण्यात एवढ्यात काहीतरी आठवल्यासारखे पटकन श्री तात्यामहाराज म्हणाले की-"तुम्ही गुहेत जात आहात, तर तिथे सद्गुरु आनंदयोगेश्वरांचे नामस्मरण करा. तिथे तुम्हाला निश्चितपणे श्रीस्वामी महाराजांची स्पंदने मिळतील. साधनेच्या सुरुवातीच्या काळात प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज या ठिकाणी येऊन तासनतास साधनेला बसत."

खरं तर श्रीस्वामी महाराजांच्या या गुहेमध्ये आम्ही फक्त दर्शनाला जाणार होतो. परंतु तिथे गेले तेथे गेल्यानंतर त्या निरव शांततेमुळे तेथील पवित्र अशा वातावरणाने आम्ही सर्वजण अंतर्मुख झालो. श्री .विकास यांना आतून असे वाटू लागले की या ठिकाणी साक्षात श्रीस्वामी महाराज बसलेले आहेत; तेव्हा आपण इथे सद्गुरु भाऊ महाराजांचे नामस्मरण करायचेच. असे काहीच पूर्वी ठरलेले नसल्यामुळे आम्ही ढोलकी, झांजा असे नामस्मरण करण्यासाठी आवश्यक असलेले इतर कुठलेच सामान बरोबर घेऊन गेलो नव्हतो. तरीही कुठल्याही वाद्यांशिवाय त्या धीर गंभीर वातावरणामध्ये तेथे जे सद्गुरूंचे नामस्मरण झाले; त्याचे शब्दात वर्णन करता येणे अशक्य आहे. आम्हाला सर्वांनाच त्या नामस्मरणाच्या माध्यमातून श्रीस्वामी महाराजांचे कृपाशीर्वाद प्राप्त झाले व अतिशय कृतकृत्य अशा भावनेने आम्ही माणगाव सोडले आणि कोकणातील आणखीन एक अवलिया सत्पुरुष सद्गुरु श्रीसाटम बाबा, यांचे समाधी मंदिर असलेल्या दानोली या ठिकाणी जाण्यास निघालो.

सद्गुरू समर्थ साटम महाराजांचा दृष्टांत

सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या या महत् कार्यामध्ये निर्गुण रूपातील ज्या ज्या विभूतींचे आम्हाला आशीर्वाद आणि मार्गदर्शन प्राप्त झाले त्यातील एक श्रीसद्गुरू साटम महाराज होत. यात्रेच्या काही महिने आधी म्हणजे २००५ साला मधील श्रावण महिन्यामध्ये कृष्णाष्टमीच्या रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सद्गुरु साटम महाराजांनी आम्हाला दृष्टांत देऊन सांगितले की "तुम्ही जेव्हा माझ्याकडे दाणोलीला याल तेव्हा दुपारचे ४ वाजले असतील. माझ्या अंगावर गुलाबी वस्त्र असेल, तसेच माझ्या उजव्या कानावर फुल असेल." त्यावेळी दाणोलीला जाण्याचा आमचा योग केव्हा येईल आम्हाला माहित नव्हते. परंतु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या या नामस्मरण यात्रेच्या निमित्ताने तो योग जुळून आला.

गोव्याला रात्रीचा मुक्काम करण्याचे ठरल्यामुळे त्यादिवशी दुपारी लवकरच आम्ही माणगाव सोडले. माणगाव दाणोली फार अंतर नाही. त्यामुळे एरव्ही आम्ही अडीच तीनच्या सुमारास दाणोलीला पोहोचणे अपेक्षित होते. परंतु आमच्या टेम्पो ट्रॅव्हलर मधील इंधन कमी झाल्यामुळे ड्रायव्हरने अतिशय कमी वेगाने गाडी चालवली. आम्ही सर्वजण कंटाळलो. परंतु ज्यावेळी दाणोलीला मंदिरासमोर आमची गाडी उभी राहिली त्यावेळी श्री. विकास यांनी मला सांगितले "श्रद्धा किती वाजले बघ. "बघितले तर बरोबर चार वाजले होते. श्रीसाटम महाराजांच्या त्या दृष्टांताची आठवण झाली. गाभाऱ्यात गेल्यानंतर उत्सुकतेने श्रीसाटम बाबांकडे पाहिले तर त्यांच्या अंगावर गुलाबी वस्त्र व उजव्या कानावर फुल. आम्ही तेथील सेवेकरी श्री .पवार यांना विचारले की "साटमबाबांच्या अंगावर नेहमी याच रंगाचे वस्त्र असते का? "त्यावर ते म्हणाले, "असे काही नाही. आम्ही आजच सकाळी हे वस्त्र घातले आहे." आमच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. त्याचप्रमाणे याची पुन्हा एकदा ग्वाही मिळाली की आनंदयोगेश्वर सद्गुरु निळकंठ महाराजांचे जे कार्य आमच्याकडून होत आहे त्याला या सर्व सत्पुरुषांचे आशीर्वाद व मार्गदर्शन मिळत आहे व सद्गुरूंच्या या कार्यासाठी सद्गुरू समर्थ साटममहाराज सुद्धा आपल्या पाठीशी आहेत. त्या ठिकाणी आम्हाला अदृश्यामध्येही साटंबावांचे मार्गदर्शन मिळाले.

