|
त्यानंतर दाणोलीच्या त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणेच सद्गुरु अण्णांनी मला "दत्त जयंतीला श्रीराऊळ बाबांच्या पाळण्याला झोका देण्यास यायचे आहे "असे सांगितले व विशेष म्हणजे खरोखरच सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या प्रेरणेने आम्ही श्री दत्तजयंतीला पिंगुळी येथे श्रीराऊळबाबांच्या १०१ व्या जयंती सोहळ्यासाठी ध्यानीमनी नसताना आलो, अर्थात पादुका स्थानाची सर्व व्यवस्था करूनच. सद्गुरु अण्णांनी आपल्या गुरूंच्या या सोहळ्याचे जे स्वप्न बघितले होते; त्यातील एक मोठा भाग म्हणजे १०१ सुवासिनींकडून श्री राऊळ बाबांच्या सुवर्णाच्या बाल कृष्णमूर्तीच्या रजत पाळण्याला झोका देणे. त्याचप्रमाणे त्यांनी ९ दिवस पिंगुळी याठिकाणी अतिशय शुचिर्भूत अशा वातावरणामध्ये अतिरुद्र स्वाहाकार संपन्न केला. संपूर्ण महाराष्ट्रातला हा तिसरा अतिरुद्र स्वहाकार होता. त्या ९ दिवसांमध्ये श्रीक्षेत्र पिंगुळी येथे जवळ जवळ ६ लाख लोकांनी प्रसादभोजनाचा लाभ घेतला व निर्वीघ्नपणे हा संपूर्ण कार्यक्रम सद्गुरु अण्णा महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तीत पार पडला. आम्हाला हा भव्य व दिव्य असा सोहळा 'याची देही याची डोळा' अनुभवायला मिळाला हे आमचे महत् भाग्य.
या सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला जो सद्गुरु अण्णा महाराजांचा अध्यात्मिक सहवास मिळाला व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचे जे दर्शन झाले; त्याचे मोल कशाशीच होऊ शकत नाही. साक्षात अतिरुद्र स्वाहाकारातील शिवाचे दर्शन मला सद्गुरु श्रीअण्णांच्या स्वरूपात अनुभवण्यास मिळाले हे माझे जन्मोजन्मीचे पुण्य. सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराजांची ही कृपाच होय असे मी समजते आणि सद्गुरु आनंदयोगेश्वरांनी जे वचन दिले होते की "मी तुमच्याबरोबर कायम आहे" त्याचीही मिळालेली प्रचितीच होती. म्हणूनच १५ डिसेंबर २००५ ही दत्तजयंती मी जीवनात कधीही विसरू शकणार नाही. गुरुतत्त्व काय असते व भक्तांना योग्य मार्गदर्शन करण्यासाठी सद्गुरु काय करू शकतात, याचा प्रत्यय अशाप्रकारे या सोहळ्याच्या निमित्ताने आम्हाला आला !
वर घडलेल्या या सर्व घटनांचा पूर्ण अर्थ आम्हाला आजही कळला नाहीये. पण सद्गुरूंनी इथपर्यंत स्वतः आम्हाला आणल्यानंतर आता आम्ही कुठला विचारच करत नाही. जे जे घडेल त्याचा त्या वेळचा निखळ आनंद अनुभवायला आणि सद्गुरु दाखवतील त्या रस्त्याने पुढे चालत राहायचे, एवढेच आम्हाला माहित आहे,.. आणि यातच जीवनातील शाश्वत आनंद आहे असे आम्हाला वाटते. सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या प्रवचनातील तीन शाश्वत मूल्यांचा प्रत्यय आला. ते म्हणायचे ,"जीवन, श्रद्धा व सत्य या शाश्वत मूल्यांचा अनुभव प्रत्येकाला आल्याशिवाय राहणार नाही - जर का सद्गुरूंचे चरण घट्ट धरले तरच."
