|
थोड्या वेळाने जेव्हा आम्ही पुढचा प्रवास सुरू केला; त्यावेळी सद्गुरु अण्णा म्हणाले "श्रद्धा, अगं ते खामकरांना सांग मघाशी कोण आले होते ते." मी खरं तर पूर्णपणे विसरून गेले होते की असे कोणी गृहस्थ येऊन गेले आहेत. त्यात सांगण्यासारखे काही आहे असेही मला वाटत नव्हते. तरीही श्रीअण्णांनी सांगितले म्हणून मी श्री. विकास यांना सर्व वृत्तांत कथन केला. विकास काहीच बोलले नाहीत. मीही गप्प बसले. त्यावर पुन्हा श्री अण्णा महाराज मला डोळे मिसकावत म्हणाले "अग त्याला विचार कोण आले होते ते?"
आता मात्र मी चमकले. एक क्षण मन पूर्णतः अंतर्मुख झाले आणि डोक्यात हळूहळू प्रकाश पडायला लागला की काहीतरी वेगळे घडले आहे. कोण आले असतील? एवढे प्रत्यक्ष दर्शन देऊन गेले तर मला त्यावेळी त्याची जाणीव का झाली नाही? मी खूपच अस्वस्थ झाले. थरथरत्या आवाजात श्री. विकास यांना विचारले "कोण होते ते ?" श्री. विकास कॅज्युअली म्हणाले, "अगं स्वामी महाराज असतील. नाही तर अण्णांना विचार." आणि ते पुन्हा गप्प बसले. सद्गुरु अण्णा मात्र पुन्हा मिश्किलपणे मला म्हणतात "सांगितलं का त्याने?" आता मात्र मी मेटाकुटीला आले. हे दोघेही काही ठोसपणे बोलत नव्हते. शेवटी मी सद्गुरु अण्णांनाच विचारले "अण्णा, सांगा ना कोण होते ते?" त्यावर श्रीअण्णा महाराज सहज बोलल्यागत उत्तरले "अग ते कोकणातले संत होते."
आता मी त्यांचा चेहरा आठवड्याचा प्रयत्न करू लागले. गोरापान रंग, घारे डोळे, बारीक अंगकाठी- क्षणात माझ्या डोळ्यासमोर दाणोलीचे श्रीसाटममहाराज उभे राहिले. ज्या साटममहाराजांच्या तुकाराम बीज या पुण्यतिथीच्या दिवशी सद्गुरु भाऊंनी बोरिवलीच्या 'ओम सद्गुरू प्रतिष्ठान' या स्थानावर गुरुवारची आरती सुरू केली होती आणि त्या दिवशी ते न चुकता श्रीसाटम महाराजांची आरती म्हणायचेच; त्या सद्गुरु माऊलीने बरोब्बर माझ्याकडे त्या स्थानाची चौकशी केली होती- तेही सद्गुरु समर्थ श्रीविनायक अण्णा राऊळ महाराजांच्या साक्षीने. त्यावेळी श्री. विकास यांनी मला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सद्गुरू साटम बाबांच्या दृष्टांताची आठवण करून दिली.
अशाप्रकारे ही आमची नामस्मरणाची पहिली यात्रा अनेक अनुभवांनी आणि परमेश्वरीय प्रचितींनी सालंकृत होऊन पूर्ण झाली. त्यावेळी सद्गुरु अण्णामहाराजांसारखे एवढे मोठे अवलिया सत्पुरुष 'आनंदयोग धाम' या गुरुवर्य भाऊमहाराजांच्या पादुका स्थानावर आले. त्यांचे आम्हाला भक्तिभावाने पाद्यपूजन करता आले. त्यांनी आनंदाने या ठिकाणी भोजन ग्रहण केले. आमची गेल्या अनेक वर्षांचे महाशिवरात्रीचे नामस्मरणाचे व्रत सफल झाले आणि साक्षात शिवशंकराचे स्वरूप असलेल्या सद्गुरु अण्णामहाराजांचे चरण आमच्या घराला लागले.
या यात्रेमध्ये प्रत्येक टप्प्यावर आम्ही जे जे अनुभवले त्याचा विचार केला; तर एकच सत्य जाणवते की आमच्यासारख्या सामान्य भक्तांना एवढ्या प्रचिती देऊन या साऱ्या शक्तींनी आम्हाला कृतकृत्य केले ते फक्त एकाच गोष्टीमुळे- सद्गुरु आनंद योगेश्वरांची संपूर्ण समर्पित भावनेने केलेली गुरुभक्ती.
औदुंबरा तळवटी श्रीआनंदयोगेश्वर योगी
पहिल्या यात्रेचे आध्यात्मिक दृष्ट्या अतिशय सुखद अनुभव गाठीशी घेऊन ३० एप्रिल २००६ या दिवशी आम्ही सद्गुरु आनंद योगेश्वर निळकंठ महाराजांच्या ७५ व्या नामस्मरण संकल्पांतर्गत दुसऱ्या यात्रेला प्रारंभ केला. सर्वात वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे पूर्वनियोजित नसतानाही या यात्रेची सुरुवातही कोकणातील 'माय भवानी' प्रमाणे देवीच्या शक्तीस्थानापासून झाली. या मंदिराचे नाव श्रीभुवनेश्वर देवी मंदिर. येथील सेवेकऱ्यांनीही आम्हाला नामस्मरणासाठी अतिशय चांगले सहकार्य केले व संकल्पातील ४५ वे नामस्मरण या ठिकाणी अतिशय पवित्र अशा वातावरणात पार पडले.
त्यानंतर आम्ही श्रीक्षेत्र औदुंबर या ठिकाणी मुख्य मंदिरामध्ये सद्गुरु आनंद योगेश्वरांचे नामस्मरण केले. हे नामस्मरण जोरात सुरू असतानाच त्या ठिकाणी श्रीसुधांशूमहाराज नावाची एक विभूती आली. त्यांनी सद्गुरु आनंदयोगेश्वरांच्या खुर्चीवर ठेवलेल्या तसबिरीला व पादुकांना वंदन केले व ते बाजुलाच असलेल्या श्री औदुंबर वृक्षाच्या पारावर पद्मासन घालून डोळे मिटून बसले. नामस्मरण चालू असल्यामुळे आम्हाला त्यांच्याशी काहीच बोलता आले नाही. तथापि नामस्मरण व सद्गुरूंची आरती झाल्यानंतर श्री. विकास मला म्हणाले की आपण त्या सत्पुरुषांना सद्गुरु भाऊ महाराजांचे हे पुस्तक भेट देऊ या. त्याप्रमाणे आम्ही दोघे व आमच्या बरोबरची इतर भक्तमंडळी त्यांच्यासमोर गेलो तेव्हा ते डोळे मिटून बसले होते.
|