आमच्याबरोबर यात्रेमध्ये असलेल्या इतर भक्तांकडून आम्ही गोव्यापर्यंतचे पैसे घेतले होते. त्यातील काही स्त्रियांना गोव्याला जाऊन शांतादुर्गेची ओटी भरायची होती. अशा परिस्थितीत आम्ही सर्वांनाच तेथे थांबवण्यास सांगू शकत नव्हतो. सद्गुरूंची आज्ञा मोडणे ही शक्य नव्हते .यावर उपाय म्हणून इतरांना पुढे गोव्यात जायला सांगून श्री. विकास, मी आणि श्री. प्रदीप हजारे हे सद्गुरु भाऊमहाराजांचे एक भक्त असे आम्ही तिघे जणच दाणोलीला थांबलो. राहायचे कुठे खायचे काय हा विचार मनामध्ये आला. पण आपण त्याची काळजी का करावी? त्यांनीच थांबायला सांगितले आहे तर तेच सांभाळतील असे म्हणून श्रीसद्गुरू साटमबाबांसमोर बसून राहिलो. थोड्यावेळाने ओळखपाळख नसताना तेथील पुजाऱ्यांनी आमची चौकशी केली व आमची जेवणाची व राहण्याची व्यवस्था श्रीसाटम महाराजांच्याच घरी केली. अचानक घडणाऱ्या या सर्व घटना सद्गुरु आनंद योगेश्वरांच्याच इच्छेने घडत होत्या. आमच्या हाती काही नव्हते.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही समाधी मंदिरामध्ये जे अनुभवले तेव्हा सद्गुरूंनी इथे का थांबवले याचा उलगडा झाला. त्या दिवशी तेथे दोन व्यक्ती आल्या. त्यातील एका व्यक्तीचे आमच्याशी जे संभाषण झाले ते सर्वच्या सर्व इथे कथन करणे योग्य होणार नाही. काही दृष्टांत आणि साक्षात्कार हे सद्गुरूंच्या आज्ञेशिवाय कोणासही सांगू नयेत असे शास्त्र सांगते. परंतु त्या व्यक्तीच्या एकंदरीत सर्व बोलण्या -वागण्यातून आम्हाला जणू आमच्या जीवनाचा अर्थच ज्ञात झाला. प्रत्येक मनुष्याच्या या पृथ्वीतलावरील जन्माचा काही कार्यकारण भाव असतो. केव्हा केव्हा कोणाच्या तरी माध्यमातून आपल्याला ती परमेश्वरीय शक्ती अशा अनेक सत्पुरुषांपर्यंत आणून, आपल्याला मनुष्यजन्माचे इप्सित ज्ञात करून देण्याचा प्रयत्न करीत असते. परंतु; आपल्यावर असलेल्या मायेच्या आणि षड्ररिपुंच्या पगडयामुळे आपल्याला त्याचे आकलन होत नाही. केवळ सद्गुरूकृपेने आम्हाला त्या व्यक्तीकडून अक्षरशः या जगातील आमच्या अस्तित्वाचा अर्थ समजला. हे सर्व शब्दातीत आहे. त्याची सत्यता मात्र परतीच्या प्रवासामध्ये जेव्हा परमपूज्य अण्णामहाराजांना भेटलो तेव्हाच झाली.
त्याचप्रमाणे, त्या व्यक्तीने मला सांगितले की "तुला पुढच्या महिन्यात दत्तजयंतीच्या दिवशी सद्गुरु श्रीराऊळबाबांच्या १०१ व्या जयंतीला त्यांच्या पाळण्याला झोका द्यायला यायचे आहे. 'मला विश्वासच वाटेना कारण दोनच दिवसांपूर्वी जेव्हा श्री अण्णा महाराजांची भेट झाली होती तेव्हा त्यांनी आम्हाला याविषयी काही सांगितले नव्हते. शिवाय, श्रीदत्तजयंती या दिवशी बोरवली येथे असलेल्या सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांच्या पादुका स्थानावरही उत्सव असतो. त्यामुळे आम्ही त्या व्यक्तीचे ते बोलणे एवढे मनावर घेतले नाही. त्यानंतर त्या व्यक्तीने माझ्याकडे केवळ एक रुपया दक्षिणा मागून माझ्यासमोर आपला उजवा हात धरला. ही दक्षिणा ती व्यक्ती सद्गुरू समर्थ श्रीराऊळबाबांच्या १०१ च्या जयंतीनिमित्ताने गोळा करीत होती. पण गेल्या १५ ते २० मिनिटांमध्ये जे काही घडले होते ते माझ्या बुद्धीपर्यंत पोचेपर्यंत पुढच्या घटना घडत होत्या. त्यामुळे मी त्या व्यक्तीकडे पाहतच राहिले. "तुका इतकं सांगिलय, पण अजुन तुका कळलय नाय" असं काहीतरी मालवणी भाषेमध्ये बोलून आम्हाला नमस्कार करून ती व्यक्ती निघून गेली. त्या व्यक्तीने मागितलेला एक रुपया द्यायचे मला का सुचले नाही, असा विचार करून मी खूप अस्वस्थ झाले.
सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या कार्यातील प्रत्यक्ष मार्गदर्शक गुरूंची भेट
चिपळूण मध्ये सद्गुरूकृपेने भेट घडलेल्या श्रीप्रसादे महाराजांनी आम्हाला तेव्हा सांगितले होते की -"तुम्हाला पुढच्या यात्रेमध्ये एक सत्पुरुष भेटतील आणि तेच तुम्हाला तुमच्या सद्गुरूंच्या या सत्कार्या मध्ये योग्य मार्गदर्शन करतील." सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे, मनावर असलेल्या मायेच्या पगड्यामुळे श्रीप्रसादे महाराजांचे हे शब्द आम्ही या चार दिवसात पार विसरून गेलो होतो. दाणोलीमध्ये श्रीसाटम महाराजांच्या समाधी मंदिरामध्ये घडलेल्या सर्व घटनांचा अर्थ अजुनही पूर्णपणे कळत नव्हता. गोव्याला गेलेली आमची भक्तमंडळी परत आल्यानंतर आम्हाला पुन्हा पिंगळीला श्री. अण्णांना घ्यायला जायचे होते. त्यात सकाळपासून श्री. विकास सारखे म्हणत होते की "आपल्याला लवकर पिंगुळीमध्ये पोचायचे आहे. श्री .अण्णामहाराज आपली वाट बघताहेत. "आम्ही गोव्याहून येणाऱ्या आमच्या मंडळींची वाट बघत होतो. ती माणसे थोडी उशिरा आली आणि त्यामुळे आम्हाला पिंगळीला पोहोचण्यास उशीर झाला. पिंगुळी येथे पोचल्या पोचल्या तिथे रस्त्यावर उभी असलेले सद्गुरु अण्णांचे भक्त म्हणाले-" तुम्ही खामकर का ?अण्णा सकाळपासून तुमची वाट बघत आहेत. "आम्ही वर श्रीअण्णांकडे गेलो; तर खरंच श्रीअण्णा महाराज आमची वाट बघत होते.
त्यादिवशी परमपूज्य श्रीअण्णांनी आम्हाला निघू दिले नाही. आज रात्री इथे राहून उद्या निघू, असे ते म्हणाले. आमचा कार्यक्रम आमच्या हातात नव्हताच. आम्ही रात्री तेथेच मुक्काम केला. झोपण्यापूर्वी परमपूज्य अण्णांबरोबर गप्पा गोष्टी करण्याचा योग आला. त्यावेळी बोलता बोलता परमपूज्य अण्णांनी माझ्यासमोर आपला उजवा हात धरला व म्हणाले "इतक्या वेळा सांगून कोणी एक रुपया पण देत नाही. आता तरी देणार का?" दाणोलीला त्या व्यक्तीला एक रुपया देणे मला सुचले नव्हते ; ते माझ्या मनाला खूप लागून राहिले होते. त्यानंतर का कोणास ठाऊक, माझे पती श्री. विकास यांनी मला श्रीअण्णांकडे येण्यापूर्वी सांगून ठेवले होते की कदाचित परमपूज्य अण्णा तुझ्याकडे एक रुपया मागतील तेव्हा हातचे काही न राखता सर्व देऊन टाक. हे सर्व माझ्या आकलन शक्तीच्या पलीकडचे होते. पण मी कधीही माझ्या पतींना 'का'असे विचारले नाही.
त्यामुळे परमपूज्य श्रीअण्णा महाराजांनी एक रुपयाविषयी विचारताच मी एक रुपया आणि त्याबरोबर माझ्या पर्समध्ये हात घातल्यानंतर जेवढे रुपये मिळाले ; तेवढे अत्यंत श्रद्धेने माझ्या सद्गुरू श्रीअण्णांच्या हातावर ठेवले. परमपूज्य अण्णा फक्त हसले आणि म्हणाले "हे पैसे मी कधीही खर्च करणार नाही."
|