सद्गुरु परमपूज्य अण्णांनी त्यावेळी स्वतःहून आम्हाला सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले आणि तेव्हाच आम्हाला चिपळूणच्या श्रीप्रसादेमहाराजांनी सांगितलेले शब्द आठवले की "तुमच्या गुरूंच्या कार्यामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणारे सत्पुरुष तुम्हाला पुढच्या यात्रेमध्ये भेटतील." तेव्हापासून आम्ही दोघे परमपूज्य श्रीअण्णा महाराजांना सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या या कार्यातील आमचे गुरु मानत आलो आहोत. परमपूज्य अण्णांनीही आमच्यावर सद्गुरु भाऊंप्रमाणेच आईसारखी प्रेमाची पाखर केली आहे. आजही सद्गुरु अण्णांच्या विचाराशिवाय आमचा श्वासही चालत नाही. आमच्या मधील असलेले हे नाते जगातील सर्व नात्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे, असे मला वाटते.
सद्गुरु अण्णांचा यात्रेतील सहवास व सद्गुरु साटम महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन
पिंगुळी येथील अविस्मरणीय वास्तव्यानंतर आमची यात्रा मुंबईला परत येण्यास निघाली. यावेळी तर आमच्यासाठी अतिशय दुर्लभ असा योग होता तो म्हणजे आमच्याबरोबर प्रवासात आमचे दोन्ही 'गुरु 'होते .सद्गुरु आनंदयोगेश्वर निळकंठ महाराज आणि सद्गुरु समर्थ विनायक अण्णा राऊळ महाराज.
त्यावेळी तर आम्हाला सद्गुरु श्रीसाटम महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन दिले. त्याचे असे झाले :
येताना वाटेत आम्ही चिपळूण येथे दुपारच्या जेवणासाठी थांबलो होतो. सद्गुरु अण्णा म्हणाले "मी गाडीतून खाली उतरलो तर चिपळूणचे सगळे भक्त इथे गोळा होतील. तेव्हा माझे जेवण इथे गाडीतच आणा." मी व श्री .प्रदीप हजारे आम्ही दोघे सद्गुरु अण्णांबरोबर गाडीत थांबलो. सद्गुरु अण्णांनी स्वतः जेवता जेवता श्री. प्रदीप यांना सांगितले की "श्रद्धासाठी जेवण घेऊन ये." श्री .प्रदीप गेले आणि दुसऱ्या मिनिटाला तेथे एक गृहस्थ आले. गाडीच्या मागच्या बाजूला आम्ही सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांचा बॅनर लावला होता. तो पाहून ते गृहस्थ थांबले होते. गाडीबाहेर उभे राहून त्यांनी मला विचारले की "हा जो मागे फोटो लावला आहे ते बोरवलीचे सद्गुरु भाऊ महाराज करंदीकर ना? मी त्यांना ओळखतो." मी "हो "असे म्हणून त्यांना सद्गुरु आनंद योगेश्वरांच्या ७५ व्या जयंतीवर्ष प्रित्यर्थ केल्या गेलेल्या नामस्मरण संकल्प विषयी माहिती दिली. तसेच गाडीमध्ये पुढच्या सीटवर असलेल्या सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या फोटो व पादुकांकडे अंगुलीनिर्देश करून त्याविषयी सुद्धा त्यांना सांगितले. मला वाटले की हे गृहस्थ ज्याअर्थी माझ्या सद्गुरूंविषयी एवढ्या आस्थेने चौकशी करत आहेत तर ते आत येऊन त्यांच्या पादुकांना नमस्कार करतील. पण तसे न करता त्यांनी पुढे विचारले की "तिथे बोरवलीच्या स्थानावर सर्व काही ठीक चालले आहे का ?" वास्तविक पाहता ,सद्गुरू भाऊ महाराजांनी दिवस-रात्र स्वकष्टाने, प. प. श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांची अथक सेवा करून, शून्यातून बोरिवली येथील श्रीस्वामी महाराजांचे स्थान निर्माण केले होते. परंतु सद्गुरु भाऊ महाराजांच्या अध्यात्मिक कार्याची ओळख त्यांनी देह ठेवल्यानंतर ज्याप्रकारे होणे आवश्यक होते; तसे होत नव्हते. पण तरीही माझ्या गुरूंनी निर्माण केलेल्या स्थानाविषयी हे सर्व त्या परक्या माणसाला का सांगायचे? असा विचार करून मी त्यांना म्हटले की "सर्व काही ठीक आहे ."त्यावर ते हसले ."आपले नाव काय" असे विचारले असता त्या गृहस्थांनी त्यांचे नाव "फाटक" असे सांगितले व ते निघून गेले. आमचे हे संभाषण सुरू असताना सद्गुरु अण्णा मात्र काहीच न बोलता शांतपणे जेवत होते.
|