श्रीमत प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे अवतारी कार्य केलेल्या सद्गुरू आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांनी हा जन्म त्यांचे गुरु प. प .श्रीमत वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रचार प्रसाराच्या माध्यमातून अनेक भक्तांच्या प्रापांचिक तसेच पारमार्थिक समस्या सोडवल्या भक्तांच्या नियमित उपासनेसाठी त्यांनी बोरिवली या ठिकाणी श्रीमत प .प .वासुदेवानंद सरस्वतींचे पादुका स्थान तसेच खोपोली येथे पंचधातुच्या भव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. या दोन्ही स्थानांवर नियमाने व श्रद्धापूर्वक येणाऱ्या भक्तांना सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या माध्यमातून स्वामी महाराजांचे अनेक अनुभव आले. परंतु आमच्यासाठी दाणोली या ठिकाणी नामस्मरण करण्याची विशेष औचित्य व महत्त्व होते. याचे कारणही तसेच होते.

सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांचे देहरूपातील पहिले मार्गदर्शक गुरु म्हणजे सद्गुरु परमपूज्य दादामहाराज निंबाळकर. प.पू. दादा महाराजांनीच सद्गुरु भाऊ महाराजांना १९८१ साली सांगितले की 'तुमचे गुरु मी नसून प .प .वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी आहेत'. प .पू. दादा महाराजांचे गुरु म्हणजे परमपूज्य श्रीसावंत महाराज आणि श्रीसावंत महाराजांची गुरु हे दणोलीचे सद्गुरू समर्थ साटममहाराज हे होत. प .पू .दादा महाराजांच्याच आज्ञेवरून गुरुवर्य भाऊ महाराजांनी 'ओम सद्गुरू प्रतिष्ठान 'या श्रीस्वामी महाराजांच्या पादुका स्थानावर गुरुवारी संध्याकाळी ७.२५ ची आरती सुरू केली. सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांनी २००४ साली आपला देह ठेवला तो तुकाराम बीज या पुण्यपावन तिथीला; ज्या दिवशी सद्गुरु समर्थ साटम महाराजांची ही पुण्यतिथी असते.

अशाप्रकारे या गुरु शिष्य परंपरेच्या माळेतील एकमेकांमध्ये गुंफलेले मणी हेच सिद्ध करतात की गुरुतत्त्व एकच आहे आणि सत्पुरुषांच्या ठिकाणी जराही भेदभाव नसतो. दाणोली येथे नामस्मरण संकल्पातील २५ वे नामस्मरण साक्षात सद्गुरु समर्थसाटम बाबांच्या समोर संपन्न झाले. त्याचा आनंद काही औरच होता. त्यानंतर जे घडले ते अदभुत होते. दाणो‌लीवरून आम्ही गोव्यामध्ये जायचं होतो, जिथे सद्गुरु आनंदयोगेश्वरांची पुढील नामस्मणे आधीपासूनच ठरलेली होती. परंतु सद्गुरूंच्या मनामध्ये काही वेगळेच होते. दाणोली येथे सद्गुरु साटमबाबांची संध्याकाळची आरती करत असतानाच श्री .विकास यांना स्पष्टपणे श्री साटमबाबांची आज्ञा झाली की "आज दाणोली सोडून जायचे नाही. इथेच राहायचे पुढचा प्रवास करू नये."

<< Previous      Next >>